पर्यावरण संवर्धन, शिक्षण अन्‌ सौरऊर्जेचा प्रसार

पर्यावरण संवर्धन, शिक्षण अन्‌ सौरऊर्जेचा प्रसार

पुणे शहरातील ‘गच्चीवरील माती विरहित बाग` ही संस्था केवळ परसबागेपुरती मर्यादित न रहाता लोकसहभागातून वनीकरण, नागरीक आणि शालेय विद्यार्थ्यांच्यामध्ये पर्यावरण जागृती, सेंद्रिय शेतमाल प्रचार आणि प्रसाराबाबत कार्यरत आहे. पुणे शहराबरोबरीने राज्यातील महत्त्वाची शहरे आणि ग्रामीण भागातही पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीमध्ये संस्थेने सदस्यांच्या मदतीने गती घेतली आहे.

पुणे शहरातील पर्यावरण संवर्धन आणि परसबाग तसेच गच्चीवर सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या हौशी लोकांच्या सहकार्याने संस्थेचे अध्यक्ष प्रमोद तांबे यांनी सात वर्षांपूर्वी गटाची स्थापना केली. दहा- पंधरा जणाच्या सहकार्याने सुरू झालेला हा गट फेसबुकच्या माध्यमातून एक लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोचला. गटाच्या उपक्रमास शाश्वत स्वरूप देण्यासाठी ‘गच्चीवरील माती विरहित बाग` या स्वयंसेवी संस्थेमध्ये रूपांतर झाले. आज फेसबुकच्या माध्यमातून राज्य, परराज्य तसेच परदेशातील हौशी परसबाग करणारे तसेच पर्यावरणप्रेमी अनुभवाची देवाण घेवाण करतात. शहरी तसेच ग्रामीण भागातील पर्यावरण संवर्धन, ओला आणि सुक्का कचरा व्यवस्थापन आणि वनीकरणाच्या प्रसारासाठी पुणे शहराच्या बरोबरीने मुंबई, नाशिक,औरंगाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर शहरातही पर्यावरण प्रेमी गट संस्थेच्या माध्यमातून तयार झाले आहेत. त्याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत.

उपक्रमांबाबत संस्थेच्या सचिव सौ. सायली माळवदकर म्हणाल्या की, संस्थेतर्फे पुणे शहराच्या विविध भागातील सोसायटी तसेच शाळांच्यामध्ये ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. तसेच व्हॉटसॲपवर आॅनलाईन प्रशिक्षणाची सुविधा आहे. प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापराएेवजी कापडी पिशव्यांच्या वापराबाबत जनजागृती करण्यात येते. संस्थेने भुगाव परिसरातील महिला बचत गटाला कापडी पिशव्यांची मागणी नोंदविली आहे. या पिशव्या भाजीपाला विक्रेते आणि दुकानदार तसेच ग्राहकांच्यापर्यंत पोचविल्या जाणार आहेत. 

परसबागेची मॉडेल्स 
शहरी भागातील लोकांची फुलझाडे, फळझाडे आणि भाजीपाला लागवडीची आवड लक्षात घेऊन संस्थेने पुण्यामध्ये विविध भागांत सदस्यांचे बंगल्यांचा परिसर तसेच गच्चीवर माती विरहित बागा तयार केल्या आहेत.  पालापाचोळा, आणि घरातील वाया जाणाऱ्या ओल्या कचऱ्याचे विघटन करून या बागा फुलविल्या आहेत. टेरेसवर विटांचे वाफे करून सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला उत्पादनाला सुरवात केली. काही जणांनी वाया जाणाऱ्या प्लॅस्टिक ड्रममध्ये अंजीर, पेरू, केळी, डाळिंब, चिकू, आवळा, पपई यासारख्या फळझाडांची लागवड केली. यातून कुटुंबाला काही प्रमाणात सेंद्रीय पद्धतीने पिकविलेला हंगामनिहाय भाजीपाला व फळांची उपलब्धता होते. 

संस्थेतर्फे दर महिन्याला पुणे शहरातील विविध भागांत प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. प्रशिक्षणामध्ये हंगामनिहाय भाजीपाला लागवड, सापळा पिके, मिश्र पिकांची लागवड, बागेचे व्यवस्थापन, सेंद्रिय कीडनाशकांचा वापर, विविध झाडांची ओळख, पर्यावरण संवर्धनासाठी उपयुक्त झाडांची लागवड याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते. विटांचा वाफा, प्लॅस्टिक ड्रम, कुंड्या तसेच रिसाकल गार्डन, भाजीपाल्याची परसबाग, विविध फुलांची बाग अशी मॉडेल्स संस्थेने तयार केली आहेत. दर महिन्याला  परसबाग भेट, कृषी महाविद्यालय रोपवाटिका, खासगी रोपवाटिका, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देऊन भाजीपाला, फळझाडांच्या व्यवस्थापनाबाबत चर्चा केली जाते. 

