व्यवस्थापन तुती बागेचे...

व्यवस्थापन तुती बागेचे...

रेशीम शेतीमध्ये तुती पाल्याचा ६० टक्के वाटा असतो. तुती बागेत तण नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, तुती बागेची छाटणी आणि पीक व्यवस्थापन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दर्जेदार पाल्यामुळे रेशीम कीटकांची चांगली वाढ होऊन कोषांचे चांगले उत्पादन मिळते.
 

शेतकरी पातळीवर रेशीम शेतीमध्ये तुती लागवड आणि कीटकसंगोपन हे 
 फार महत्त्वाचे आहे.  रेशीम कीटकांचे खाद्य तुतीची पाने असल्याने तुती पाल्याच्या दर्जावर रेशीम कीटकांची निरोगी वाढ होऊन दर्जेदार, भरघोस कोषांचे उत्पादन मिळते.

तुती बागेचे पहिल्या वर्षातील व्यवस्थापन 
 जून ते सप्टेंबर या कालावधीत पट्टा पद्धतीने तुती लागवड कलम आणि रोपांद्वारे आपण केलेली असेल. एकदा केलेली तुती लागवड जवळपास पंधरा वर्षांपर्यंत टिकते. त्यामुळे पंधरा वर्षांपर्यंत शेतकऱ्यास कोषांचे उत्पादन घेता येते. 
 दरवर्षी नवीन तुती लागवड करावी लागत नाही, त्यामुळे पहिल्या वर्षी तुती बागेची निगा शास्त्रीय पद्धतीने करावी. योग्य व्यवस्थापनामुळे तुती बागेतील सर्व कलमे,रोपे जिवंत  रहातात. त्याचबरोबरीने तुतीची मुळे, खोडांची एकसारखी वाढ होऊन  पाल्याचे चांगले उत्पादन मिळते. उत्पादनाबरोबरच पाला रसरशीत दर्जेदार रहातो.

आंतरमशागत 
 बागेतील वाढलेल्या तणांमुळे कलमांना सूर्यप्रकाश मिळत नाही, गवत वाढल्याने अन्नद्रव्ये कमी पडून तुतीची पाने गळून पडतात. बागेतील तापमानात वाढ होऊन तुती कलमांची पाने पिवळी पडतात. 
 तुतीची लागवड केल्यापासून एक महिन्याने खुरपणी करून तण काढावे. तण काढताना तुती कलमांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी.

बागेची छाटणी 
 लागवडीपासून साडेचार ते पाच महिन्यांनी आपण पहिले कीटकसंगोपन घेतो. फांदी पद्धतीने कीटक संगोपनात तुती पाल्याऐवजी संपूर्ण फांदी झाडाच्या बुडख्यापासून कापतात. 
 छाटणी करताना जमिनीपासून ६ ते ८ इंच अंतरावर फांद्या कापाव्यात. ज्यामुळे पुढीलवेळी फांद्यांची संख्या वाढण्यास मदत होते. बैलजोडीने आंतरमशागतीची कामेही चांगल्याप्रकारे करता येतात. 
 छाटणी करताना खोडाचे साल निघणार नाही, कलम,रोप मुळापासून उपटून निघणार नाही याची काळजी घ्यावी.

तुती रोपवाटिका 
 तुती कलमे काही कारणांनी १०० टक्के फुटू शकली नाहीत, तर बागेमध्ये झाडांची संख्या कमी होऊन त्याचा परिणाम पाला उत्पादनावर होऊन पिकांची संख्या कमी होण्यावर होतो. 
 बागेत तुटाळ पडल्याचे पूर्ण बाग बहरल्यानंतर लक्षात येते. अशावेळी आपण बाद कलमांच्या जागी नवीन कलम लावून तुटाळ सांधण्याचा प्रयत्न करतो. परंतु, कलमाभोवतीची उंच वाढलेली तुतीची झाडे कलम फुटण्यावर परिणाम करतात. परिणामी नव्याने लावलेले कलम फुटत नाही, त्यामुळे तुटाळ भरून निघत नाही. 
 तुटाळ भरताना कलमाऐवजी तुतीचे रोप लावावे. त्यामुळे अडचण येत नाही. तुटाळ रहाण्याचा धोका लक्षात घेऊन नवीन तुती लागवड करतेवेळी प्रत्येक शेतकऱ्याने मोकळ्या पट्ट्यात किमान १००० ते १५०० कलमांची रोपवाटिका करावी.

