भात रहूची ड्रम सीडरने पेरणी

डॉ. नामदेव म्हसकर, डॉ. आनंद दळवी
गुरुवार, 29 जून 2017

ड्रम सीडरच्या साह्याने पेरणी करताना बियाण्यास जास्त मोड येऊ देऊ नयेत. अन्यथा बियाणे एकमेकांत गुंतून राहते. सपाट केलेल्या चिखलावर ४८ तासांपर्यंत अंकुरलेले बियाणे मोकळे करून ड्रम सीडरच्या साह्याने पेरावे.

ड्रम सीडरच्या साह्याने पेरणी करताना बियाण्यास जास्त मोड येऊ देऊ नयेत. अन्यथा बियाणे एकमेकांत गुंतून राहते. सपाट केलेल्या चिखलावर ४८ तासांपर्यंत अंकुरलेले बियाणे मोकळे करून ड्रम सीडरच्या साह्याने पेरावे.

रोपवाटिका क्षेत्राची जशी मशागत केली जाते तशीच मशागत करावी. पेरणी करावयाच्या क्षेत्रातील तण काढून स्वच्छता करावी. ट्रॅक्टर, पॉवर टिलर किंवा नांगराने जमीन उभी आडवी नांगरून घ्यावी. दुसऱ्या नांगरणीवेळी १० टन प्रति हेक्टर या प्रमाणात चांगले कुजलेले शेणखत आणि कंपोस्ट खते मिसळून घ्यावीत. शेवटी चांगल्या प्रकारे चिखलणी करावी. चिखलणी केल्यानंतर प्रति गुंठा तीन किलो १५ः१५ः१५ सम प्रमाणात पसरून  टाकावे. फळी मारून जमीन सपाट करावी.

अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी एका बाजूने चारी काढावी. तसेच चिखल ओला राहील यासाठी बांधही घालावा. पाण्याची पातळी एकदम कमी ठेवावी. जेणेकरून चिखल दिसू शकेल. सपाट केलेल्या चिखलावर ४८ तासांपर्यंत अंकुरलेले बियाणे (मोड आलेला रहू) मोकळे करून ड्रम सीडरच्या साह्याने चिखलावर पेरावे.

ड्रम सीडरने पेरणी
ड्रम सीडरच्या साह्याने दोन ओळींतील अंतर २० सें.मी. तर दोन झाडांमधील अंतर १५ सेंमी एवढे राखता येते. मात्र ड्रम सीडरच्या छिद्रांमधून एकावेळी ४ ते ५ बियाणे पडते. त्यामुळे हेक्टरी ७५ ते ८० किलो बियाण्याची आवश्‍यकता लागते.
मोड आल्याने चिखलावर बियाणे रुतून राहते.
ड्रम सीडरच्या साह्याने पेरणी करताना बियाण्यास जास्त मोड येऊ देऊ नयेत. अन्यथा बियाणे एकमेकांत गुंतून राहते. त्यामुळे बियाणे पडण्याचे प्रमाण कमी होते.

पेरणीनंतर २ ते ३ दिवसांपर्यंत पाण्याची पातळी कमी राखावी. जादा पाऊस झाल्यास रहू वाहून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.

५ ते ६ दिवसांनी पाण्याच्या पातळीत वाढ झाली तरी रहूवर परिणाम होत नाही.

चिखलणीनंतर रहूची फोकून पेरणी 
भात खाचराची मशागत नेहमी सारखीच करावी. चिखलणी केल्यानंतर प्रति गुंठा तीन किलो १५ः१५ः१५  सम प्रमाणात पसरून टाकावे.
या ठिकाणी ड्रम सीडरने पेरणी करण्याऐवजी रहू हाताने सम प्रमाणात चिखलावर पातळ फोकून पेरावा. जेणेकरून रहूचा मोड चिखलात चांगला रुतून राहतो.
चिखल चांगला करावा, अन्यथा तणांचा प्रादुर्भाव जास्त होतो.
या पद्धतीमध्ये फुटवा कमी येत असल्याने उत्पादन कमी येते. दोन रोपे अथवा ओळींमधील अंतर राखता येत नाही. मजूर टंचाईच्या काळात या पद्धतीचा अवलंब करावा.
पाण्याची पातळी योग्य राखावी.
कोणताही लागवड पद्धतीचा पर्याय नसला तरच या पद्धतीने पेरणी 
करावी.
- डॉ. नामदेव म्हसकर,९७३०८३७६६६ (प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड)