आठ एकराच्या मालकावर मजुरीची वेळ

संतोष मुंढे
रविवार, 16 जुलै 2017

जालना - नापिकीनं जे संकट उभं केलं ते थांबलंच नाही... चार वर्षांपासून गावं दत्तक असलेल्या बॅंकेकडे कर्जासाठी चकरा मारल्या... सातबारा, आठ अ नमुना दाखवला; पणं कर्जाचं जमतच नायं म्हणतात... नावावर जमीन हायं... त्यावर बोजा बी नायं; पण तरी बॅंका कर्ज देईनात... पैसाच नायं तर पेरावं कसं... चार वर्षांपूर्वी पैसा नसल्यानं जमीन पडीक ठेवावी लागली... तवापासून ती पडीकचं हायं... पोटचं भरायला मग मजुरीचा मार्ग धरला... मजुरी करून पोट भरतोय... मुलाला शिकवण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून त्याच्या मामाकडे पाठविला... पाचवीत हायं तो... पैसा असता तर लोकाच्या शेतात जी काम करतो ती घरच्या शेतात केली नसती का?

जालना - नापिकीनं जे संकट उभं केलं ते थांबलंच नाही... चार वर्षांपासून गावं दत्तक असलेल्या बॅंकेकडे कर्जासाठी चकरा मारल्या... सातबारा, आठ अ नमुना दाखवला; पणं कर्जाचं जमतच नायं म्हणतात... नावावर जमीन हायं... त्यावर बोजा बी नायं; पण तरी बॅंका कर्ज देईनात... पैसाच नायं तर पेरावं कसं... चार वर्षांपूर्वी पैसा नसल्यानं जमीन पडीक ठेवावी लागली... तवापासून ती पडीकचं हायं... पोटचं भरायला मग मजुरीचा मार्ग धरला... मजुरी करून पोट भरतोय... मुलाला शिकवण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून त्याच्या मामाकडे पाठविला... पाचवीत हायं तो... पैसा असता तर लोकाच्या शेतात जी काम करतो ती घरच्या शेतात केली नसती का? अशी व्यथा शेतकरी फकीरबा रामकिसन नागवे यांनी मांडली. 

भोकरदन तालुक्‍यातील खामखेडा गाव. कोरडवाहू वा हंगामी थोडबहुत ओलीत असलेल्या खामखेड्यातील फकीरबा रामकिसन नागवे या आठ एकराच्या मालकावर केवळ आर्थिक आधार नसल्याने मजुरी करण्याची वेळ आली आहे. एकीकडे शासनाच्या समाजातील शेवटच्या घटकाला आधार देण्याला प्राधान्य असल्याच्या बाता. दुसरीकडे फकीरबासारख्यांची ही स्थिती. यामुळे समाजातील या शेवटच्या घटकाला समाधानानं व स्वाभिमानानं जीवन जगण्यासाठी कर्ज वा शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक आधार मिळेल का? हा खरा प्रश्न आहे. 

भोकरदन तालुक्‍यातील खामखेड्याची लोकसंख्या जवळपास अडीच हजार. या खामखेड्यातील चौथी शिकलेल्या फकीरबा रामकिसन नागवे यांनी मांडलेल्या त्यांच्या अवस्थेनुसार यांच्याकडे वडिलोपार्जीत जवळपास आठ एकर जमीन. कुटुंबात पत्नी, एक मुलगा व ते स्वत: असे तीन सदस्य. वडील रामकिसन नागवे असेपर्यंत त्यांची शेती तेच कसायचे. त्यामुळं कधी त्यांच्यावर चरितार्थ भागविण्यासाठी कुणाकडे हात पसरण्याची वेळ आली नाही; परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर हळूहळू त्यांच्या कुटुंबावर संकट सुरू झाले. सतत येणाऱ्या दुष्काळाने या संकटात भर घातली. 

अत्यंत साधेपणाने जीवन जगणारे फकीरबा सांगत होते, की यंदा कशीबशी थोडी जमीन ठोक्‍यानं दिली. त्याचे सहा हजार ठरले. त्यात काय व्हतं. त्यातं पाण्यानं दांडी मारली. त्यालं बी पुरलं का नाय काय सांगावं. शेतात विहीर हायं. थोडबहुत पाणी असतं तिला; पण काय उपेग. फकीरबा आपली व्यथा सांगत असतानाच उपस्थित एकाने त्यांना जमीन इकता का म्हणून प्रश्न केला, त जीभ दाताखाली दाबून नाय बां. काम करून पोट भरतयं ना म्हणून ते हताश नजरेनं मान खाली घालून म्हणाले. इकायला काढली त पाडून मांगतील ना. मंग कशाला इकायची. 

फकीरबाचं शेत ज्या शिवारात आहे, त्या शिवारातून त्यांच्या शेताकडे जात असताना कुणीबी फकीरबांना कामासाठी हाक मारताना दिसले. यातच त्यांचे साधेपण दडून असल्याची प्रचिती आली; परंतु साधा स्वभाव व माहितीचा अभाव यामुळं त्यांना मालकीची शेती कसण्याची ईच्छा असूनही पडीक ठेवण्याची वेळ आली. ज्यांच्यावर कर्ज थकलयं त्यांना कर्ज मिळत नाही. हे ठीक; पण ज्यांच्यावर कर्ज नाही, ते मागणी करतात, अशापैकी ज्यांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया कशी हे कळत नाही, त्यांच्यासाठी कर्ज देणाऱ्या बॅंका व शासन प्रशासनातील संबंधित नेमकी कोणती कामे करतात. अशा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कुणी पुढे येईल का? बॅंकही त्यांना अपेक्षित आधार देईल का? हा खरा प्रश्न आहे. 
 

उसनवार, खासगी कर्जावर पेरणी
कर्ज थकले की बॅंक पुन्हा कर्ज देत नाही. त्यामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांचे कर्ज थकीत असल्यानं यंदा शेतकऱ्यांना कर्ज मिळालंच नाही. त्यामुळं अनेकांनी जमेल तिथून वा खासगीतून कर्ज काढून उसनवार करून यंदाची पेरणी कशीबशी भागवली. आता पिकाला पाण्याची गरज; पण तो डोळे वटारून बसलायं. आला तरी आणखी खर्च लागणारच. त्याची सोय खासगीतून कर्ज उचल वा उसणवारीतून केल्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती खामखेड्याचे शेतकरी सुखदेव नागवे व सुरेश नागवे यांनी दिली. सुखदेव नागवेंना सात एकरासाठी आजवर पन्नास हजार खर्च आला, तर सुरेश नागवेंनाही साठ हजारांपर्यंत. दोघांनाही कर्ज मिळाले नसताना पैशाची सोय लावावी लागली.