पारंपरिक शेतीला दिली फळबागेची जोड

पारंपरिक शेतीला दिली फळबागेची जोड

अग्रण धुळगाव (जि. सांगली) येथे रावसाहेब आणि दादासाहेब कुंभार यांची वडिलोपार्जित अकरा एकर शेती आहे. २००३ पर्यंत त्यांची सात एकर द्राक्षबाग होती. वडील आणि दोघे बंधू ही बाग सांभाळत होते. परंतु, गाव परिसरात पाण्याचा प्रश्‍न बिकट झाल्याने द्राक्षबाग काढून टाकावी लागली. आवड असूनही पाणीटंचाईमुळे शेती करता येईना. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी काहीतरी करणे गरजेचे होते. यासाठी २००६ मध्ये त्यांनी पुणे गाठले. रावसाहेब यांचे कृषी पदविकापर्यंत शिक्षण झाले आहे, तर दादासाहेब हे बी.ए.एम एस. आहेत. पुणे शहरात आतेभावाच्या मदतीने रावसाहेब यांनी वाहतूक व्यवसायाला सुरवात केली. हळूहळू त्यात जम बसला, पुढे दोन्ही बंधू वाहतुकीचा व्यवसाय पाहू लागले. या व्यवसायामुळे आर्थिक परिस्थिती चांगल्यापैकी सुधारली.

शेतीमध्ये केली सुधारणा  
कुंभार बंधूचा पुण्यात वाहतूक व्यवसायाचा जम बसला होता, परंतु गावाकडील शेतीची आवड त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. गावी आई-वडील पारंपरिक पद्धतीनेच शेती सांभाळत होते. शेतीमध्ये नवीन काही तरी करावे, या उद्देशाने त्यांनी नवीन तंत्रज्ञान, पीकपद्धतीची माहिती घेण्यास सुरवात केली. कुंभार बंधुंनी २००८ मध्ये परिसरातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेत चार एकरांवर १४ फूट बाय १० फूट अंतरावर डाळिंबाच्या भगवा जातीची लागवड केली. बागेला पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी विहीर व कूपनलिकेची सोय केली. बागेच्या व्यवस्थापनासाठी दोन मजूर ठेवले. त्यामुळे आंतरमशागत, फवारणी, छाटणीचे नियोजन सोपे गेले. डाळिंब बागेमुळे दर शनिवार- रविवारी दोघा बंधुंचे गावाकडे जाणे सुरू झाले. सन २०१० पासून डाळिंबाचे टप्प्याटप्प्याने उत्पादन सुरू झाले. पहिल्यांदा एकरी दोन टन उत्पादन मिळाले. टप्प्याटप्प्याने २०१३ पर्यंत एकरी नऊ टनांपर्यंत उत्पादन गेले. प्रति किलो ८० रुपये दरही मिळाला. त्यामुळे डाळिंबातून नफा वाढला. हा नफा शेतीतच गुंतवला. परंतु, सन २०१४ मध्ये परिसरात डाळिंब बागांमध्ये तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे कुंभार बंधुंनी दोन एकर क्षेत्रांवरील डाळिंब बाग काढून टाकली. 

सेंद्रिय पद्धतीने बागेचे व्यवस्थापन 
सन २०१५ मध्ये साम टीव्हीवर कुंभार बंधुंनी सुभाष पाळेकर यांची नैसर्गिक शेती तंत्राबाबत मुलाखत एेकली. नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी दिल्या. विविध पिकांतील अनुभव जाणून घेतले. याबाबत रावसाहेब कुंभार म्हणाले की, आम्ही सन २०१५ पासून दोन एकर डाळिंबाला रासायनिक खते आणि कीडनाशकांचा वापर बंद केला. त्याएेवजी शेण, गोमूत्रापासून बनविलेले जीवामृत दर आठवड्याला देण्यास सुरवात केली. तसेच दशपर्णी अर्क, निंबोळी अर्काची फवारणी सुरू केली. बागेला ठिबक सिंचन केले. या काळात आमच्याकडे देशी गाई नव्हत्या. त्यामुळे पुणे शहराजवळील मित्राच्या गोशाळेतून आम्ही दर आठवड्याला गाडीतून १०० किलो शेण, १५० लिटर गोमूत्र गावी घेऊन जायचो. शेतावर जीवामृत तयार करून बागेला द्यायचो. आम्ही २०१५ मध्ये शेतावर गोठा बांधला. मित्राकडून चार गीर गाई घेतल्या. त्यामुळे आता पुरेशा प्रमाणात शेतावरच शेण, गोमूत्राची उपलब्धता होते. जीवामृत तयार करण्यासाठी १६०० लिटर क्षमतेची टाकी बांधली आहे. 

