एक लाख हेक्टरने यंदा  हरभऱ्याचा पेरा वाढणार

एक लाख हेक्टरने यंदा  हरभऱ्याचा पेरा वाढणार

पुणे  - राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा किमान एक लाख हेक्टरने वाढविण्याची चिन्हे आहेत. कृषी विभागाकडून देखील हरभऱ्याखालील क्षेत्र वाढविण्यासाठी मोहीम हाती घेतली जाणार आहे.  

कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रतापसिंह यांनी रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा नुकताच घेतला. राज्यात हरभरा उत्पादनवाढीसाठी अतिशय अनुकूल स्थिती असल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामाचा एकूण पेरादेखील वाढण्याची चिन्हे आहेत, असे आढाव्याच्या वेळी सांगण्यात आले.  

कृषी विस्तार संचालक डॉ. एस. जाधव यांनी सांगितले, की 'गेल्या हंगामात राज्यात हरभऱ्याचा पेरा १८.९५ लाख हेक्टरवर झाला होता. यंदा सर्वत्र चांगला पाऊस असून ऑक्टोबरमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पेरा २० लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. मराठवाड्यासह नगर, सोलापूरचा काही भाग आणि विदर्भातील यवतमाळ, अमरावती, वाशीम, बुलडाणा जिल्ह्यात हरभऱ्याचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.

प्रचारप्रसार केला जाणार
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना हरभऱ्याकडे वळण्यासाठी कृषी विभागाच्या मोहिमेत तीन मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे. त्यात अनुदानित बियाण्याचे वाटप, पीक प्रात्यक्षिके आणि पीक संरक्षणविषयक उपायासाठी मार्गदर्शन अशा तीन स्तरांवर नियोजन केले जाणार आहे. बीजप्रक्रिया करून पेरा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असावा यासाठी प्रचारप्रसार करण्याचे कृषी आयुक्तालयाने ठरविले आहे.

हरभरा उत्पादनवाढीसाठी कृषी विभागांतर्गत मोहीम राबविली जाईल. त्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध नाही. तथापि, शासनाचा स्वतंत्र निधी मिळण्याबाबत आयुक्तालयस्तरावरून चाचपणी केली जाईल. 
-डॉ. एस. जाधव, कृषी विस्तार संचालक

पेरा वाढण्यासाठी अनुकूलता
''हरभरा पिकाकडे यंदा शेतकरीदेखील वळतील. दर्जेदार वाणांची उपलब्धता, बाजारभाव, संरक्षित पाण्याची चांगली स्थिती आणि मॉन्सूनचा दिलासादायक प्रवास या सर्व बाबी पेरा वाढण्यासाठी अनुकूल आहेत. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडापासून राज्यात हरभरा पेरण्यास सुरवात होईल. यंदा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरा चालू राहील, असेही डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com