शेतीतली अटळ संकटं

शेतीतली अटळ संकटं

या वर्षी तीन पेरण्या वाया गेल्यानंतर चौथ्यांदा जोंधळा पेरला. चांगली उगवण झाली म्हणून खूष होतो. दोन मोठे पाऊस पडले. निम्म्यापेक्षा जास्त रोपं जळून गेली. नंतर थोडं खत टाकून पाणी दिलं. ज्वारी मस्त दिसू लागली. उन्हाळ्यात म्हशींना हिरवा चारा मिळणार म्हणून खूष होतो. पण परवापासून या आनंदाची जागा काळजीनं घेतली. डुकरं आहेत की हरीण, नेमका अंदाज येत नाही. मध्यरात्रीनंतर कधीतरी, कोणता तरी पशू ज्वारीत येऊन मोठी धाटं मोडतोय. पानं खात नाही. धाटं चावून चोथा करतोय. रात्री, सकाळी कुत्रे घेऊन चकरा मारल्या; पण उपयोग झाला नाही. बघायचं किती नुकसान होतंय ते. शेतीत कधी काय प्रश्न तयार होईल, ते सांगता येत नाही. 

आठवडा उलटला तरी जोंधळ्याची धाटं कातरून बुडाचा भाग चघळणारा प्राणी कोणता याचा शोध लागला नाही. निरीक्षणातून काही गोष्टी स्पष्ट झाल्यात. हा प्राणी डुक्कर नाही. कारण तो डुकराप्रमाणे विध्वंस करत नाही. हा प्राणी बहुतेक पहाटेच्या वेळेला येतोय. एका टप्प्यात ज्वारीचे पंचवीस-तीस धाटं कातरतो. गर तयार झालेली तेवढी कांडी चघळतोय. सगळा रस गिळून चोथा तिथंच टाकतोय. सगळं शिस्तीत. हरीण किंवा ससाही असं करीत नाही. त्यामुळे आमचा संशय सायाळ किंवा मरलांगी या दोघांवर आहे. रात्री कुत्रे घेऊन फेरफटका मारणे, परिसरातील गवतात शोध घेणे, रात्री विजेऱ्यांचा प्रकाश ज्वारीवर टाकणे, फटाके फोडणे, वावरात जाळ करणे या उपायांचा काहीही परिणाम झाला नाही. 

नेमका हा प्राणी कोणता, याचा शोध घेण्याची इच्छा तीव्र झालीय. बघू या आज रात्री काय घडते ते.

तो अज्ञात प्राणी रानडुक्करच असावा असा संशय बळावलाय. ठरल्याप्रमाणे पावणेआठ वाजता भरतमामांचा मिस्ड कॉल आला. मी बूट घालून, विजेरी घेऊन तयारच होतो. डुकरांसाठी खास बनवलेले बेसनचे लाडू घेऊन निघालो. डुक्कर ज्वारीत प्रवेश करायच्या संभाव्य जागा लक्षात घेऊन अकरा ठिकाणी लाडू ठेवले. सगळ्या ज्वारीत फिरून आजूबाजूच्या गवतात पाहणी केली. या वेळेपर्यंत तरी कुठला प्राणी ज्वारीत आला नव्हता. मामा मला बोलले, ‘‘सर, रात्री आपले कुत्रे भुंकू लागल्याचं कोणाच्याही कानावर आलं, तरी लगेच फोन करायचा. आज डुकराचा पिच्छा करू.’’ मी म्हटलं, की कधीही फोन करा, पाच मिनिटांत मी येतो. 

डुकरांच्या बंदोबस्तासाठी काय काय करायचं याबाबत बोलत आम्ही परतत होतो. अचानक वावराच्या पूर्वेकडे काही तरी वेगळा आवाज आमच्या कानावर आला. दोघेही लगबगीने विजेरीचे झोत टाकत तिथे पोचलो. गवतात दोन लालभडक डोळे चमकले. मामा इथं काही तरी आहे, असं म्हणेपर्यंत तो प्राणी पुढं तुरीत शिरला. आम्ही आरडाओरडा केल्यानंतर तो पुन्हा ज्वारीकडं वळला. आमच्याकडे एकच विजेरी होती. हातात कसलंच हत्यार नव्हतं. असं पुढे घुसणं रिस्की होतं. मी मामाला अलीकडं मुरमाच्या ढिगाऱ्यावर उभं करून पळतच शेडकडं आलो. दुसरी विजेरी, कत्ती व साखळीला बांधलेल्या टायगर कुत्र्याला घेऊन गेलो. आता दोघाकडंही विजेऱ्या होत्या. मामाकडं कत्ती अन् माझ्या हातात टायगरची साखळी. टायगरला वास येत असावा. तो प्राणी ज्या ज्या भागातून गेला त्या भागात वास घेत तो पळू लागला. जोंधळ्याला राउंड मारल्यानंतर, तो पिवळ्याच्या वावरात घुसला. त्या रानात सगळी धसकटं आहेत. त्यासोबत मी पळत होतो. मामा वरच्या भागात होते. टायगर वेगानं तुरीत घुसला. दिवसाउजेडी या तुरीतून जाता येत नाही. त्यातून टायगर मला ओढत होता. मामाला ओरडून मी तुरीकडं लवकर यायला सांगितलं. आमच्या पाठोपाठ मामाही आले. मी अंगावर टी शर्ट घातला होता. काटेकरेलीच्या गवताचे काटे उघड्या हाताला ओरबाडत होते अन् खाली कुसळी टोचत होती. टायगर थांबायला तयार नव्हता. तसाच तो शेजारच्या शेतात शिरला अन् थांबला. परत फिरला. पुन्हा वास घेत निघाला. एखाद्या सिनेमात शोभावा असा हा थरार पाऊण तास चालला. शेवटी परत फिरलो. गार वातावरणातही टी शर्ट ओला झाला होता. आता कपड्यात अडकलेली कुसळं काढण्यासाठी अर्धा तास तरी लागेल.

