माठोरे यांनी वाढविला केसर आंब्याचा गोडवा

डॉ. टी. एस. मोटे
रविवार, 2 जुलै 2017

किशन माठोरे हे नांदेड येथील चार्टर्ड अकाउंटंट. शेतीच्या आवडीतून त्यांनी बोळेगाव (जि. नांदेड) येथे माळरानावर कष्टाने केसर आंबा बाग फुलविली. मित्राच्या सहकार्याने नांदेड शहरात फळविक्रीची स्वतंत्र व्यवस्था उभारली. परिसरातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी शेतीप्रगतीची दिशा पकडली आहे.

किशन माठोरे हे नांदेड येथील चार्टर्ड अकाउंटंट. शेतीच्या आवडीतून त्यांनी बोळेगाव (जि. नांदेड) येथे माळरानावर कष्टाने केसर आंबा बाग फुलविली. मित्राच्या सहकार्याने नांदेड शहरात फळविक्रीची स्वतंत्र व्यवस्था उभारली. परिसरातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी शेतीप्रगतीची दिशा पकडली आहे.

किशन भुजंगराव माठोरे यांची बरबडा (ता.नायगाव, जि. नांदेड) येथे वडिलोपार्जित दहा एकर शेती आहे. परंतु ही सर्व शेती जिरायती. लहानपणापासून त्यांना स्वतःची बागायती शेती असावी असे स्वप्न होते. हे स्वप्न सी.ए. झाल्यानंतर पूर्ण झाले. सन २००२ मध्ये बोळेगाव (ता. बिलोली, जि. नांदेड) गावी त्यांचे सासरे इरवंतराव हांद्रे यांच्या शेताशेजारील आठ एकर माळ जमीन विकत घेतली. या जमिनीच्या काही अंतरावर मांजरा नदी वाहत असल्यामुळे पुढील काळात पाण्याची सोय करता येण्यासारखी होती. जमीन खरेदीनंतर सन २००७ पर्यंत त्यांनी हंगामी पिकांची लागवड केली. किशन माठोरे हे सध्या नांदेडमध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत. बोळेगाव हे नांदेडपासून ८० किलोमीटरवर असल्याने त्यांनी दैनंदिन शेती व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी एक मजूर जोडपे ठेवले आहे. शेती विकास सुरू झाल्यानंतर दर शनिवार-रविवार शेती नियोजनासाठी त्यांच्या फेऱ्या सुरू झाल्या. शेती नियोजनात त्यांना सासऱ्यांचीदेखील मदत होते. प्रयोगशील शेतकरी तसेच कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांनी पीक बदलास सुरवात केली.

फळबागेचे व्यवस्थापन 
खत व्यवस्थापनाबाबत किशन माठोरे म्हणाले की, दर वर्षी जून महिन्यामध्ये आंबा कलमांना माती परीक्षणानुसार रासायनिक आणि सेंद्रिय खते दिली जातात. प्रत्येक झाडाला  रासायनिक आणि सेंद्रीय खतांच्या बरोबरीने ५० ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्ये, ५० ग्रॅम गंधक, अर्धा किलो लिंबोळी पावडर आणि २५ किलो शेणखत आळ्यामध्ये मिसळून दिले जाते. वाढीनुसार खत मात्रा वाढविली जाते. मी गेल्या तीन वर्षापासून कलमांना दर आठ दिवसांनी जीवामृत देत आहे. प्लॅस्टिक पिंपात २०० लिटर पाणी, १० लिटर गोमूत्र, १० किलो शेण, १ किलो बेसनपीठ आणि अर्धा किलो गूळ यांचे मिश्रण आठ दिवस योग्य पद्धतीने मिसळून ठेवले जाते. त्यानंतर नवव्या दिवशी प्रति कलमाला दहा लिटर जीवामृताची आळवणी केली जाते. यामुळे मुळांच्या परिसरात ओलावा टिकून राहिला आहे. जमीन भुसभुशीत झाली, जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढत आहे. मी रासायनिक खतांचा कमीतकमी वापर करतो. शेण, गोमूत्राची शेतावरच उपलब्धता होण्यासाठी चार लालकंधारी गाईंचे संगोपन केले आहे. उपलब्ध शेण आणि पालापाचोळ्यापासून गांडूळ खत निर्मितीला सुरवात केली. चार वाफ्यांमधून दर ४५ दिवसाला एक टन गांडूळ खताची उपलब्धता होते. हे खत कलमांना वापरतो. कीड, रोग नियंत्रणाबाबत किसन माठोरे म्हणाले की, प्रयोगशील शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांच्या सल्याने एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रणाच्या उपाययोजनांवर भर दिल्यामुळे खर्च कमी झाला.

शिवार फेरीतून तंत्रज्ञानाचा अवलंब 
किसन माठोरे हे सी. ए. असल्याने परिसरातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना ते आर्थिक सल्ला देतात. त्या माध्यमातून त्यांची परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांशी चर्चा होते. दर रविवारी परिसरातील शिवारफेरी, चर्चासत्रांमध्ये ते सहभागी होतात. दरवर्षी पीक व्यवस्थापनात बदल करून गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यावर त्यांचा भर आहे.

