Sugarcane-worm
Sugarcane-worm

उसातील खोड किडीचे नियंत्रण

राज्यात ऊस पिकामध्ये येणाऱ्या प्रमुख २५ किडीपैकी खोड कीड ही अत्यंत महत्त्वाची कीड आहे. ऊस लागवडीपासून मोठ्या बांधणीपर्यंत पाण्याची कमतरता भासल्यास खोड किडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात येऊ शकतो. वाढलेल्या तापमानात आणि हलक्‍या जमिनीत या किडीचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो.

अधिक ऊस उत्पादनासाठी सुरू उसाची लागवड १५ फेब्रुवारीपर्यंतच करणे आवश्‍यक असते. मात्र, अनेक अडचणींमुळे सर्व शेतकऱ्यांना वेळेत लागवड शक्‍य होत नाही. विशेषतः गहू व हरभरा असणाऱ्या शेतात उसाची लागवड ही उशिराच होते. अशा वेळेस आधीच पाणी कमी असलेल्या क्षेत्रामध्ये ऊस लागवडीनंतर मोठ्या बांधणीपर्यंत खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वाढते. तसेच खोडवा पिकातही याचा प्रादुर्भाव हा जास्त असतो.

पोषक वातावरण
     हलकी जमीन, कमी पाणी व जास्त तापमान (३७-४१ अंश सेल्सिअस), कमी आर्द्रता (४०-५० टक्के) या बाबी कीड वाढीला पोषक आहेत.
     खोड किडीचा प्रादुर्भाव ऊस लागवडीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत (कांडी तयार होईपर्यंत) आढळून येतो.
     महाराष्ट्रात या किडीचा प्रादुर्भाव आडसाली (जुलै-ऑगस्ट) ते सुरू (फेब्रुवारी) लागवडीपर्यंत आढळतो.

खोड किडीची लक्षणे
 पोंगा मर -

अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली अळी रांगत अथवा चंदेरी धाग्याला लटकत उसाच्या खोडाजवळ येते. अळी खोडावरील मऊ पेशीवर उपजीविका करते. नंतर ती अळी खोडाच्या आत शिरुन उगवणाऱ्या कोंबाला ७-८ दिवसांत खाऊन टाकते. त्यामुळे १२-१८ दिवसांत आपणास पोंगा मर दिसतो. या किडीचा प्रादुर्भाव फुटव्यावर व लागवडीपेक्षा खोडवा पिकात अधिक प्रमाणात दिसून येतो. सदरील पोंगा ओढल्यास सहज उपटून येतो व त्याचा उग्र वास येतो. 

विरळ झालेले पीक -
शिफारशीत वेळेपेक्षा सुरू लागवड जेवढी उशिरा होईल, त्या प्रमाणात या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. उसाची लागवड अरुंद ओळीत (९० सें.मी. किंवा त्या पेक्षा कमी) या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. किडीमुळे ऊस उशिरा तयार होतो. परिणामी उत्पादनात (३३ टक्के) व साखर उताऱ्यात (१ ते १.५ टक्के) घट होते. या किडीमुळे नुकसान झालेले उसाचे पीक विरळ दिसते.
खोड किडीचा जीवनक्रम

१) अंडी -
     मादी पतंग हिरवीगार व टोकाकडे वाकलेल्या पानांवर अंडी देतात. या किडीची अंडी उसाच्या जमिनीलगतच्या तीन हिरव्या पानावरील मध्यशिरेजवळ आढळतात. नुकतीच दिलेली अंडी ही शुभ्र पांढरी असतात. साधारणपणे मादी पतंग पहिल्या रात्रीत ४०० अंडी काही पुंजक्याच्या स्वरुपात देतात. नंतर दुसऱ्या रात्री १२५ अंडी २ ते ५ पुंजक्यांमध्ये देतात. या किडीचा अंडी अवस्था ३ ते ६ दिवस राहते. 

२) अळी -
    अंड्यातून बाहेर पडलेल्या अळीच्या अंगावर नारंगी रंगाचे पट्टे असतात. ती अळी रात्रीच्या वेळी उसाच्या कोवळ्या पानावर उपजीविका करते. परिणामी उसात पोंगा मर आढळतो. पूर्ण वाढ झालेली अळी कोषावस्थेमध्ये जाण्याआधी खोडाच्या आतून जमिनीच्या वरील भागावर ४ ते १० सें.मी. अंतरावर पतंगाला बाहेर पडणे शक्य व्हावे, यासाठी छिद्र करून ठेवते. नंतर चंदेरी आवरणामध्ये पोंग्याच्या आत कोषावस्थेत जाते. अळी अवस्थआ २२ ते ३१ दिवस राहते. 

३) कोष -
    कोष खोडामध्ये (पोंग्यात) तयार होतात. हे कोंब लांब, पिवळसर ते तपकिरी रंगाचे दिसतात. ही अवस्था ५-९ दिवस राहते.

४) पतंग -
 या किडीचा पतंग शक्‍यतो सूर्योदयापूर्वी बाहेर पडतो. प्रौढ अवस्था ५-९ दिवस राहते.

अन्य यजमान वनस्पती - ज्वारी, भात, बाजरी, मका, राळा, गिन्नी गवत, बोरु इ.
खोड किडीचा नुकसान कालावधी - ऊस उगवणीपासून ते मोठ्या बांधणीपर्यंत (साधारणतः ४ महिने) या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो.

खोड किडीचे नियंत्रण व्यवस्थापन
हलक्‍या जमिनीत उसाची लागवड टाळावी. सुरू उसाची लागवड १५ फेब्रुवारी पूर्वीच करण्याचे नियोजन करावे. बेणे मळ्यातील निरोगी व किडीविरहीत बेण्याची निवड करावी.

     फार प्रादुर्भाव झाल्यास शेत विरळ दिसते. अशा वेळेस एकरी रोपांची योग्य प्रमाण राखण्यासाठी लागवडीबरोबर प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये पुरेसे रोपे तयार करून ठेवावीत. योग्य वेळी विरळ जागी ही रोपे लावावीत.
     पाण्याच्या पाळ्या जर वेळेवर देता येत नसतील, तर पाचटाचे मल्चिंग अवश्‍य करावे. त्यामुळेदेखील खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
     उसाला एक ते दीड महिन्यानंतर बाळ बांधणी केल्यास खोडकिडीचे पतंग बाहेर पडणारी छिद्रे बंद होण्यास मदत होईल. पतंग बाहेर पडणार नाहीत.
     उसामध्ये मका, ज्वारी व गहू ही आंतरपिके न घेता कांदा, लसूण, कोथिंबीर, पालक ही आंतरपिके घ्यावीत.
     वाढ जोमदार व फुटवे जास्त प्रमाणात येणाऱ्या वाणांवर या किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात येतो.
     ऊस लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी ३ ते ४ फुले ट्रायकोकार्ड प्रति हेक्‍टर या प्रमाणात साधारणतः १० ते १५ दिवसांच्या अंतराने लावावीत.
     खोडकीडग्रस्त ऊस उपटून अळीसह नष्ट करावा.
     हेक्‍टरी ५ कामगंध सापळे शेतात लावावे.
     पुरेशा प्रमाणात पालाशयुक्त खते वापरल्यास या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

- डॉ. मंगेश बडगुजर, ९४२२७७११२६ (मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com