दुसऱ्या वर्षांपासून तुती बागेचे व्यवस्थापन 
 पहिल्या वर्षी तणनियंत्रण, पाणी व्यवस्थापनाचे जसे नियोजन केले, त्याप्रमाणेच करावे. फक्त फरक खत व्यवस्थापनामध्ये येतो.
 दुसऱ्या वर्षांपासून पंधरा वर्षांपर्यंत खत व्यवस्थापनाकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. केंद्रीय रेशीम संशोधन संस्थेच्या शिफारशीनुसार वर्षभरात एकरी १२० किलो नत्र, ४८ किलो स्फुरद आणि ४८ किलो पालाश या रासायनिक खतांच्या मात्रा पाच मात्रांमध्ये विभागून द्याव्यात.
 पहिल्या रासायनिक खताची मात्र साधारणपणे जूनमधील  बागेच्या छाटणीनंतर नांगरट, वखरणी करून १५ दिवसांनी २४ किलो नत्र, २४ किलो स्फुरद आणि २४ किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. दुसरी खत मात्रा सप्टेंबर महिन्यात एकरी २४ किलो नत्राची द्यावी. तिसरी मात्रा ऑक्‍टोबर महिन्यात २४ किलो नत्र, २४ किलो स्फुरद, २४ किलो पालाशची द्यावी. चौथी मात्रा डिसेंबर महिन्यात २४ किलो नत्राची द्यावी. तर शेवटची पाचवी रासायनिक खताची मात्रा फेब्रुवारी महिन्यात २४ किलो नत्राची द्यावी. 
 रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी गांडूळ खत, हिरवळीची खते, जैविक खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करणे शक्‍य आहे. याच्या वापरातून तुती पाल्याचे उत्पादन वाढवू शकतो. 
 बागेतील प्रत्येक तुती झुडपास फक्त ८ ते १० फांद्या ठेवाव्यात. जमिनीलगत वाढलेल्या अनावश्‍यक फांद्या काढून टाकाव्यात. असे केल्याने पाल्याचा दर्जा राखण्यास मदत होते. झाडाचीही योग्य वाढ होते. 
 बागेतून वेळोवेळी फेरफटका मारावा. बागेतील रोगट, कीडग्रस्त पाने तोडून नष्ट करावीत. 
 तुतीचा हिरवागार, पौष्टिक पाला कीटकांनी खाल्यास चांगल्या प्रतीच्या वजनदार कोषांची निर्मिती होते.

खत नियोजन 
 तुती लागवड करण्यापूर्वी एकरी ८ ते १० टन शेणखत जमिनीत मिसळावे. 
 पहिल्या वर्षी तुती बागेस रासायनिक खतांच्या दोन मात्रा द्याव्या लागतात. पहिली मात्रा साधारणपणे तुती लागवडीनंतर दोन ते अडीच महिन्यांनी तुती कलमांना मुळे फुटतात त्या वेळी द्यावी लागते. साधारणपणे माती परीक्षणानुसार एकरी २४ किलो नत्र आणि दुसरी मात्रा साधारणपणे ३ ते ४ महिन्यांनी एकरी २४ किलो पालाशची द्यावी.

पाणी नियोजन 
 तुती लागवड कलम,रोपांद्वारे केली जाते. भारी जमिनीत लागवड केल्यापासून महिन्यातून दोनदा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम जमिनीकरिता १२ ते १४ दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. हलक्‍या जमिनीसाठी आठ ते दहा दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. 
 लागवड तुतीच्या कलमांपासून असल्याने व पहिल्या वर्षी तुती बाग नवीन असल्याने तुतीला योग्य प्रमाणात मुळ्या धरेपर्यंत जमिनीत ओलावा असावा.
 बागेला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. या पद्धतीने पाणी कमी  लागतेच, शिवाय पाण्याचा वापरही तुतीच्या वाढीस पोषक ठरतो. ठिबक संचनासाठी शासनाचे अनुदान उपलब्ध आहे.
 तुती बागेस खारवट, क्षारयुक्त पाणी कधीही देऊ नये. कारण याचे अनिष्ट परिणाम होऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com