फळबाग लागवडीचे नियोजन 
फळबागेबाबत किशन माठोरे म्हणाले की, बोळेगाव शिवारात पाणी तसेच मजूर टंचाई होती. त्यामुळे हंगामी पिकांची लागवड आणि व्यवस्थापनाला मर्यादा होती. त्यामुळे मी फळबाग लागवडीचा विचार केला. सन २००७ मध्ये मे महिन्यात आठ एकर क्षेत्रामध्ये जेसीबीने २० फूट  x २० फूट अंतरावर योग्य आकाराचे खड्डे खोदले. या खड्ड्यात शेणखत, मातीचे मिश्रण भरले. याच दरम्यान फळबागेला पाणी पुरवठ्यासाठी एक कूपनलिका घेतली. परंतु त्याला फक्त अर्धा इंच पाणी लागले. याच पाण्याच्या भरवशावर फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. सप्टेंबर महिन्यात पाच एकरावर आंबा (केसर, दशहरी), एक एकर चिकू (कालीपत्ती), एक एकर सीताफळ (बाळानगरी), एक एकर लिंबू (कागदी लिंबू) या फळपिकांची लागवड केली.  पहिल्या वर्षी उन्हाळ्यात फळबागेतील कूपनलिकेस हापसा बसून मजुरांच्या करवी घागरीने कलमांना पाणी दिले. परंतु पाणी कमी पडत असल्याने दुसऱ्या वर्षीपासून शेजारील शेतकऱ्याकडून पाणी विकत घेऊन पाणी दिले. याच दरम्यान मांजरा नदीशेजारी थोडी जमीन घेऊन तेथे कूपनलिका घेतली. तेथून शेतापर्यंत एक हजार फुटाची पाइपलाइन केली. संपूर्ण फळबागेला ठिबक सिंचन केल्यामुळे कलमांना पुरेसे पाणी मिळू लागले. फळपिकांच्या लागवडीनंतर पहिले पाच वर्षे सोयाबीन, तूर, मूग, उडीद या आंतरपिकांची लागवड केली. त्यातून काही प्रमाणात फळबाग व्यवस्थापनाचा खर्च निघाला. पहिली चार वर्षे आंब्याचा मोहोर खुडला. त्यामुळे कलमांची चांगली वाढ झाली. 

मित्राच्या सहकार्याने फळांची विक्री 
आंबा विक्रीबाबत माठोरे म्हणाले की, आंबा विक्रीसाठी अनिल पडवळ यांची मदत होते. पडवळ सिंचन खात्यात शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी देखील चांगली केसर आंबा बाग जोपासली आहे. ते सुरवातीपासून नांदेड शहरात आंब्याची स्वतः विक्री करतात. मला पाचव्या वर्षी पाच एकर क्षेत्रातून पहिले उत्पादन दोन टनांचे झाले. ही बाग व्यापाऱ्याने केवळ २५ हजाराला मागितली होती. परंतु अनिल पडवळ यांच्या सहकार्याने मी स्वतः नांदेड शहरात फळांची विक्री केल्याने ८० हजारांचे उत्पन्न मिळाले. आता दरवर्षी त्यांच्या सहकार्याने आंबा विक्रीचे नियोजन केले जाते. पहिल्या उत्पन्नातून मी मशागतीसाठी मिनी पॉवर टिलर खरेदी केला.  सकाळी लवकर किंवा दुपारी ऊन कमी झाल्यावर फळांचे बोटभर देठ ठेवून तोडणी केली जाते. फळे स्वच्छ पाण्यात धुवून स्वच्छ फडक्याने पुसून सावलीत ठेवली जातात. त्यानंतर फळे रायपनिंग चेंबरमध्ये पिकविण्यास ठेवतो. अनिल पडवळ यांनी रायपनिंग चेंबर बसवले आहे. यामध्ये शास्त्रीय पद्धतीने कोणत्याही रसायनांचा वापर न करता आंबे पिकविले जातात. आंबा विक्रीसाठी नांदेड शहरातील पाच दुकानदार आम्ही निवडले आहेत. या दुकानदारांना १५ टक्के कमिशन दिले जाते. ग्राहक या दुकानातून आंबा खरेदी करतात. यामुळे आमचा आर्थिक नफा वाढला.  पाच वर्षांनी पाच एकरातून पहिल्यांदा दोन टन, त्यानंतर सात टन, दहा टन असे उत्पादन वाढत गेले. सहाव्या वर्षी फळांचे बारा टन उत्पादन मिळाले. यातून खर्च वजा जाता ४.५ लाखांचे उत्पन्न मिळाले. पाचव्या वर्षी फळांचे चांगले उत्पादन होते, परंतु पाऊस, गारपीट, वादळामुळे नुकसान झाले होते. यंदाच्या हंगामात हवामान बदलाच्या परिणामामुळे उत्पादनात घट आली. परंतु मित्राच्या सहकार्याने स्वतः फळांची विक्री करत असल्याने उत्पन्न चांगल्यापैकी मिळते. आंबा पिकाच्या बरोबरीने सीताफळ, चिकूचे काही प्रमाणात उत्पादन सुरू झाले आहे. येत्या काळात या फळांपासूनही चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा आहे.