माळ जमीन झाली हिरवीगार

माळ जमीन झाली हिरवीगार

पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथील वकिली व्यवसाय करणारे उदय महाजन यांनी शाहूवाडी तालुक्यातील शेंबवणे गावशिवारात डोंगराळ जमिनीत शेतीचे स्वप्न साकार केले. भातशेती, नाचणी लागवडीच्या बरोबरीने शेतीबांधावर आवळा, फणस लागवड केली. परिसरातील शेतकऱ्यांच्या सहकार्यातून शेती हिरवीगार होऊ लागली आहे.

पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथील उदय अण्णासो महाजन यांचा वकिली व्यवसाय. वकिलीबरोबरच काही वर्षापूर्वी ते वाहतूक व्यवसायात होते. परंतू काही कारणामुळे त्यांनी वाहतूक व्यवसाय बंद करून मिळालेला पैसा शेतीमध्ये गुंतवला. महाजन यांना शेतीची कोणतीही पार्श्‍वभूमी नव्हती. परंतू स्वतःची शेती असावी या इच्छेतून त्यांनी कोल्हापूरपासून पंचाहत्तर किलोमीटरवरील शेंबवणे (ता. शाहूवाडी) या छोटेखानी गाव शिवारात २००९ मध्ये टप्प्याटप्प्याने ३६ एकर डोंगराळ पडीक जमीन खरेदी केली.

जमीन सुधारणेच्या दिशेने
शेती नियोजनाबाबत उदय महाजन म्हणाले की, डोंगर उताराची जमीन लागवडीखाली आणणे कष्टाचे काम होते. लोक म्हणत होते की, डोंगर उतार आणि बिनपाण्याची शेती घेऊन काय करणार? परंतू प्रतिकूल परिस्थितीत शेती करायचीच हा निर्णय घेऊन सुरवात केली. पहिल्यांदा जेथे पीक लागवड करणे शक्य होते ते क्षेत्र यंत्राच्या साहाय्याने समपातळीत केले.

टप्प्याटप्प्याने पीक लागवडीसाठी सात एकर क्षेत्र तयार केले. या भागात जास्त पाऊस असल्याने खरिपात भात लागवडीशिवाय पर्याय नव्हता. भात शेती करण्यासाठी जमिनीच्या उतारानुसार टप्पे तयार केले. जल,मृद संधारणाच्या उपाययोजना केल्या. संपुर्ण क्षेत्राला दगडी बांध घातल्यामुळे भटक्या जनावरांपासून शेती सुरक्षित झाली. 

गेल्या सात वर्षापासून मी ॲग्रोवनचा वाचक आहे. त्यामुळे शेतीमधील वेगवेगळे प्रयोग आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळत गेले. त्यामुळे पुढील पाच वर्षांचा पीक लागवड आणि व्यवस्थापनाचा प्लॅन मी तयार केला आहे. येत्या काळात कृषी पर्यटन आणि दोन एकरावर ड्रॅगन फ्रूट लागवडीचे नियोजन केले आहे. त्यासाठी एसआयएलसीमध्ये दोन दिवसांच्या प्रशिक्षणातही मी सहभागी झालो होतो.

भात शेतीला सुरवात 
शेंबवणे परिसरात जास्त प्रमाणात पाऊस असल्याने महाजन यांनी चार एकर क्षेत्रावर भात लागवडीचा निर्णय घेतला. याबाबत महाजन म्हणाले की, शेती नियोजनासाठी गाव परिसरातील दोन मजुरांना बरोबर घेतले. लागवडीसाठी बेळगाव परिसरातील सुगंधी भात जातीची निवड केली. तसेच इंद्रायणी आणि स्थानिक जातही लागवडीसाठी निवडली. लागवडीअगोदर सर्व जमिनीत शेणखत, लेंडीखत मिसळून घेतले. दीड एकर क्षेत्रावर रोप पद्धतीने आणि अडीच एकरावर पेरणी पद्धतीने भात बियाणाची लागवड केली. एक एकरावर नाचणीची लागवड केली. मजुरांना भात शेतीची चांगली माहिती होती. तसेच माझ्या शेतकरी मित्रांशी चर्चा करून मी पीक व्यवस्थापन ठेवले. भात शेतीमध्ये मी सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करतो. तसेच जीवामृतही वापरतो. योग्य व्यवस्थापनातून एकरी वीस क्विंटल भाताचे उत्पादन मिळाले. चार एकरातून १२० पोती भात झाला. तो भरडल्यानंतर सत्तर पोती तांदूळ तयार झाला. आता दरवर्षी किमान पाच एकरावर भात लागवडीचे नियोजन असते. गेल्या वर्षी वरच्या खाचरामध्ये कोरट्याची लागवड केली.

त्याखालील खाचरात भात लागवड केली. कोरट्याच्या लागवडीमुळे रानडुक्कर, भटक्या जनावरांचा भात शेतीमधील त्रास वाचला. पीक सुरक्षित राहिले आणि कोरट्याचेही चांगले उत्पादन मिळाले. दरवर्षी परिसरातील शेतकऱ्यांकडून शेणखत, लेंडीखत विकत घेऊन जमिनीत मिसळून दिले जाते. त्यामुळे सुपीकता वाढत आहे.

