गहू, हरभऱ्याच्या भावात घट

गहू, हरभऱ्याच्या भावात घट

या सप्ताहात कापसाचे व साखरेचे भाव वाढले इतर शेतमालाचे भाव उतरले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, सोयाबीन व गवार बीचे भाव वाढतील. अधिक रबी उत्पादनाच्या अपेक्षेने गहू व हरभऱ्याचे भाव उतरतील.

गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.
मका
खरीप मक्याच्या (जानेवारी २०१८) किमती नोव्हेंबर महिन्यात सतत घसरत होत्या. 

(रु. १,३८९ ते   रु. १,३५९).  या सप्ताहात त्या १.३ टक्क्यांनी घसरून रु. १,३४२ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १,३३३ वर आल्या आहेत.  मार्च २०१८  मधील  फ्युचर्स किमती  रु. १,३५६ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,४२५ आहे. रबी मक्याची एप्रिल २०१८ च्या डिलिवरीची फ्युचर्स किमत रु. १,२०० आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी खरीप मक्याचे उत्पादन घसरून १८.७३ दशलक्ष टनावर होणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: १९.२४ दशलक्ष  टन). मागणी कमी झाली आहे. खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यांतील आवकेमुळे किमती हमी भावाच्या खाली राहण्याचा संभव आहे. 

साखर
साखरेच्या (जानेवारी २०१८) किमती  नोव्हेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ३,३१० ते रु. ३,२१६). या सप्ताहात त्या ४.३ टक्क्यांनी वाढून रु. ३,३५३ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,३६४ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,३५३ वर आल्या आहेत. सध्या साठा पुरेसा आहे. नवीन हंगामाचे उत्पादन आता सुरू झाले आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी भारतातील उसाचे उत्पादन वाढून ते  ३३७.३ दशलक्ष टनावर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन - ३०६.७ दशलक्ष  टन). 

सोयाबीन 
सोयाबीन फ्युचर्स (जानेवारी २०१८) किमती १५ नोव्हेंबरपासून सतत वाढत आहेत. (रु. २,८८३ ते रु. ३,१३८).  गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी घसरून रु. ३,०५८ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,०६७ वर आल्या आहेत. एप्रिल २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,२६१ वर आल्या आहेत.  हमी भाव (बोनस सहित) रु. ३,०५० आहे. खाद्य तेल- उद्योगाची मागणी वाढत आहे. अर्जेन्टिनामधील हवा सुधारत आहे. त्यामुळे तेथील उत्पादन  पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अमेरिकेतील भावसुद्धा कमी झालेले आहेत. शासनाने हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. सोया पेंडीच्या निर्यातीतसुद्धा वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील काही महिने किमतींत वाढीचा कल राहण्याचा संभव आहे.  

गहू     
नोव्हेंबर महिन्यात गव्हाच्या (जानेवारी २०१८) किमती घसरत होत्या. (रु. १,७९७ ते  रु. १,६९१). या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी घसरून रु. १,६६१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (दिल्ली) रु. १,७९८ वर आल्या आहेत.  मार्च २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.७ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १,७३१). पुढील वर्षाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे. 

कापूस 
एमसीएक्स मधील कापसाच्या फ्युचर्स (जानेवारी २०१८) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. १८,२४० ते रु. १८,९१०). गेल्या सप्ताहात त्या ३.१ टक्क्यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा १.७ टक्क्यांनी वाढून रु. १९,५४० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती  रु. १८,८३३ वर आल्या आहेत. एप्रिल २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.२ टक्क्यांनी कमी आहेत (रु.१८,६००). प्रथम अंदाजानुसार या वर्षी कापसाचे उत्पादन घसरून ३२.३ दशलक्ष गाठीवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन: ३३.१ दशलक्ष गाठी). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी).

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (जानेवारी २०१८) किमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,६६६ ते रु. ३,९७४).  या सप्ताहात त्या २.८ टक्क्यांनी घसरून रु. ३,८०३ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती  रु. ३,८७९ वर आल्या आहेत.  सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा मार्च २०१८ मधील फ्युचर्स किमती १ टक्क्याने अधिक आहेत (रु. ३,९१८). आवक वाढती आहे. मात्र मागणीसुद्धा वाढती आहे. 

हरभरा
नोव्हेंबर महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (जानेवारी २०१८) किमती वाढत होत्या (रु. ४,५४७ ते ४,९५०).  गेल्या सप्ताहात त्या ८.५ टक्क्यांनी घसरल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ८.६ टक्क्यांनी घसरून रु. ४,०७८ वर आल्या आहेत.  स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,१६४ वर उतरल्या आहेत.  उत्पादन वाढीच्या अपेक्षेने एप्रिल  २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ५.२ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ३,९००). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. त्यामुळे हरभऱ्याची घसरण थांबवण्यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील. 

हळद
हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती १५ नोव्हेंबरपासून वाढत होत्या (रु. ६,९८८ ते ७,८०८).  या सप्ताहात त्या रु. ७,३८४ वर आल्या आहेत.  स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,५०० वर  आल्या आहेत.  जून २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ०.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,५३६).  वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. मात्र निर्यात्त व देशांतर्गत मागणी वाढती आहे. पुढील काही दिवसांत किमती वाढण्याचा संभव आहे. 

- arun.cqr@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com