पूरक व्यवसायातून महिलांनी साधली आर्थिक प्रगती

अगरबत्ती तयार करताना सौ. मनीषा चौगुले.
अगरबत्ती तयार करताना सौ. मनीषा चौगुले.

केवळ एकच उद्योग न करता वेगवेगळे उद्योग केले तर व्यवसायात अधिक वाढ होते. हे लक्षात घेऊन सांगली शहरातील प्रयोगशील महिलांनी कल्याणी महिला बचत गट स्थापन केला. गेली तेरा वर्षे या बचत गटाचा शेळी पालन ते प्रक्रिया, दुकान आणि शेतीपूरक व्यवसाय असा प्रवास सुरू आहे. विविध पूरक उद्योगांच्या उभारणीतून या महिलांनी आर्थिक स्थिती भक्कम केली आहे.
 

सांगली कर्नाळ रस्त्यावर काकानगर आहे. याच भागात  सौ. मनीषा चौगुले रहातात. महिलांनी एकत्र येऊन उद्योग करावा अशी पहिल्यापासून त्यांची इच्छा होती. त्यानुसार परिसरातील महिलांशी त्यांनी चर्चा सुरू केली. पण भागभांडवल कसे उभे करायचे ? असा प्रश्‍न सातत्याने येत होता. त्यांनी सुरवातीला भागभांडवलाचा विचार थोडासा बाजूला ठेवला. सर्वप्रथम महिलांना एकत्रकरून पूरक उद्योग करण्यासाठी प्रोत्साहित करणे त्यांना आवश्‍यक वाटले. प्रत्येक महिलेला वेळेप्रमाणे उद्योग आणि बचत गटाबाबत माहिती देण्यास त्यांनी सुरवात केली. त्यामुळे परिसरातील महिलांना बचत गटाचे फायदे समजले. एका विचारांती दहा समविचारी महिलांनी बचत गट तयार केला. २००५ मध्ये महिला बचत गटाला कल्याणी हे नाव दिले आणि सुरवात झाली बचत गटाच्या वाटचालीची.

सांगली कुपवाड मिरज महानगरपालिका क्षेत्रात हा भाग येत असल्याने महिलांनी महानगरपालिकेतील दिनदयाळ अंतोदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिरीष काळे, व्यवस्थापक सौ. ज्योती सरवदे, समूह संघटक सौ. वंदना सव्वाखंडे यांची भेट घेतली. गटातील महिलांना पूरक उद्योग सुरू करण्यासाठी काय करावे लागेल, याची माहिती घेतली. चर्चेतून कोण कोणते उद्योग करता येईल याचा सल्ला त्यांना तज्ज्ञांच्याकडून मिळाला. 

जमा झाले भागभांडवल
सन २००५ मध्ये कल्याणी बचत गटाची नोंदणी करण्यात आली. या गटामध्ये  सौ. मनीषा चौगुले अध्यक्षा तर नंदा सरगर सचिव आहेत. सौ. जयश्री कोरे, सौ. मंगल सरगर, सौ. वनिता सूर्यवंशी, श्रीमती सुजाता सूर्यवंशी, सौ. माया जाधव, सौ. सुवर्णा कोरे, श्रीमती शैनाज बागवान, सौ. शहिदा सनदी सहभागी आहेत. या गटातील महिलांनी आपल्या आवडीच्या उद्योगांची निवड करून बचत गटाच्या उपक्रमाला सुरवात केली. सुरवातीला उद्योगासाठी भांडवल उभे करणे आवश्यक होते. त्यासाठी प्रति महिला प्रति महिला ५० रुपये त्यानंतर प्रति महिला १०० रुपये याप्रमाणे तीन वर्षांत ६४ हजार रुपये भागभांडवल जमा झाले. हे भांडवल उद्योग उभारणीसाठी उपयुक्त ठरले. सन २०१६ पासून प्रति महिला २०० रुपये प्रमाणे २४ हजार रुपये बचत गटातील उद्योगाला भागभांडवल गोळा केले आहे.

बचत गटाचा प्रवास
सन २००८ मध्ये गटातील महिलांनी समूह पध्दतीने शेळीपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गटाने देना बॅंकेतून दोन लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. प्रत्येक महिलेच्या वाट्याला तीन शेळी आल्या.

महिलांनी घराजवळच शेळी पालन व्यवसाय सुरू केला. शेळी, बोकडांच्या विक्रीसाठी मिरज येथील जनावरांच्या बाजाराचा आधार घेतला. शेळी विक्रीतून पैसेही चांगले मिळाले. प्रत्येक महिलेला तीन वर्षांत ९० हजार रुपये मिळाले. त्यातून आत्मविश्‍वास वाढला. मिळालेली रक्कम बचत 
गटासाठी ठेवली. याच दरम्यान समूह पद्धतीने उद्योग न करता विविध उद्योग करण्याची कल्पना डोक्‍यात आली. प्रत्येक महिलांच्या आवडीनुसार व्यवसायाची उभारणी केली तर नक्कीच फायदा होईल, असे 
लक्षात आले.  त्यानुसार बचत गटाची बैठक झाली. या बैठकीला दिनदयाळ अंतोदय राष्ट्रीय उपजीविका योजनेच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले. त्यांच्यासमोर गटातील महिलांनी संकल्पना मांडली. महिलांना कोणते व्यवसाय करणे सोपे जाईल याबाबत चर्चा झाली. 

बचत गट ठरला फायद्याचा 
बचत गटाच्या प्रगतीबाबत सचिव नंदा सरगर म्हणाल्या की, बचत गटातील महिलांनी वेगवेगळे उद्योग सुरू केले आहेत. त्यामुळे आर्थिक प्रगती होत आहे. महिला प्रामाणिकपणे काम करत आहेत. 

याचा फायदा गटाला होतो. प्रत्येक विभागातील मिळणारी रक्कम पहिल्यांदा कर्जाच्या हप्त्याची रक्कम म्हणून दिली जाते. त्यानंतर उर्वरित रक्कम प्रत्येकाला समान दिली जाते. बचत गटामुळे आर्थिक स्थिरता आली. नवनवीन पूरक व्यवसायाला चालना मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com