यंत्र,अवजारांचा वापर
मोठे क्षेत्र आणि मजूर टंचाई लक्षात घेऊन महाजन यांनी दोन मजुरांच्या साहाय्याने यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. स्वत:च्या ट्रॅक्‍टरने भात खाचराची नांगरणी करतात. याशिवाय भात पेरणी, मळणी यंत्राने केली जाते. पाणी वाहतुकीसाठी टॅंकर आहे. स्वतःच्या शेतातील भात मळणी झाल्यावर शेतातील दोन मजूर भाडेतत्त्वावर परिसरातील शेतकऱ्यांना यंत्राद्वारे मळणी करून देतात. त्यातूनही मजुरांना रोजगार तयार झाला. तसेच परिसरातील भात उत्पादकांचीही सोय झाली. 

ग्रामस्थांची मोलाची साथ
तसे पाहिला गेले तर महाजन राहात असलेले पेठवडगाव आणि शेंबवणे  गावातील शेतीमध्ये ७५ किलोमीटरचे अंतर आहे. शेंबवणे गाव हे कमी पाण्याच्या प्रदेशात येते. या गावात भात सोडल्यास कोणतेच पीक येत नाही. यामुळे ग्रामस्थांना वर्षभर रोजगारही मिळत नाही. पण महाजन यांनी गावात शेती विकासाला सुरवात केल्यापासून ग्रामस्थांना शेतीच्या कामातून काही प्रमाणात रोजगार मिळाला. यामुळे महाजन यांचे ग्रामस्थांशी आपुलकीचे नाते तयार झाले. ग्रामस्थांना अडीअडचणीच्या वेळी मदत, कोल्हापुरात वैद्यकीय सेवेची मदत, गावातील सामाजिक, धार्मिक कार्यात महाजन सहभागी होत असल्याने ग्रामस्थांना मोठा आधार झाला. ज्यावेळी उन्हाळ्यात डोंगरावर वणवा लागतो, त्यावेळी ग्रामस्थ स्वत: पुढाकार घेऊन त्याची झळ महाजन यांच्या शेतीला लागू नये याची काळजी घेतात. केवळ उत्पादन वाढ किंवा गुंतवणूक म्हणून शेतीकडे न पहाता त्यातून आनंद मिळविण्याचा महाजन यांचा प्रयत्न आहे.

पक्षकारांचेही मिळते मार्गदर्शन 
महाजन वकिली व्यवसायात असल्याने त्यांचे ग्रामीण भागातील पक्षकार आहेत. बहुतेक पक्षकारांची शेती असल्याने त्यांच्याशी शेती प्रयोगांची चर्चा होते. स्वतःच्या शेतीमध्ये झालेल्या चुका समजतात. नवीन पीक पद्धती कळते. त्यामुळे महाजन सातत्याने पक्षकारांशी पीक बदलाची चर्चा करतात. त्याचा अवलंब स्वतःच्या शेतीमध्ये करतात. चर्चेतून त्यांना अनेक अडचणींवर मात करणे शक्य झाले आहे.

सुटीच्या दिवशी कुटुंब शेतीवर 
दर शनिवारी, रविवारी महाजन सहकुटुंब शेताकडे जातात. दिवसभर मजुरांशी चर्चा करून आठवड्यातील शेतीकामांचे नियोजन केले जाते. भात शेती संपल्यानंतर आवळा, फणस, खैर झाडांसाठी पाणी व्यवस्थापन आणि बांधांच्या डागडुगीवर लक्ष दिले जाते.

बांधावर फळझाडांची लागवड
भात खाचराची शेती असल्याने बांध मोठ्या प्रमाणात आहेत. हे बांध मोकळे ठेवण्यापेक्षा महाजन यांनी सात वर्षांपूर्वी शेतीतील सर्व बांधांवर आवळ्याच्या कांचन जातीची एक हजार रोपांची लागवड केली. तसेच बांधावरून माती ढासळू नये यासाठी वाळ्याचीदेखील लागवड केली.  उताराच्या जमिनीवर नाचणी लागवड असते. त्यामुळे अति पावसात बांध फुटत नाहीत.

आवळ्याच्या झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन केले. वीजजोडणी नसल्याने पाणी देण्याची अडचण होती. यासाठी शेतातील उंच जागेवर दोन हजार लिटर पाण्याची टाकी ठेवून त्यामध्ये टॅंकरने पाणी भरले जाते.

टाकीतील पाणी सायफन पद्धतीने लॅटरलमार्फत सर्व बांधांवरील रोपांना दिले जाते. डोंगरावरील खाचराच्या कडेने खैराची लागवड आहे. याशिवाय बांधावर काफा फणसाची दीडशे आणि शिकेकाईची तीनशे रोपे त्यांनी लावली आहेत. यंदाच्या वर्षी महाजन यांनी २० लाख लिटर क्षमतेचे शेततळे केले आहे. त्याचा फायदा फळबागेला पाणी व्यवस्थापनासाठी होणार आहे.

तांदूळ, नाचणीची थेट विक्री
उदय महाजन यांचा मोठा मित्र परिवार असल्याने तांदळाची हातोहात विक्री होते. दरवर्षी साठ पोती तांदूळ, चार पोती नाचणी तयार होते. सरासरी ३५ रुपये किलो दराने तांदूळ आणि नाचणी तीस रुपये किलोने विक्री होते. ही रक्कम शेती नियोजनासाठी वापरली जाते. 

- उदय महाजन, ९९२२४२६२२९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com