जेव्हा ‘अडाणी’  वळवतात पाणी 

जेव्हा ‘अडाणी’  वळवतात पाणी 

उंच डोंगर माथ्यावरून वाहून जाणारे पाणी आदिवासी शेतकऱ्यांनी त्यांच्या कल्पकतेने आपल्या शेतापर्यंत वळवून आणले आहे. त्यासाठी डोंगर उताराचे खूप निरीक्षण व अभ्यास लागतो. विशेष म्हणजे अशा प्रकारे पाणी आणण्यासाठी कृत्रिम ऊर्जा वापरलेली नाही. या प्रकारे १५-२० कि.मी. अंतरापर्यंत पाण्याची सोय केली आहे. त्या परिसरातील सर्व आदिवासी शेतकऱ्यांनी सामुदायिकपणे स्वत: कष्ट करून नाली खोदण्याचे काम केले. सामुदायिक श्रमदानाच्या या पद्धतीला स्थानिक भाषेत `लाह्या पद्धत` म्हटले जाते. हे काम पूर्ण होऊन शेतात पाणी सुरू झाले की, त्याच्या व्यवस्थापनाचे कामदेखील लाह्या पद्धतीनेच केले जाते. यात प्रत्येक शेतकऱ्याची एक विशिष्ट भूमिका असते.

सातपुड्यातील नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यांतील काही गावांमध्ये बायफच्या सहाय्याने स्थानिक आदिवासी जनसमूह परंपरांचा अभ्यास करण्यात आला आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीनेच त्यांचे आर्थिक जीवनमान कसे उंचावता येईल या संदर्भात काही उपक्रमही राबविले आहेत. त्यात त्यांना यशही आले आहे. यातील काही प्रयोग व परंपरा खूपच महत्त्वाच्या आहेत.

वळणचारी पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन हा त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा. उंच डोंगर माथ्यावरून वाहून जाणारे पाणी आदिवासी शेतकऱ्यांनी त्यांच्या कल्पकतेने आपल्या शेतापर्यंत वळवून आणले आहे. त्यासाठी डोंगर उताराचे खूप निरीक्षण व अभ्यास लागतो. विशेष म्हणजे अशा प्रकारे पाणी आणण्यासाठी कृत्रिम ऊर्जा वापरलेली नाही. या प्रकारे १५-२० कि. मी. अंतरापर्यंत पाण्याची सोय केली आहे. त्या परिसरातील सर्व आदिवासी शेतकऱ्यांनी सामुदायिकपणे स्वत: कष्ट करून नाली खोदण्याचे काम केले. सामुदायिक श्रमदानाच्या या पद्धतीला स्थानिक भाषेत `लाह्या पद्धत` म्हटले जाते. हे काम पूर्ण होऊन शेतात पाणी सुरू झाले की, त्याच्या व्यवस्थापनाचे कामदेखील लाह्या पद्धतीनेच केले जाते. यात प्रत्येक शेतकऱ्याची एक विशिष्ट भूमिका असते.

बायफने २००९ मध्ये या कामात लक्ष घातले आणि हे पाणी अधिक काळ कसे टिकून राहील अशा तऱ्हेने सहकार्य केले. विशेषत: पाण्याचा निचरा टळण्यासाठी पी.व्ही.सी. पाईप्सचे वाटप केले. शेतकऱ्यांच्या साहाय्याने प्रत्येक गावात पाणी वापर संस्था स्थापन केल्या. या कामामुळे पूर्वीपेक्षा अधिक क्षेत्र सिंचनाखाली आले. खरीपात संरक्षित सिंचन व हिवाळ्यात रब्बी पिकांना पाण्याची हुकमी सोय झाली आहे. परिणामी आदिवासी शेतकरी विविध पिके घेऊ लागला आहे. त्यामुळे त्यांचा आर्थिक स्तरही उंचवायला मदत झाली आहे. 

