सुधारित तंत्रातून साधतोय पीक उत्पादनात वाढ

अभिजित डाके
रविवार, 30 जुलै 2017

पीक उत्पादन वाढवायचे असले, तर सुधारित पद्धतीने पीक व्यवस्थापन तंत्राचा अवलंब फायदेशीर ठरतो. असाच काहीसा अनुभव देवराष्ट्रे (जि. सांगली) येथील बाबासाहेब महिंद यांचा आहे. ऊस पिकाला स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणेच्या वापराबरोबरीने प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने त्यांनी हंगामनिहाय पीक लागवडीचे गणित बसविले आहे. 

पीक उत्पादन वाढवायचे असले, तर सुधारित पद्धतीने पीक व्यवस्थापन तंत्राचा अवलंब फायदेशीर ठरतो. असाच काहीसा अनुभव देवराष्ट्रे (जि. सांगली) येथील बाबासाहेब महिंद यांचा आहे. ऊस पिकाला स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणेच्या वापराबरोबरीने प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने त्यांनी हंगामनिहाय पीक लागवडीचे गणित बसविले आहे. 

देवराष्ट्रे (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील बाबासाहेब भगवान महिंद हे पुणे शहरातील शाळेमध्ये २२ वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महिंद यांचे वडील भगवान महिंद यांनी शेती विकसित करण्यासाठी अपार कष्ट केले. त्यांची शेती २२ एकर; परंतु संपूर्ण माळरान. पाणी नसल्याने फक्त पावसावर तीन एकरावर पीक लागवड केली जायची. त्यामुळे कौटुंबिक खर्च भागवण्यासाठी वेळ प्रसंगी दुसऱ्याच्या शेतात काम आणि नांगरणीसाठी त्यांचे वडील जायचे. मुलांनी चांगले शिकावं, अशी इच्छा असल्याने त्यांनी शेतातून येणारा पैसा उभा केला. शाश्वत उत्पन्न मिळविण्यासाठी सन १९८७ मध्ये दोन एकर क्षेत्रावर हापूस, केसर, पायरी या आंबा जातींची लागवड केली; परंतु पाण्याचा प्रश्न सातत्याने भेडसावत होता. वडिलांनी कळशीने कलमांना पाणी घालून बाग जगवली आणि फळांपासून उत्पन्न सुरू झाले.  याच दरम्यान १९९३ साली बाबासाहेब महिंद यांना पुण्यामध्ये भारती विद्यापीठाच्या कन्या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी लागली. यामुळे वडीलच शेती पाहायचे. २००२ च्या दरम्यान ताकारी सिंचन योजना सुरू झाल्याने शेतातील विहिरीस पुरेसे पाणी उपलब्ध झाले. वडिलांनी सहा एकरावर ऊस लागवडीस सुरवात केली. दरम्यान, वडील आजारी असल्याने बाबासाहेब महिंद यांनी शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. सुधारित पद्धतीने शेती करायची ठरवून बाबासाहेब महिंद यांनी पहिल्यांदा परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांशी पीक लागवड आणि व्यवस्थापनाबाबत चर्चा केली. त्यांच्याकडून पीक नियोजनाचे गणित समजावून २२ एकर शेतीचा आराखडा तयार केला. 

सुधारित पद्धतीने ऊस  लागवडीचे नियोजन 

ऊस लागवडीबाबत बाबासाहेब महिंद म्हणाले, की ज्यावेळी आम्ही ऊस लागवड सुरू केली, त्या वेळी पारंपरिक पद्धतीने लागवड करायचो. उसाचे एकरी ३० ते ३५ टन उत्पादन मिळायचे. हे उत्पादन वाढविण्यासाठी मी सांगली जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या ऊस शेतीला भेटी दिल्या. आष्टा (जि. सांगली) येथील कृषिभूषण संजीव माने यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विविध शेतकऱ्यांच्याकडून ऊस लागवड पद्धती, शेतीचे नियोजन, खतांचा वापर, पाणी नियोजन याबाबत अभ्यासकरून स्वतःचे ऊस लागवड क्षेत्र किती असावे, याचे नियोजन केले. मी पुण्यात राहत असल्याने ऊस शेतीचे नियोजन सोपे होण्यासाठी शेतामध्ये मजूर कुटुंब ठेवले. गरजेनुसार भांगलण, मशागत, फवारणीच्या कामासाठी बाहेरील मजूर घेतले जातात. 

