मॉन्सून समजून घेऊया...

मॉन्सून समजून घेऊया...

मॉन्सूनची सध्याची परिस्थिती आशादायक आहे. महाराष्ट्रावर काही दिवस रेंगाळल्यानंतर मॉन्सूनने पुन्हा आपली आगेकूच सुरू केली आहे. आता मॉन्सूनच्या वाऱ्यांनी आणि ढगांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला गेला आहे. त्याच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल होत चालली आहे. 

नैॡत्य मॉन्सूनचे आगमन केरळवर एक जूनच्या सुमारास होते आणि तो १५ जुलैपर्यंत सबंध भारत देश व्यापून राजस्थानच्या पश्‍चिमी सीमेपर्यंत पोचतो. दरम्यान १० जूनच्या सुमारास तो महाराष्ट्रात दाखल होतो. येथे शेतकरी बंधूंनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, या सरासरी तारखा आहेत. मॉन्सून प्रत्येक वर्षी हेच वेळापत्रक जसेच्या तसे पाळत नाही. मॉन्सूनचे आगमन प्रत्यक्षात सरासरीपेक्षा सात-आठ दिवसांनी मागे-पुढे होऊ शकते. कधी कधी त्याहूनही जास्त. मागील काही वर्षात हवामानशास्त्राने पुष्कळ प्रगती केलेली आहे आणि त्याच्या जोडीला भारतात आता अतिकार्यक्षम संगणक, इन्सॅट-३ डी हा अत्याधुनिक हवामान उपग्रह आणि डॉपलर वेदर रडार काम करत आहेत. तरीसुद्धा मॉन्सूनच्या फक्त तीन पैलूंचे दीर्घकालीन पूर्वानुमान करणे सध्या शक्य आहे. 

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचे भारत देशावरील एकूण पर्जन्यमान 
नैऋत्य मॉन्सूनचे केरळवरील आगमन 
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसात पडणारे खंड 

या तीन गोष्टींचा संबंध पृथ्वीच्या हवामानात घडणाऱ्या जागतिक स्तरावरील घटनांशी असल्यामुळे हे पूर्वानुमान करणे शक्य होते. म्हणून यंदाच्या मॉन्सूनचे एकूण पर्जन्यमान किती लाभेल याची शक्यता हवामानशास्त्र विभाग एप्रिल महिन्यातच सांगू शकला. या वर्षीचा अनुमानित आकडा आधी ९६ टक्के दिला गेला जो नंतर जूनमध्ये ९८ टक्क्यापर्यंत वाढवला गेला. तसेच यंदा मॉन्सून केरळवर त्याच्या सरासरी तारखेच्या सुमारास दाखल होईल असे हवामानशास्त्र विभागाने पंधरा दिवस आधी सांगितले आणि ते खरे ठरले.

मात्र, मॉन्सूनच्या बाबतीत इतर सर्वच स्थानिक किंवा प्रादेशिक घटना अशा प्रकारच्या चौकटीत बसत नाहीत. त्यामुळे त्यांचे दीर्घ अवधी पूर्वानुमान करण्याचे प्रयत्न केले जात असले, तरी त्यांची विश्र्वसनीयता अजून असावी तेवढी नाही, कारण त्यांचे जागतिक सहसंबंध तेवढे दृढ नाहीत. म्हणून जसे मॉन्सूनच्या केरळवरील आगमनाचे पंधरवड्यापूर्वी भाकीत केले जाते तसे मुंबईवर - पुण्यावर किंवा नागपूरवर मॉन्सून नेमका कोणत्या तारखेला दाखल होईल हे ठामपणे सांगता येत नाही. केरळवर मॉन्सूनचे आगमन झाले की नाही हे ठरवण्यासाठी काही विशिष्ट हवामानशास्त्रीय निकष लावले जातात. त्यात पावसाच्या प्रमाणात होणारी लक्षणीय वाढ, वाऱ्यांचा दिशाबदल, तसेच अरबी समुद्रावरचे विकिरण, हे तीन महत्त्वाचे निकष आहेत, त्याशिवाय केरळवर नैऋत्य मॉन्सूनचे आगमन होण्यापूर्वी अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि अधिक दूरवरच्या प्रदेशावरील हवामानाच्या ज्या हालचाली होत राहतात, त्यांचा हवामानशास्त्रज्ञांनी सखोल अभ्यास केलेला आहे आणि त्यावर ते दरवर्षी लक्ष ठेवून असतात. मॉन्सूनच्या आगमनाची अशी काटेकोर वैज्ञानिक व्याख्या केरळव्यतिरिक्त भारतावरील इतर ठिकाणांसाठी उपलब्ध नाही. कारण मॉन्सूनची केरळनंतरची वाटचाल जागतिक हवामान ठरवत नाही तर त्याला स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि प्रादेशिक हवामान कारणीभूत असते.

