साबळे यांची १६० एकरांवरील यांत्रिकी शेती

मुगाच्या शेतात फवारणी यंत्राचा वापर.
मुगाच्या शेतात फवारणी यंत्राचा वापर.

शेती, मग ती अल्प असली तरी महागाईच्या व समस्यांच्या काळात कसणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील तरोडा येथील साबळे कुटुंबाने तब्बल १६० एकरांवर यांत्रिकीकरणाचा वापर करीत उत्तम व्यवस्थापनाचा नमुना ‘पेश’ केला आहे. विशेष म्हणजे कोरडवाहू, खारपाणपट्ट्यातील हे नियोजन साबळे यांच्या व्यवस्थापनातील जमेची बाजू आहे. 
 

खारपाण पट्ट्यातील शेती करताना शेतकऱ्यांना असंख्य अडचणी येतात. याच खारपाणपट्ट्यात म्हणजे तरोडा (ता. अकोट, जि. अकोला) येथे अशोकराव जनार्दन साबळे यांची सुमारे १२० एकर शेती आहे. सुमारे ४० एकर शेती ते भाडेतत्त्वावर करतात. प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी अशी त्यांची पंचक्रोशीत अोळख आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, गावचे माजी सरपंच अशी पदे त्यांनी भूषविली आहेत. आनंद व अनुप ही त्यांची दोन मुले असून सारे कुटूंब आता पूर्णवेळ शेतीच करते. मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या क्षेत्रात शेतीचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करणे एवढी सोपी गोष्ट नाही. मात्र स्वतःचे कष्ट, मजुरांचे व्यवस्थापन व जोडीला तंत्रज्ञान किंवा यांत्रिकीकरण या बाबींमधून साबळे कुटुंबाने ते साध्य केले आहे.

घरी वीस ते २२ जनावरे आहेत. यासह अकोट येथील गोरक्षण संस्थेकडील शेणखत असे मिळून वर्षाला ६० ते ७० ट्रॉली शेणखत शेतीत वापरतात. यामुळे खारपाण पट्ट्यात सहसा टणक होणारी जमीन टणक होत नसल्याचा अनुभव साबळे व्यक्त करतात.  

पूर्वीपासून पेरणी यंत्राचा वापर 
सुमारे सात-आठ वर्षांपासून साबळे ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्राचा वापर करतात. त्यासाठी दोन ट्रॅक्टर व दोन पेरणी यंत्रे आहेत. पेरणीयंत्र त्यांनी गरजेनुसार स्थानिक स्तरावर बनवून घेतले आहे. त्याचे झालेले फायदे बियाणांची एकसारखी उगवण होते. 
पेरणी वेळेवर होते.
कमी वेळेत व कमी श्रमात जास्त क्षेत्रावर लावणीचे नियोजन होते. 
एका दिवसात १५ ते २० एकरांवर पेरणी शक्य. यासाठी केवळ दोन मजूर लागतात. पारंपरिक पद्धतीत १५ ते २० एकरांतील पेरणी करण्यासाठी किमान दोन दिवस लागायचे. मजुरीही अधिक लागायची. 

साबळे यांचे शेती व्यवस्थापन दृष्टिक्षेपात 
स्वतःचे एकूण विविध ठिकाणी मिळून क्षेत्र - १२० एकर 
दरवर्षी सुमारे ९० ते १०० एकरांपर्यंत बीटी कपाशी
लावणीपासून ते काढणीपर्यंतचे व्यवस्थापन प्रामुख्याने यंत्रांच्या साह्याने 

तुषार सिंचनाचा वापर 
शेततळे पूर्ण भरल्यानंतर त्यात १० अश्वशक्तीचे दोन पंप वापरून त्यातील पाणी गरजेनुसार पिकाला दिले जाते. त्यासाठी स्प्रिंकलरचा  वापर केला आहे. सुमारे ४७ नोझल्सचा वापर करून दिवसाला दीड एकर या पध्दतीने सिंचन केले जाते. शेततळे, पाइपलाइनसाठी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता स्वखर्चातून या सुविधा केल्या. हा अवाढव्य मात्र आवश्यक खर्च करताना ठिबक सिंचनच तेवढे करायचे राहिले आहे. मात्र तुषार सिंचनामुळे तेवढी अडचण जाणवत नाही. सिंचन सुविधा बळकट केल्याने व्यवस्थापन सुधारून उत्पादनात निश्चित दीडपट वाढ झाली आहे. आज साबळे यांची कापूस उत्पादनक्षमता एकरी सरासरी १६ ते १७ क्विंटलपर्यंत आहे. 

