पाऊस आला; पण खरीप हातचा गेला

पाऊस आला; पण खरीप हातचा गेला

ज्या जिल्ह्यातून राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियानाची मुहूर्तमेढ रोवली गेली त्याच बुलडाणा जिल्ह्यात यंदाचा खरीप ५० टक्‍क्‍यांवर घसरला आहे. मूग-उडदाचे पीक हातातून गेले असून सोयाबीन, कपाशी आणि तुरीवर शेतकऱ्यांचे लक्ष आहे. दुप्पट उत्पादन वाढीसाठी सुरू केलेल्या या अभियानाला पहिल्याच वर्षात निसर्गाच्या अवकृपेने तडा गेला. गेले तीन दिवस जिल्ह्यात पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला तरीही सोयाबीनच्या उत्पादकतेला ५० टक्‍क्‍यांवर फटका बसल्याची भीती व्यक्त होत आहे. कापसाची पातेगळ होत आहे. ज्वारीवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. किडींचा जोर वाढत चालला आहे. या हंगामात संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यालाच पावसाच्या दडीचा तडाखा बसला. आता पाऊस आला पण पूर्ण खरीपच हातचा गेला आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांप्रमाणेच नांदुरा, मोताळा तालुक्‍यातील गावांना भेट दिली असता सर्वत्र चिंतेचाच सूर होता.

नांदुरा तालुका कापूस उत्पादनासाठी अग्रेसर मानला जातो. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर करून या तालुक्‍यातील शेतकरी ‘पांढरे सोने’ पिकवतात. पण हा कॉटन बेल्ट या वर्षी संकटात सापडला आहे. प्री-मॉन्सून लागवड केलेल्या कपाशीची कमी पावसामुळे वाढ झाली नाही. महिनाभराचा खंड पडल्याने वाढलेल्या उष्णतेमुळे झाडांवर लागलेल्या फुल, पात्या जमिनीवर आल्या. गुलाबी बोंड अळीनेही नुकसान केले. मोताळा तालुक्‍यात या वर्षी शेतकऱ्यांनी मका लागवडीला प्राधान्य दिले. सोयाबीन, तूर, कपाशीचेही पीक लावलेले आहे; परंतु कुठल्याच पिकापासून नफा होण्यासारखी परिस्थिती सध्यातरी नाही. या तालुक्‍यातील कोथळी येथील सविता मोताळकर या महिलेने एकरात मूग पेरला होता. पावसाच्या खंडामुळे पिकाला अत्यंत कमी फुले लागली. झाडावर कशातरी चार-पाच शेंगा लागल्या. या शेंगा तोडणीला आल्या तर तीन दिवसांतील सलग पावसामुळे त्यातून कोंब निघाले. त्यामुळे त्यांनी मूग उपटणे सुुरू केले.

एकूणच कुणाच्या शेतातील पीक वाळले, ज्या शेतात पीक उभे दिसते त्यांनी शेंगाच धरल्या नाहीत. कपाशीच्या शेतात झाडांवर अत्यंत कमी फुल, पात्या आहेत. आता चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने किडींनी डोकेवर काढले. कापूस उत्पादकांना बोंडअळीपासून पीक वाचवण्यासाठी महागड्या औषधांचे फवारणी करावी लागत आहे.

आकडेवारी उपलब्ध नाही
जिल्ह्यात पावसाअभावी हजारो हेक्‍टरवर दुबार पेरणी झाली; परंतु सध्या याची काहीही आकडेवारी उपलब्ध नाही. दुबार पेरणीसह नंतरच्या काळात पाऊस नसल्याने नुकसान झालेल्या क्षेत्राचाही निश्‍चित आकडा यंत्रणांकडे उपलब्ध नाही. दुबार पेरणीचे साधे सर्वेक्षणही केल्या गेले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शिवाय अशा संकटाच्या काळात दुबार पेरणी, पीक नुकसानीचे पंचनामे व्हायला पाहिजे असताना तशी कारवाई झालेली नाही. सत्तेतील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केले आहे. ना कुणी अधिकारी शेतावर गेला ना कुठला लोकप्रतिनिधी.

