राज्यात रब्बी पेरणी पोचली १६ टक्क्यांवर

राज्यात रब्बी पेरणी पोचली १६ टक्क्यांवर

पुणे - राज्यात रब्बी पेरण्यांची लगबग वाढली असून, आतापर्यंत १६ टक्के पेरा झाला आहे. परतीचा पाऊस होऊनदेखील १८ तालुक्यांमध्ये कमी पाऊस असल्यामुळे तेथील रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना जास्त कसरत करावी लागेल, असे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

राज्यात १ जून ते २७ ऑक्टोबर या कालावधीत ११९० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो व प्रत्यक्षात पाऊस १०१० मिलिमीटर म्हणजेच ८४ टक्के झालेला आहे. पावसाचा एकूण प्रवास पाहिल्यास १८ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस कमी झाल्यामुळे तेथे रब्बी हंगामासाठी कमी पाणीसाठा आहे. १०४ तालुक्यांमध्ये २५ ते ५० टक्के कमी पाऊस झालेला आहे. राज्यातील १२२ तालुक्यांमध्ये यंदा १०० टक्क्यांच्यावर पाऊस झाल्यामुळे तेथे रब्बी हंगाम चांगला राहिल. त्यामुळेच हरभरा पेऱ्यात यंदा भरपूर वाढ अपेक्षित आहे.     

राज्यात रब्बीचा पेरा साधारणतः ५४.७५ लाख हेक्टरवर होतो. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडयात यापैकी ८.८० लाख हेक्टरवर पेरा झालेला आहे. नाशिक विभागात पेरणी अवघी पाच टक्के झालेली आहे. मात्र, पुणे विभागात पेरण्यांना वेग आला असून साडेसतरा लाख हेक्टरपैकी सव्वा चार लाख हेक्टरवर म्हणजेच २४ टक्के रब्बीचा पेरा आटोपला आहे. 

कोल्हापूर विभागात सव्वा पाच लाख हेक्टरवर पेरा होतो. त्यापैकी आतापर्यंत २५ टक्के पेरा झालेला आहे. औरंगाबाद विभागात तीन तालुक्यांमध्ये कमी पाऊस असून विभागात आतापर्यंत १९ टक्के पेरा झालेला आहे. लातूर विभागात ११ टक्के पेरा आटोपल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. सर्वात कमी पेरा नागपूर विभागात झालेला असून सव्वा चार लाख हेक्टरपैकी आतापर्यंत एक टक्काही पेरा झालेला नाही. राज्यात खरीप पिकाखालील क्षेत्र दुबार पिकाखाली आणण्याचा प्रयत्न यंदा कृषी विभागाकडून केला जाणार आहे. त्यामुळे रब्बीचे क्षेत्र यंदा चार लाख हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com