सीमाबंदीमुळे टोमॅटोचा लाल चिखल

Tomato
Tomato

केंद्रीय कृषी मंत्रालयाने ३० मे रोजी फलोत्पादनविषयक दुसरे अनुमान जाहीर केले. त्यानुसार देशात २०१७-१८ मध्ये टोमॅटोचे उत्पादन २२० लाख टन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन १३ लाख टनांनी वाढले आहे. तर २००७-०८ ते २०१७-१८ या दहा वर्षांच्या कालावधीत टोमॅटो उत्पादनात दुप्पट वाढ झाली आहे. 

जून ते डिसेंबर २०१७ या सहा महिन्यांत टोमॅटोचा सरासरी फार्मगेट विक्री दर किफायती होता. त्यामुळे जानेवारी २०१८ पासून टोमॅटो उत्पादनात वाढ होत गेली आणि टप्प्याटप्प्याने बाजार उत्पादन खर्चाच्या खाली घसरत गेला. चालू कॅलेंडर वर्षांतील पहिले पाच महिने मंदीत गेले आहेत. उत्तर भारतात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकावे लागले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागील पाच महिन्यांत नफा मिळालेला नाही. मेच्या शेवटच्या आठवड्यात बाजार थोडा सुधारला. सुरत मार्केटला चांगल्या मालाचा दर १५ रु. प्रतिकिलोपर्यंत वधारला. सटाणा भागातील काही शेतकऱ्यांच्या मालाला २० रु. दर मिळाला. मागच्या वर्षीही जूननंतर बाजार सुधारला होता आणि तो कल सात महिने टिकला. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे नैसर्गिकरित्या टोमॅटोचे उत्पादन संतुलित होते आणि किफायती बाजार मिळतो, हे गृहीत धरून या वर्षी टोमॅटो लागवडीचा कल वाढला. रोपे विकणाऱ्या फर्मकडील माहितीनुसार रोपांसाठी मोठी वेटिंग लिस्ट होती. मराठवाड्यासारख्या अपारंपरिक विभागातूनही लक्षणीय प्रमाणात मागणी वाढली होती. 

ज्या हंगामात नफा मिळतो, त्यानुसार उत्पादन मागे-पुढे करण्याचे व्यावसायिक आणि तांत्रिक कौशल्य महाराष्ट्र-कर्नाटकातील शेतकऱ्यांनी अवगत गेले आहे. शिवाय, नैसर्गिक आपत्ती वगळता देशभरात वर्षभर सातत्यपूर्ण पुरवठा या ना त्या भागातून सुरू असतो. गेल्या वर्षी जूननंतर नफा मिळाल्याने स्वाभाविकपणे या वर्षी पुरवठा जास्त राहणार आहे. एप्रिल-मे मधील उन्हाळ्यात किती टक्के नुकसान झाले, यापुढे पाऊसमानामुळे किती नुकसान होते, हे पुरेसे सुस्पष्ट नसले तरी पुरवठा नियंत्रित करण्यात हे घटक प्रभावी ठरतील. जून ते डिसेंबर २०१८ या कालावधीत जून ते  डिसेंबर २०१७ इतका उच्चांकी दर मिळणार नाही, हे सध्याच्या उत्पादनवृद्धीच्या कलावरून दिसते.

देशातील निम्म्याहून अधिक टोमॅटो उत्पादन आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओरिसा, महाराष्ट्र, प. बंगाल, बिहार, गुजरात या राज्यांत होते. यातील महाराष्ट्र आणि गुजरात ही वर्षभर टोमॅटो पिकवणारी राज्ये आहेत. अन्य राज्यांत हंगामी उत्पादन होते. त्यामुळे उत्पादनवाढीची आणि पर्यायाने मंदीची झळ महाराष्ट्र व गुजरातला सर्वाधिक बसते. दीर्घकाळ मंदी टिकूनही उत्पादन का कमी होत नाही, याबाबतची निरीक्षणे अशीः १. गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पादन घेण्याचे कौशल्य वाढले आहे. २. उत्पादनाचे अन्य स्त्रोत उपलब्ध नसणे किंवा अन्य व्यापारी पिकांचे उत्पादन घेण्याचे कौशल्य नसणे. ३. दीर्घकालीन मंदीचा अंदाज येत नाही, तेजीच्या अपेक्षेने गुंतवणूक सुरू ठेवणे. ४. जास्तीत जास्त सात-आठ महिने पिकाची तोडणी सुरू राहते.

स्ट्रक्चर बांधणी व पायाभूत सुविधावरील खर्च मध्येच तोडता न येणे. अर्थात, वरील निरीक्षणे ही महाराष्ट्रासाठी अधिक संयुक्तिक आहेत. 

टोमॅटोच्या बाजाराला आधार मिळायचा असेल, तर निर्यातवृद्धी झाली पाहिजे. चालू वर्षांतील निर्यातीचे चित्र फार निराशाजनक आहे. अपेडाकडील माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये पाकिस्तानला ३६८ कोटी रुपयांच्या टोमॅटोची निर्यात झाली होती; त्या तुलनेत २०१७-१८ मध्ये केवळ ३४ लाख रुपयांच्या टोमॅटोची निर्यात झाली. दुसरीकडे, बांगलादेशला होणारी निर्यात ६६.६ कोटीवरून ४.८ कोटीपर्यंत घटली आहे. वर्षभरापासून सीमा बंद असल्याने निर्यात रोडावल्याचे दिसते. भारताच्या एकूण टोमॅटो निर्यातीत पाकिस्तान व बांगलादेशचा वाटा ७५ टक्क्यांहून अधिक आहे. 

पुणे-नाशिक या दोन्ही जिल्ह्यांतील अर्थकारणात टोमॅटोचा मोठा वाटा आहे. चार लोकसभा मतदारसंघातील आणि किमान २० विधानसभा मतदारसंघातील अर्थव्यवस्थेतील टोमॅटो हे प्रमुख पीक आहे. सीमाबंदी उठवण्यासाठी टोमॅटो उत्पादकांनी आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला का, हा प्रश्न कळीचा आहे.  टोमॅटो उत्पादकांचे प्रभाव संघटन नसणे आणि सीमाबंदी उठवण्याविषयी राजकीय आणि प्रशासकीय उदासिनता हे सध्याच्या मंदीचे प्रमुख कारण आहे. केवळ उत्पादनवृद्धीमुळे मंदी येत नाही, तर संभाव्य वाढता पुरवठा आणि त्याचे देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत योग्यप्रकारे समायोजन करणारी यंत्रणा अस्तित्वात नसणे याची मोठी किंमत आपण मोजतोय. सीमा बंद असल्यामुळे वर्षाकाठी पाचशे कोटींचे थेट नुकसान होतेच. पण, तो माल देशांतर्गत बाजारात साचल्यामुळे पुरवठावाढ होऊन हजारो कोटींनी उत्पन्न घटते.

व्यक्तिगतरित्या तुम्ही कितीही चांगल्याप्रकारे टोमॅटो उत्पादन काढत असला तरी सामूहिक संघटन नसल्याने सर्व कष्ट निरर्थक ठरतात. टोमॅटो उत्पादकांचे संघटन व प्रभावी दबावगट हेच टोमॅटोच्या लाल चिखलावरचे उत्तर आहे.

(लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com