४० एकर हरभऱ्याला तुषार सिंचन
रब्बीतही सुमारे ४० एकरांत हरभरा असतो. त्यासाठी तुषार सिंचनाचा वापर होतो. हरभऱ्याचे उत्पादन एकरी १२ ते १४ क्विंटलपर्यंत आहे. 

दिवसाला २५ एकरांत एकसारखी फवारणी

सन १९९८ पासून काॅंप्रेसर पद्धतीच्या फवारणी यंत्राचा वापर होतो. सद्यस्थितीत दिवसाला सुमारे २५ एकरात या यंत्राच्या साह्याने समप्रमाणात फवारणीकरता येते. त्यातून तेवढ्या क्षेत्रावरील पाच हजार रुपयांची मजुरी वाचवणे शक्य झाले आहे. पूर्वी बैलाच्या साह्याने हे यंत्र चालायचे. आता त्याला यांत्रिक आधार दिला. त्यामुळे फवारणीसाठी आवश्यक प्रेशर निर्माण होऊन फवारणीच्या कामाला गती मिळाली. कापूस, मूग, हरभरा पिकांत त्याचा वापर होतो.

१२० एकरांत पाणी खेळवले 
खारपाण पट्ट्यात जमिनीत क्षारयुक्त पाणी असल्याने त्याचा पिकांना वापर करणे फायद्याचे नसते. या पाण्याचा अधिक वापर झाला तर शेती क्षारपड होण्याचा धोका असतो. त्यामुळे शेतकरी खारपाणपट्ट्यात सिंचनाकडे वळत नाहीत. साबळे यांनी याबाबत सकारात्मक पाऊल उचलले. दरवर्षी खरिपात पावसात खंड पडण्याचे प्रमाण वाढत असल्याने उत्पादकतेला फटका बसतो. त्यातही कोरडवाहू भागात पाऊस वेळेवर अाला तरच पिके येतात. हा अनुभव लक्षात घेता साबळे यांनी अकोला-अकोट मार्गावर कुटासा फाटा परिसरातील आपल्या शेतात शेततळे खोदले. सुमारे तीन किलोमीटरवरून जलवाहिनीची सुविधा केली. पारसूल शिवारात मोहाडी नदीच्या काठी २०१२ मध्ये एक एकर शेत विकत घेतले. तेथे दोन बोअर घेतले. त्यातील गोडे पाणी या खारपाणपट्ट्यातील शेतातील तळ्यात अाणले. यांत्रिक पद्धतीने आंतरमशागत   
ट्रॅक्टरच्या साह्याने लावण करताना कपाशीचे तास मोजूनमापून सरळ रेषेत ठेवले जातात. यामुळे पुढील काळात अांतरमशागत करताना फायदा होताे. वखरणी, तासांना भर देणे अादी कामे ट्रॅक्टरच्या साह्यानेच केली जातात. यासाठी छोट्या ट्रॅक्टरच्या मदतीने चालवता येईल असे वखरणी यंत्रही तयार करून घेतले आहे. कपाशीची काढणी झाल्यानंतर झाडे उपटून न टाकता ट्रॅक्टरचलित यंत्राने (कटर) तुकडे करून ते जमिनीत गाडतात. वर्षानुवर्षे ही पद्धत अवलंबित असल्याने जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत झाली आहे. साबळे यांच्याकडे ५० एचपी, २७ एचपी व १५ एचपी क्षमता असे एकूण तीन ट्रॅक्टर्स आहेत. त्यातील २७ एचपी ट्रॅक्टरच्या वापराद्वारे ५० एकरांवरील मुगाची पेरणी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com