दर आठ दिवसांनी प्रति झाडाला सहा लिटर जीवामृत देतो. लहान ट्रॅक्‍टरला टाकी जोडून जीवामृत बागेत वाहून नेतो. दर चार दिवसांनी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्काची फवारणी करतो. त्यामुळे बाग चांगली तयार झाली. योग्य व्यवस्थापन केल्याने आता बागेत कीड, रोगांचा प्रादुर्भाव नाही. यंदाच्यावर्षी दोन एकरातून सहा टन डाळिंबाचे उत्पादन मिळाले. व्यापाऱ्यांना डाळिंब न विकता पुणे, पिंपरी शहरातील सोसायटीमधून दर शनिवार, रविवार ग्राहकांना प्रति किलो ८० रुपये या दराने थेट डाळिंबाची विक्री करतो. व्हॉट्‌सॲप ग्रुपवर डाळिंब उपलब्धतेची माहिती देत असतो. त्यामुळे ग्राहक मला फोन करून मागणी नोंदवितात.

ऊस उत्पादनात सातत्य 
ऊस व्यवस्थापनाबाबत कुंभार म्हणाले की, दीड एकरावर ऊस लागवड आहे. पट्टा पद्धतीने लागवड केली आहे. मला फुले - २६५ चे एकरी ७० टन आणि खोडव्याचे ५५ टन उत्पादन मिळते. उसाला पाटपाण्याने जीवामृताची स्लरी दर दहा दिवसांनी देतो. पाचटाचे आच्छादन करतो. त्यामुळे पाणी कमी लागते. जमिनीची सुपिकताही वाढली आहे. त्यामुळे उत्पादनात सातत्य आहे.

असे आहे कामाचे नियोजन 
शेतीच्या नियोजनाबाबत रावसाहेब कुंभार म्हणाले की, गावी आई, वडील असतात. त्यांचे शेतीवर लक्ष आहे. दर शनिवारी गावाकडे येऊन रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी पुण्याला परततो. शेतीच्या नियोजनासाठी दोन कायमचे मजूर आहेत. या मजुरांशी दररोज मोबाईलवरून संपर्क साधून आठवड्याच्या नियोजनाप्रमाणे दैनंदिन शेतीमधील कामाचा आढावा घेतला जातो. चर्चेतून पीक व्यवस्थापनात बदल केले जातात. 

सीताफळ, ड्रॅगन फ्रुटची लागवड 
 नवीन फळ पिकांच्या लागवडीविषयी माहिती देताना रावसाहेब कुंभार म्हणाले की, मी २०१६ मध्ये ३० गुंठेे क्षेत्रावर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. लागवडीपूर्वी या पिकाच्या व्यवस्थापनाची विविध शेतकऱ्यांच्याकडून माहिती घेतली. ११ फूट बाय ७ फुटावर लागवड केली. या रोपांना आधार दिला, ठिबक सिंचन केले आहे.  सन २०१७ मध्ये दोन एकर क्षेत्रावर सीताफळाच्या सुधारित जातीची १४ फूट बाय १४ फूट अंतराने लागवड केली.  बागेला ठिबक केले आहे. दोन्ही पिकांना दर दहा दिवसांनी जीवामृताची स्लरी देतो. त्यामुळे रोपांची चांगली वाढ होत आहे. 

गीर गाईंचा गोठा 
गाईंच्या व्यवस्थापनाबाबत रावसाहेब कुंभार म्हणाले की, सध्या माझ्याकडे चार गाई, तीन कालवडी आणि एक वळू आहे. दोन गाई दुधात आहेत. प्रतिदिन १८ लिटर दूध मिळते. सध्या कवठेमहांकाळमध्ये बारा लोकांना ७० रुपये लिटर या दराने दूध विक्री करतो. उरलेल्या दुधापासून तूप बनवितो. याबाबत मी स्वतः प्रशिक्षण घेतले आहे. पुणे शहरात प्रति किलो तीन हजार रुपये दराने तूप विक्री करतो. डिसेंबर ते जून या कालावधीत कवठेमहांकाळ शहरात स्टॉलवर ताकाची विक्री करतो.  माझी आई दररोज २० लिटर ताक तयार करते. गडी शहरात प्रतिग्लास दहा रुपये दराने ताकाची विक्री करतो. गाईंसाठी मुक्त संचार गोठा तयार करत आहे. हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी, ज्वारी, मका, नेपिअर गवताची लागवड केली आहे. सेंद्रिय पद्धतीनेच चारा उत्पादन घेतले जाते. 

रावसाहेब कुंभार, ९९२१९६९१९१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com