नियोजनातून शेती विकास 
शेतीच्या व्यवस्थापनाबाबत बाबासाहेब महिंद म्हणाले, की मी शनिवारी संध्याकाळी गावी जातो. रविवारी पुढील आठवड्यातील फवारणी, भांगलण, इतर पीक व्यवस्थापनाचे मी नियोजन करतो. मी संपूर्ण लागवड क्षेत्राचा नकाशा केला आहे. क्षेत्रानुसार पीक पद्धती ठरविली आहे. प्रत्येक क्षेत्राचा जमा-खर्च मी नोंदवून ठेवतो. त्यातून खर्चाचे गणित समजते, पुढील हंगामात त्यामध्ये प्रयोगशील शेतकऱ्यांशी चर्चाकरून सुधारणा करतो. 

चर्चासत्रामध्ये सहभाग 
पीक उत्पादनाच्या बरोबरीने महिंद पूरक उद्योगाच्या दृष्टीने प्रशिक्षण घेतात. रविवारी शेती किंवा पूरक उद्योगाबाबत चर्चासत्रे असल्यास त्यामध्ये ते सहभागी होतो. यामुळे नवीन माहिती मिळते. शेतीविषयक चर्चासत्रांबरोबरीने महिंद यांनी शेळीपालनाचे सात दिवसांचे प्रशिक्षण घेतले आहे. येत्या काळात शेळीपालन आणि सघन पद्धतीने आंबा बागेच्या लागवडीचे नियोजन केले आहे. महिंद यांनी शेतात राहणाऱ्या कुटुंबाला चार म्हशी घेऊन दिल्या आहेत. म्हशींचे दूध डेअरीला दिले जाते. पशुपालन व्यवसायातून मजुरांचा पगार काही प्रमाणात भागविला जातो. दरवर्षी किमान दहा ट्रॉली शेणखत मिळते. हे खत शेतीमध्ये वापरले जाते.

ऊस शेतीला ठिबक सिंचन 
ऊस पिकाच्या नियोजनाबाबत बाबासाहेब महिंद म्हणाले, की सहा एकरावर सबसरफेस पद्धतीने ऊस लागवड केली आहे. सात फुटांवर सबसरफेसची नळी टाकली आहे, तर उर्वरित सहा एकरांवर साडेचार फुटांवर सरी काढून को-८६०३२ जातीची लागवड केली आहे. याला ठिबक सिंचन केले आहे. पाणी, खत व्यवस्थापन सोपे जाण्यासाठी मी सन २०१४ पासून स्वयंचलित यंत्रणेचा वापर करत आहे. यामुळे १२ एकर ऊस शेतीचे नियोजन सोपे जाते. मला पुण्यातदेखील मोबाईलवर यंत्रणा चालू आहे की नाही, कोणता व्हॉल्व्ह सुरू आहे किंवा बंद आहे, याची माहिती मिळत असते. त्यानुसार मजुराकडून यंत्रणेचे नियोजन केले जाते. मातीपरीक्षण अहवाल आणि पीकवाढीचा टप्पा लक्षात घेऊन विद्राव्य खतमात्रा दिली जाते. यामुळे खर्चात बचत झाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून मी पाचटाचे आच्छादन करत आहे. तसेच पुरेसे शेणखतही जमिनीत मिसळले जाते. यामुळे मुरमाड जमिनीचा पोत सुधारत आहे. सबसरफेस केलेल्या क्षेत्रात उसाचे पीक सहा वर्षांपर्यंत घेणार आहे. पीक व्यवस्थापनाबाबत मला सोनहिरा साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी मारुती जाधव यांचे मार्गदर्शन मिळते. दर पंधरा दिवसांनी ते ऊस शेतीला भेट देतात. त्यानुसार पीक नियोजन सांगतात. गेल्या वर्षी सहा एकर उसामध्ये मी हरभरा, भुईमुगाचे आंतरपीक घेतले होते. आठवड्यातील मधल्या दिवसात शेतातील मजूर भांगलण, फवारणीचे नियोजन केलेले असते. योग्य ऊस व्यवस्थापनातून टप्प्याटप्प्याने मी एकरी ३० टनांच्यावरून ७० टनांवर गेलो आहे.

उर्वरित आठ एकर क्षेत्रापैकी खरिपात चार एकरांवर सोयाबीन लागवड असते. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे मला एकरी १२ क्विंटल उत्पादन मिळते. दीड एकरात उडीद, मुगाची लागवड करतो. रब्बीमध्ये दीड एकरावर गहू लागवड असते. गव्हाचे मला २० क्विंटल उत्पादन मिळते. त्यामुळे घरापुरता गहू, भुईमूग, उडीद, मुगाचे उत्पादन मिळते. दोन एकर जुन्या आंबा बागेतील फळे घरी, पाहुणे मंडळींना वाटतो. काही झाडे व्यापाऱ्यांना विकतो. गेल्या वर्षी आंब्या विक्रीतून मला पन्नास हजाराचे उत्पन्न मिळाले.