शालेय विद्यार्थांसाठी उपक्रम 
यंदाच्या वर्षी संस्थेने पुण्यातील पाच शाळांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन, ओला, सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन, कंपोस्ट निर्मितीसंदर्भात वर्षभर उपक्रमाचे नियोजन केले आहे. संस्थेने विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रमही तयार केला आहे. पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सीड बॉल निर्मिती उपक्रम राबविला होता. 

शेतकरी - ग्राहक थेट संवाद 
संस्थेच्या उपक्रमात प्रयोगशील शेतकरी सहभागी आहेत. त्यांच्याकडून सदस्यांना मार्गदर्शनही मिळते. परसबाग, टेरेसगार्डनमध्ये लागवडीसाठी भाजीपाल्याच्या पारंपरिक जातीचे बियाणे हे शेतकऱ्यांच्याकडूनच खरेदी केले जाते. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्याकडून सदस्य दरवर्षी ज्वारी, कडधान्ये, गहू, तांदूळ, आंबा, गूळ आदी शेतमालाची खरेदी करतात. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळतो. तसेच सदस्यांना खात्रीशीर शेतमाल मिळतो. 

बियाणे बॅंक उपक्रम  
पुणे शहरात सदस्यांच्या पुढाकारातून बियाणे बॅंक उभी होत आहे. यामध्ये विविध देशी भाजीपाल्याची बियाणे उपलब्ध असणार आहेत. बाग व्यवस्थापन आणि उपक्रमांची माहिती देण्यासाठी संस्थेने आॅनलाईन लायब्ररी तयार केली आहे. ना नफा - ना तोटा पद्धतीने सदस्य रोपांची देवाण, जीवामृत वाटप, निंबोळी अर्क, बियाणांची घेवाण करतात.

ग्रीन वाढदिवस  
संस्थेचे सदस्य वाढदिवसाच्या दिवशी पुणे शहरातील टेकडी परिसर तसेच नदीपात्रातील रस्त्याच्याकडेने वृक्षारोपण करतात. या रोपांची तीन वर्षे देखभाल केल्यामुळे रोपे जगण्याचे प्रमाण वाढले. काही सदस्य शहरातील शाळांना विविध रोपांची भेट देतात. 

पर्यावरणपूरक घर 
संस्थेचे अध्यक्ष प्रमोद तांबे यांचे पुणे शहरातील घर म्हणजे पर्यावरणपूरक प्रकल्पच आहे. याबाबत तांबे म्हणाले की, मी गेल्या ३५ वर्षांपासून सौर कूकर आणि अकरा वर्षापासून बायोगॅस वापरत आहे. बायोगॅस गच्चीमध्ये बसविलेला आहे. या बायोगॅसमध्ये शेण आणि दररोज स्वयंपाकातून वाया जाणारा भाजीपाला वापरतो. दररोज मला ३० मिनिटे गॅस मिळतो. गॅसच्या मंद आचेवर भाजी शिजवणे, दूध तापवणे, भाजणी अशी कामे होतात. दरवर्षी चार एलपीजी सिलिंडरची बचत होते. बायोगॅसमधून निघणारी स्लरी टेरेस गार्डनला खत तसेच कंपोस्ट खत निर्मितीसाठी वापरतो.
सौर ऊर्जेचा मी पुरेपूर वापर करतो. पाणी तापवण्यासाठी सोलर वॉटर हिटर आहे. आठ वर्षांपूर्वी मी १६० किलोवॅट क्षमतेचे सौर पॅनेल घरावर बसविले. यामुळे घरातील चार ट्यूब आणि चार दिवे प्रति दिन सहा तास चालतात. वीजबिलामध्ये सरासरी दरमहा शंभर रुपयांची बचत  होते. 

घराच्या टेरेसवर मातीविरहित बागेत हंगामी भाजीपाला, फुलझाडे आणि फळझाडांची लागवड केली आहे. यासाठी टाकाऊ थर्माकोल बॉक्स वापरले. बॉक्समध्ये पालापाचोळा भरतो. ओला कचरा, वाया जाणाऱ्या अन्नापासून व्हर्मी बीनमध्ये चाळीस दिवसांत आठ किलो खत गांडूळ खत तयार होते. मोठ्या थर्माकोल खोक्यात पालापाचोळा, ओला कचरा, निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करतो. यामुळे गेल्या तीस वर्षांपासून माझ्या घरातून ओला कचरा पालिकेच्या कचरा कुंडीत गेलेला नाही. पर्यावरणपूरक, सौर ऊर्जेचा पुरेपूर वापर आणि प्रदूषणमुक्त जीवनशैली मी जगतोय. याचे अनुकरण परिसरातील लोक करू लागले  आहेत.

 सौ. सायली माळवदकर - ९९२३४८१३४२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com