मटकी पिकाची करा वेळेत लागवड

मटकी पिकाची करा वेळेत लागवड

हरभरा, तूर, मूग, उडीद ही प्रमुख कडधान्य पिके असून, मटकीचा समावेश दुय्यम कडधान्य पिकामध्ये केला जातो. मटकीला वर्षभर मागणी असून, कमी लागवड क्षेत्र व उत्पादकतेमुळे वर्षभर चांगला बाजारभाव मिळतो. राजस्थानमध्ये खरीप हंगामात कमी पावसाच्या प्रदेशात रेतीयुक्त हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. राजस्थाननंतर लागवडीमध्ये महाराष्ट्राचा क्रम लागतो. उन्हाळी हंगामातसुद्धा या पिकाची लागवड करता येते.

मटकीमध्ये २५-२६ टक्के प्रथिनांचे प्रमाण असून, आहारात उसळ, पापड, नमकिन बनविण्यासाठी वापर होतो. 

या पिकाचा हिरवळीच्या खतासाठी व चारा पीक म्हणूनही लागवड करता येते. 
मटकीचे पीक जमीन लवकर झाकत असल्यामुळे उतार असलेल्या जमिनीत पावसाच्या पाण्याद्वारे मातीची होणारी धूप थांबविण्यासाठी मटकीची लागवड उताराला आडवी पट्टापेर पद्धतीने पेरणी केली जाते. 

मोट ४ ओळी - तूर एक ओळ आंतरपिक पद्धतीचासुद्धा अवलंब करता येतो. 

शिफारशीत जाती 
विदर्भासाठी मोट नं. ८८ (उत्पादन एकरी २-३ क्विंटल) 
पश्‍चिम महाराष्ट्रासाठी एमबीएस- २७ (उत्पादन एकरी ३-४ क्विंटल) 
मोट नं. ८८ हे वाण भुरी रोगास काही प्रमाणात बळी पडते, तर एमबीएस- २७ हे वाण भुरी रोगास काही प्रमाणात प्रतिकारक आहे.

जमीन 
हलकी - मध्य प्रकारची जमीन, कमी पाणी धारण क्षमतेची, पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा होणारी जमीन लागते. 
चोपण, क्षारयुक्त, पानथळ जमिनीत मटकीची लागवड करू नये. 
कमी पावसाच्या प्रदेशात या पिकाची लागवड मुख्यत्वे केली जाते.

मशागत 
जमिनीची खोल नांगरट करून पावसाच्या आगमनानंतर उभी - आडवी वखरणी करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी एकरी ५-६ गाड्या कुजलेले शेणखत टाकून, काडी-कचरा- धसकटे इत्यादी वेचून शेत तयार ठेवावे.

पेरणी कालावधी
साधारणतः ६०-७० मि. लि. पाऊस झाल्यानंतर जूनच्या अखेरपर्यंत पेरणी करावी. 
पिकाचा कालावधी ३.५ ते ४ महिन्यांचा आहे. ओलिताच्या शेतात रब्बी हंगामातील हरभरा अथवा गहू पीक घेण्यासाठी या पिकाची वेळेत पेरणी आवश्‍यक ठरते. 
उशिरात उशिरा ऑगस्टच्या मध्यापर्यंत या पिकाची लागवड करता येते.

बीजप्रक्रिया 
पेरणीपूर्वी २ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बन्डाझिम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी.

पेरणी 
मटकीची पेरणी तिफणीने, सरत्याने, पाभरीने अथवा काकरीच्या साह्याने करतात. 
एकरी साधारणतः ५-६ किलो बियाणे लागते. 
पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन झाडांतील अंतर १० सें.मी. राखावे. पेरणीची खोली ३-४ सेंमी. राखावी.
सलग पेरणीसाठी मूग, उडीद, सोयाबीनप्रमाणे प्रत्येक चौथी, पाचवी अथवा सहावी ओळ खाली ठेवून, नंतर डवऱ्याच्या फेरीवेळी गाळ पाडून घ्यावा. अशा पट्टापेर पद्धतीमुळे उत्पादनात १५-२० टक्क्यांपर्यंत वाढ शक्य होते. 

तणनियंत्रण 
तण व्यवस्थापनाच्या दृष्टीने सुरवातीचे ३०-४५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. नंतर पीक पूर्ण शेत व्यापत असल्याने तणांचा प्रादुर्भाव आपोआपच कमी होतो. पीक २० दिवसांचे व ३० दिवसांचे असताना डवऱ्याचा फेर द्यावा. यादरम्यान निंदणी करून ओळीतील तणांचा बंदोबस्त करावा.

खत व्यवस्थापन 
पेरतेवेळी एकरी ३० किलो डीएपी व साधारणतः १५ किलो एमओपी द्यावे. 
पेरणी वेळी एकरी ८ किलो गंधक दिल्यास फायद्याचे ठरते.

जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७ (श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com