शेतकऱ्यांनी पेरणी करायची की नाही किंवा ती कधी करायची हे ठरवताना हवामानशास्त्र विभागाकडून मिळणारी दैनंदिन माहिती आणि कृषी हवामानविषयक सल्ला अवश्‍य विचारात घेतला पाहिजे. तो सल्ला त्यांना वैयक्तिक एसएमएसद्वारे त्यांच्या सेलफोनवर मिळू शकतो. मॉन्सून यायच्या आधीदेखील अधूनमधून पाऊस पडत असतो. त्याला मॉन्सूनपूर्व पाऊस म्हटले जाते. बहुदा तो पाऊस वादळी मेघातून पडतो. अशा प्रकारचा मेघ जास्त काळ टिकत नाही. तो खूप उंच वाढतो, गडगडाट होतो, विजा चमकतात, मुसळधार पाऊस पडतो आणि थोड्याच वेळात आकाश पुन्हा स्वच्छ दिसू लागते. अश पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही, पण ते वाहून जाते. मात्र एकदा मॉन्सून प्रस्थापित झाला की, पावसाचे स्वरूप पालटते. आकाश बहुतेक काळ मेघाच्छादित राहते किंवा हलके ऊन पडते, तापमानात घट होते, पावसाची संततधार पडत राहते. खरीप पिकांसाठी असाच पाऊस हवा असतो. केवळ मॉन्सूनपूर्व पावसाच्या आधारावर पेरण्या केल्या गेल्या तर कधी-कधी दुबार पेरण्या कराव्या लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. पावसाची जी आकडेवारी हवामानशास्त्र विभाग सादर करतो त्यात १ जूनपासूनचे एकूण पर्जन्यमान दाखवले जाते. मॉन्सूनपूर्व पाऊस आणि मॉन्सूनचा पाऊस असा त्यात फरक केला जात नाही. यंदाच्या वर्षी संबंध महाराष्ट्र राज्याची सरासरी घेतली तर एक जूनपासून आतापर्यंत सरासरीपेक्षा नऊ टक्के अधिक पाऊस पडला आहे. पण एक जूनपासून २१ जूनपर्यंतच्या पावसाचे वितरण दाखवणारा महाराष्ट्राचा नकाशा बघितला (चित्र १ पाहावे) तर हे दिसून येते की, १० जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. हे जिल्हे आहेत विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली, मध्य महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे, सातारा व कोल्हापूर आणि मुंबई उपनगर व ठाणे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात म्हणजे २६ जिल्ह्यांत १ जूनपासूनचे एकूण पर्जन्यमान सरासरीएवढे किंवा त्याहून पुष्कळ अधिक लाभले आहे.

मॉन्सूनची सध्याची परिस्थिती आशादायक आहे. महाराष्ट्रावर काही दिवस रेंगाळल्यानंतर मॉन्सूनने पुन्हा आपली आगेकूच सुरू केली आहे. आता मॉन्सूनच्या वाऱ्यांनी आणि ढगांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला गेला आहे. (चित्र २ पाहावे) आणि त्याच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल होत चालली आहे. नुकताच २४-२५ जूनला मुंबई, कोकणपट्टीत आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांत भरपूर पाऊस पडून गेला आहे. सामान्यतः जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण खूप वाढते. जून महिन्यातील पावसाच्या ते जवळ-जवळ दुप्पट असते. तेव्हा आगामी काळात महाराष्ट्रावर चांगल्या पावसाची अपेक्षा करायला काही हरकत नाही.
- ९८५०१८३४७५
(लेखक भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com