अक्कलकुवा तालुक्यातील बेलकुंड गावातील मिऱ्या भामटा वळवी हा शेतकरी याचे एक आदर्श उदाहरण आहे. त्याने व त्याच्या कुटुंबाने संस्थेच्या माध्यमातून या भागात वळण चारी पद्धतीत सुधारित तंत्रज्ञानाच्या अंतर्भावाने काय फायदा होऊ शकतो हे लोकांना जनजागृती करून पटवून दिले, एवढेच नव्हे, तर गावात हे काम सुरू असताना त्यांच्या कुटुंबाने स्वतः श्रमदानातून हे काम उभे केले. आज संस्थेच्या माध्यमातून सुधारित तंत्रज्ञानाच्या आधारे जवळ जवळ १५०० एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. तसेच भुईदांडावर गवत वाढल्याने तो चारा गुरांना उपयोगी पडत आहे. खरीप पिकांना संरक्षित ओलिताची सोय झाली आहे. त्यामुळे हे सारे शेतकरी पावसाळ्यात हुकमी पीक व हिवाळी पिकेही घेतात. (यात मका ,ज्वारी, भुईमूग, हरभरा व मोरबंटी सारखी भगर वर्गीय पिके प्रामुख्याने घेतली जातात. मका व मोरबंटी हि पिके दैनंदिन आहारात असल्याने या पिकांना लागवडीत आधी प्राधान्य दिले जाते.) ते सर्वजण मिश्रपीक घेताहेत. गुरे, कोंबड्या वाढल्या आहेत. त्याच बरोबर शेताच्या बांधावर डोंगर कपारीत त्यांनी फळझाडांशिवाय अनेक झाडे लावून ती जगवली आहेत. एवढेच नाही तर हा परिसर जैवविविधतेने नटवला आहे. पूर्वीपेक्षा आता त्यांच्या उत्पन्नात अधिक भर पडली आहे. किमान अन्नधान्याचा प्रश्न मिटला आहे. यातून ३२ गावांचा शेतीचा प्रश्न तर सुटलाच; पण या गावांची आर्थिक स्थिती देखील सुधारली. बेलाकुंड  भागातील या गावांतून उदरनिर्वाहाच्या दृष्टीने  कामासाठी होणारे स्थलांतर काही प्रमाणात थांबले आहे. त्यामुळे मुलांचे शिक्षण सुरू झाले आहे. आज परिसरातील शाळांमध्ये पटावरील विद्यार्थ्यांची संख्या शंभर टक्के झाल्याचे दिसून येते. या सा-या गावांमधील वळण चारी सिंचन व्यवस्थापनासाठी आज ४६ पाणी वाटप समित्या अतिशय निष्ठेने अहोरात्र काम करीत आहेत. यात पाणी वाटप समितीने काही तरुण मुलांचे गट तयार केले आहेत.  त्यांच्या माध्यमातून वळण चाऱ्यांच्या व्यवस्थापनाची कामे करून घेतली जातात. यात चाऱ्यांचे खोलीकरण, गाळ काढणे इ. प्रकारची व्यवस्थापनाची कामे केली जातात. एवढेच नव्हे तर या बाबतच्या कामांसाठी प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी समजून यात सक्रीय सहभाग देखील नोदविल्याचे दिसून येते.  

लक्षणीय बाब म्हणजे हे आदिवासी-दलित-कोळी शेतकरी समूह कर्ज, ऊस व रासायनिक  शेती यापैकी काहीही न स्वीकारता आपल्या थोड्याशा जमिनीला प्रथम निसर्गातील डोंगरातून वहाणारे पाणी कसे वापरता येईल याचा विचार करताना दिसतात. काहीही औपचारिक शिक्षण नसताना निसर्ग निरीक्षण, अनुभव, प्रयोगशीलता, अपार कष्ट व सामूहिकता यांचा सुरेख संगम झालेला दिसतोय. साध्या गावठी तंत्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असूनही त्या तंत्रांमागे काही गहन निसर्ग-विज्ञानाचे नियम दिसतात.

या तंत्रांमध्ये वाया जाणा-या पाण्याचा टिकाऊ वापर केला आहे. या पद्धतीमध्ये कोणताही फारसा मोठा खर्च येत नाही. हे सारे विज्ञान-तंत्रज्ञान निसर्ग प्रेमी आहे. निसर्ग-सेंद्रिय शेतीचे गरिबांनी विकसित केलेले स्वस्तातील मॉडेल आहे. क्षार व पाणथळपणामुळे (water logging) जमीन नापीक होण्यापासून वाचविण्याचा हा एक पर्याय आहे. प्रचंड पाणी पिणाऱ्या, रासायनिकतेला प्रोत्साहन देणाऱ्या, नैसर्गिक जैवविविधता आणि परिसर नष्ट करणाऱ्या शेतीला म्हणजेच कर्जबाजारीपणा व आत्महत्येला पर्याय देणारी दृष्टी यामागे आहे. निसर्ग निरीक्षण, अनुभव, प्रयोगशीलता, अपार कष्ट व सामूहिकता यांचे शिक्षण निरक्षर आदिवासींकडून घेण्यात समाजाचा शाश्वत फायदा आहे.

 ९४२२९९५१२१
(लेखक नंदुरबार जिल्ह्यात बायफ मित्र म्हणून कार्यरत असून स्थानिक बियाणे संवर्धनाच्या कामात सक्रिय आहेत.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com