९ टक्‍क्‍यांवर थांबले खरीप पीककर्ज
या खरीप हंगामसाठी जिल्ह्यात १३५६ कोटींचा आराखडा मंजूर झाला होता. मात्र केवळ ३० हजार शेतकऱ्यांना १३५६ कोटींच्या तुलनेत १२५ कोटी २० लाख रुपयेच वाटप झाले. एकूण उद्दिष्टाच्या केवळ ९ टक्के एवढी ही आकडेवारी आहे. १५ ऑगस्टपर्यंत ९ टक्के वाटप झालेल्या पीककर्जात सर्वाधिक पैसा हा जिल्ह्यात असलेल्या राष्ट्रीयीकृत बॅंकांमिळून १०९ कोटी २७ लाख एवढा वितरीत झाला आहे.

दीड लाख हेक्‍टरवरील पीक वाळले 
या वर्षी जिल्ह्यात सात लाख ३१ हजार ७११ हेक्‍टरवर पेरणी झाली होती. पावसाने मोठी दडी मारल्याने जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख हेक्‍टरवरील पिके वाळायला लागली होती, असे कृषी विभागाच्या सूत्राने मान्य केले. आता पाऊस झाला तरी या पिकांना त्याचा फारसा फायदा होणारा नाही. सुकलेल्या पिकांपैकी २० ते ३० टक्के पिके ‘रिकव्हर’ होतील. मात्र त्यापासून उत्पादन किती येईल हे सांगता येत नाही. जिल्ह्यातील सुमारे एक लाख हेक्‍टरवरील पिके तर पूर्णतः हातातूनच गेली आहेत. यात प्रामुख्याने कमी कालावधीची मूग, उडीद व हलक्‍या जमिनीतील सोयाबीन, मका ही पिके आहेत. भारी जमिनीतील पिकांनी तग धरला होता खरा पण ऐन फुलोरावस्थेत सोयाबीनला पाणी न मिळाल्याने पिकाच्या उत्पादकतेला थेट फटका बसण्याची चिन्हे तयार झाली. 

जिल्ह्यातील पीककर्ज वाटप

कर्जवाटपाचे उद्दिष्ट १३५६ कोटी
प्रत्यक्ष वाटप केवळ १२५ कोटी २० लाख
उद्दिष्टाच्या केवळ ९ टक्के वाटप
राष्ट्रीयीकृत बॅंका १०९ कोटी २७ लाख
ग्रामीण बॅंक १५ कोटी २० कोटी
जिल्हा बॅंक ७३ लाख
कर्ज घेतलेले शेतकरी ३० हजार १०१
एकूण शेतकरी ४ लाख ४६ हजार

आमच्या भागात दीड महिना पाऊस झाला नाही. आता पाऊस आला. मात्र तोपर्यंत अडीच एकरातील सोयाबीन वाळून गेले. जवळपास २० हजार रुपये खर्च वाया गेला. अडीच एकरात कपाशी आहे. त्याला फुल-पात्या लागल्या; पण आता सर्व माल झडून गेला. दरवर्षी १५ क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन व्हायचे. या वर्षी सहा सात क्विंटल झाले तरी आमचे नशीब.
- राहुल गजानन महाकाळ, कोथळी, ता. मोताळा, जि. बुलडाणा

दीड एकरात मी सोयाबीन लावले होते. पाऊस नसल्याने पूर्ण सोयाबीन सुकले. कपाशीची वाढही थांबली होती. मूग, उडदाचे पीक पूर्णतः गेले. आता आलेल्या पावसाचाही काही फायदा होईल असे वाटत नाही. पिकांचे नुकसान होत असताना अद्याप कुणीही अधिकारी या भागात फिरकला नाही. या वर्षी कर्ज मिळाले नाही. त्यामुळे हातऊसनवारी करीत केली होती. 
- धोंडू निनाजी भातूरकर, दहिगाव, ता. नांदुरा, जि. बुलडाणा

तीन एकरात सेंद्रीय पद्धतीने उडीद पेरला होता. कुठलेही रासायनिक खत दिले नाही. यासाठी एकरी तीन हजार खर्च झाला. सध्या झाडावर आठ ते दहा शेंगा लागलेल्या आहेत; परंतु पिकाची अवस्था पाहता एकरी क्विंटलभर उत्पादन झाले समाधान मानावे अशी परिस्थिती आहे. 
- राजेंद्र संपत ठोंबरे, शेतकरी गटाचे अध्यक्ष, कोथळी, जि. बुलडाणा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com