तनवाडीचा सरला दुष्काळ

1) नाला खोलीकरणांचे काम सुरू असताना जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्यासह अन्य मान्यवरांनी भेट देऊन कामांची पाहणी केली. 2) रुंदीकरणानंतर साठलेला पाणीसाठा.
1) नाला खोलीकरणांचे काम सुरू असताना जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्यासह अन्य मान्यवरांनी भेट देऊन कामांची पाहणी केली. 2) रुंदीकरणानंतर साठलेला पाणीसाठा.

एकेकाळी दुष्काळाशी सतत झुंज देणारे व त्यामुळे शेती अडचणीत आलेले तनवाडी गाव (ता. घनसावंगी, जि. जालना) आता बदलले आहे. पूर्वी खोल गेलेल्या विहिरी, सुकलेले हंगाम, तोडलेल्या फळबागा असे चित्र दिसायचे. आता गावशिवारामध्ये विहिरी, पाण्याने तुडुंब भरलेले नाले, त्यामुळे तरारलेली पिके व शेतकऱ्यांचे समाधानी चेहरे असे चित्र पाहावयास मिळत आहे. ही किमया साधली आहे जलयुक्त शिवार अभियानामुळे. मात्र त्याहून महत्त्वाचे म्हणजे ग्रामस्थांची तसेच शासनाच्या विविध विभागांची एकजूट दिसून आल्यानेच हे शक्य झाले.  

दुष्काळ आणि मराठवाडा हे समीकरण जणू जोडलेलेच आहे. दरवर्षी पाऊस काही खात्रीने येतोच असे नाही. वेळेवर आला तरी पुन्हा किती काळ खंड घेईल याचीही काही हमी नसते. पुरेसे पाणीच नसले की मग शेती आणि कौटुंबिक जीवनात सगळीच अस्थिरता येते. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्‍यातील तनवाडी हे त्यातीलच प्रातिनिधीक उदाहरण. सुमारे पाचशे लोकवस्तीचे हे गाव राहेरा ग्रामपंचायतीला जोडलेले आहे. 

तनवाडीची पूर्वीची गंभीर परिस्थिती 
तनवाडीत मागील चार वर्षांच्या सतत दुष्काळाने भुगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेलेली. उसाचे क्षेत्र म्हणून असलेली पूर्वीची ओळख पुसली गेली होती. जेमतेम मोठ्या शेतकऱ्यांनी आपल्या   मोसंबीच्या फळबागा कशाबशा टॅंकरच्या साह्याने जगविल्या होत्या. मध्यम शेतकऱ्यांना तर बेभरवशाच्या पावसावर कोरडवाहू शेती केल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. दुष्काळी वर्षांत सलग तीन वर्षे गावाला उन्हाळ्यात टॅंकरने पाणी उपलब्ध करावे लागले होते. अनेक शेतकऱ्यांनी बागायती पिके सोडून कोरडवाहू पिके घेण्यास सुरवात केली होती. 

आणि परिस्थिती बदलण्यास सुरवात...
घनसावंगी येथील तत्कालीन तहसीलदार कैलास अंडील २०१५ ते १६ या काळात तनवाडी गावापासूनच जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ केला. कारण गावाची तशी गरजच निर्माण झाली होती. योजनेलाही ग्रामस्थांनी भरघोस पाठिंबा देऊन सहभाग घेण्यात एकमत दर्शवले. पुढे शासनस्तरावर गावाचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश करण्यात आला. 

कामांची रूपरेषा व नियोजन 
गावाची परिस्थिती बदलायची ठरवल्यानंतर सर्वप्रथम जलसंधारणांच्या कामांसाठी ग्रामसभा घेण्यात आली. तत्कालीन तहसीलदारांकडे पिण्याच्या प्रश्‍न, टॅंकर सुरू करावे लागत असल्यांच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जलसंधारणाचे काम प्रामुख्याने हाती घेण्यात आले होते. या कालावधीत नोटबंदी असल्याने लोकसहभागातून निधी गोळा करण्यास अडचणी निर्माण झाल्या तरी शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापूस, धान्यविक्रीतून मिळालेले उत्पन्न जमा केले. मुंबई येथील समस्त महाजन ट्रस्टने यंत्रे उपलब्ध केली. 

प्रत्यक्ष कामांना सुरवात
प्रत्यक्ष कामांना सुरवात होऊन पाच जणांना कामांची जबाबदारी देण्यात आली. लोकसहभागातून निधी जमा करणे, कामांची देखरेख करणे आदी कामांचा त्यात सहभाग होता. यात तलावाच्या खालील बाजूस असलेल्या नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. या कामांची प्रेरणा परिसरात इतरांना मिळाली. त्यातून तालुक्‍यात पुढे जवळपास ५५ गावांत जलसंधारणाची कामे लोकसहभागातून उभारण्यात आली. पुढे कृषी विभागाने निधी दिल्याने कामात सातत्य राहिले. 
 
लोकप्रतिनिधींसह गावकऱ्यांची साथ 
सरपंच मुक्ताराम धांडगे, अप्पासाहेब शेंडगे, अशोक शेडगे, मधुकर गायकवाड, रामप्रसाद गायकवाड, विष्णू इंगळे, दत्ता धांडगे, अच्युतराव धांडगे, रामभाऊ दाते, कल्याण शेंडगे, हरिश्‍चंद्र मते, पंडित धांडगे यांच्यासह ग्रामस्थांनी साथ दिली. प्रारंभी काहींनी खोलीकरणास विरोध केला. पण झालेल्या कामांमुळे साठलेले पाणी व विहिरींची पातळी वाढल्याचे पाहिल्यानंतर समाधान व्यक्त करीत आपला विरोध त्यांनी मागे घेतला. कृषी विभाग, जलसंधारण विभाग, पंचायत समिती यांचाही सहभाग लाभला. तहसीलदार अश्‍विनी डमरे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे , गटविकास अधिकारी संदीप पवार, उपविभागीय अधिकारी प्रवीण धरमकर आदींनी भेट देऊन कामांचे कौतुक केले.  

पीकपद्धतीत बदल
पाण्याची उपलब्धता झाल्याने गावात पीक बदल होण्यास मदत झाली. नव्याने मोसंबी व उसाखालील क्षेत्र वाढले. भाजीपाला पिकांचे क्षेत्रही वाढले. अनेक शेतकरी स्थानिक आठवडी बाजारात व परिसरातील गावांत भाजीपाला विक्री करून चांगली कमाई करीत आहेत. सोयाबीन, कापूस या खरीप पिकांबरोबर गहू, हरभरा, ज्वारी या रब्बी पिकांचीही लागवड झाली आहे. एकंदरीत परिसरातील ७० टक्के क्षेत्र बागायती झाले आहे. सर्वाधिक दीडशे हेक्‍टरच्या आसपास उसाचे क्षेत्र वाढले आहे. चारा पिके घेऊन दुग्धव्यवसाय करण्यासाठी दहा शेतकरी पुढे आले आहेत. 

कामांची फलश्रुती
 पूर्वी नाल्यांची रुंदी तीन मीटर व खोली एक मीटर होती गावातील पाणलोटातील सर्व पाणी सरळ गावाबाहेर वाहून जायचे. त्यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नव्हते. परंतु नाला खोलीकरण  झाल्यानंतर नाल्याची खोली चार मीटर व रुंदी दहा मीटर झाली. एकूण २५०० मीटर काम करण्यात आले.
 त्यामुळे पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 
 रब्बी पिकांसाठी संरक्षित पाणी उपलब्ध झाले. 
 सार्वजनीक पाणीपुरवठ्याच्या परिसरात खोलीकरण झाले
 बांधातील गाळ काढण्यात आला. शेतकरी तो घेऊन गेले. पुढे पावसात बांध पाण्याने ओसंडून वाहिले. यामुळे आजूबाजूचे बोअर, विहिरी तुडुंब भरल्या.
 शिवारातील पाणी शिवारात अडविण्यात यश आले. यातून २८० हेक्‍टरपैकी सुमारे २०० हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले.

गावात लोकसहभागातून उन्हाळ्यात जलसंधारणाची कामे करण्यात आली. यामुळे पावसाळ्यातील पाणी वाहून न जाता ते अडविण्यात आले. त्यामुळे ज्या विहिरी पावसाळ्यात कोरड्या पडायच्या त्यांना चांगले पाणी आले आहे.
- मुक्ताराम धांडगे, सरपंच, गुरूपिंपरी, ८६०५२७३७७७ 

कृषी विभाग व लोकसहभागातून कामे करताना शिवारातील सर्वच नाल्यांचे सर्वेक्षण केले. प्रत्येक ठिकाणच्या नाल्याचे खोलीकरण करून शिवारातील पाणी शिवारात अडविण्यात आले. गावातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली येण्यास व कोरडवाहू क्षेत्र बागायती होण्यास मदत झाली. 
- अप्पासाहेब शेंडगे, ग्रामस्थ, ८३८१०२५२५८ 

मागील चार वर्षांच्या दुष्काळामुळे खरिप, रब्बी ही पिके सोडाच पण फळबागाही तोडाव्या लागल्या होत्या. आता जलयुक्त शिवार योजनेंतर्गत गावाच्या चारही बाजूंनी नाले, नदी तसेच जुन्या बंधाऱ्यांच्या खोलीकरणाची कामे हाती घेण्यात आली. यंदा पीकपाणी समाधानाचे आहे.
- अशोक शेंडगे, शेतकरी, तनवाडी  
९४२१४२०३५५ 

आज गावात चांगला पाणीसाठा झाला असून सिंचनात वाढ झाली आहे. 
- एस. आर. पोटे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, घनसावंगी 

साठवलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने कसा वापर करावा? सांडपाणी जमिनीत कशा प्रकारे जिरवावे आदींचे महत्त्व समजून आले. 
- रामप्रसाद गायकवाड, शेतकरी, तनवाडी, ९६३७७५४९६१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com