रात्रीच्या थरारानंतरही त्या अज्ञात प्राण्याने ज्वारी कातरलीच. कुत्रे भुंकू लागले म्हणून आम्ही पुन्हा एक चक्कर मारली. पुन्हा कुत्रे भुंकले नाही. त्यामुळे तो प्राणी आला नसावा, असं गृहीत धरून होतो. सकाळी सवितासोबत चक्कर मारली तेव्हा त्याच पद्धतीने एका सलग तुकड्यात ज्वारी कातरली होती. मी हाक मारून भरतमामांना बोलावून घेतलं. सगळी परिस्थिती बघून मामांनी त्यांचं कालचं मत बदललं. ‘‘सर, हे डुक्कर नाही. कारण डुक्कर खाण्यापेक्षा जास्त नुकसानी करतं. शंभर- शंभर फूट जमीन उकरतं. खड्डे पाडतं. हे इथं काहीच दिसत नाही. हा प्राणी थाटं मोडून, कातरून ते चघळून रस पितोय. म्हणजे ही मरलांगी आहे,’’ मामा म्हणाले. त्यांच्या निष्कर्षाला मी सहमती दाखवली. रात्री मला सावलीप्रमाणे दिसलेल्या प्राण्याचे डोळे लाल होते. मरलांगीचे डोळे लाल असतात. म्हणजे आता मरलांगीचा बंदोबस्त कसा करायचा, याचा विचार करावा लागेल. 

ज्वारी कातरणाऱ्या अज्ञात प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी अघोरी उपाय करायला मन तयार नव्हतं. त्या प्राण्यानं ज्वारीचं नुकसान करू नये, एवढा बंदोबस्त करायचा होता. त्यात आमच्या चारचाकीचा चालक व शेतातला सहकारी नरेश शिंदे याला अभिनव कल्पना सुचली. रात्री दीड-दोन तासांच्या अंतराने मोठ्या फटाक्याचे (बॉम्ब) आवाज केले, तर तो प्राणी घाबरून पळून जाईल, ही त्याची कल्पना. यासाठी रात्रीचं जागरण कोण करणार? नरेशने भन्नाट आयडिया काढली. मच्छर अगरबत्तीचे वेगवेगळ्या लांबीचे तुकडे केले. दोऱ्याने बाँब अगरबत्तीला जोडला. अगरबत्ती जळत बुडापर्यंत आली, की बाँबचा स्फोट होणार. परवा असे पाच बाँब त्यांनी लावले. त्या प्राण्याने ज्वारी कातरायला सुरू करताच, बाँबचा स्फोट झाला असावा. तीन-चार धाटं त्याने कातरली होती. प्रयोग यशस्वी झाला होता. 

पण हा प्राणी कोण, हा सस्पेन्स कायम आहे. सायाळ की मरलांगी? कळेल. कदाचित नाहीही.

रात्री सतत कुत्री भुंकू लागली, की लक्ष द्यावं लागतं. आसपास अज्ञात सजीवांच्या हालचाली चालू असतात. रानडुकरं, मरलांगी, सायाळ असे काही प्राणी अंधारातच खाद्य शोधतात. वासावरच आपलं खाद्य कुठं आहे ते त्यांना बरोबर कळतं. कुत्र्यांना या अज्ञातांचं आगमन कळतं. त्यांचं जोरदार भुंकणं सुरू होतं.

सुरवातीला आठवडाभर मरलांग्यांनी ज्वारीचं नुकसान केलं. बरेच प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर, भरतमामानी विषारी लाडू ठेवले. दोन दिवसांत एकापाठोपाठ एक- दोन मरलांग्या मेल्या. सुटकेचा नि:श्वास सोडण्याच्या आतच तिसऱ्या दिवशी ज्वारीचं मोठं नुकसान झालं. हे नुकसान करणारी रानडुकरं असल्याचं लक्षात आलं. एक दिवसाच्या खंडानंतर पुन्हा काल डुकरांनी मोठी धाटं मोडून बरंच नुकसान केलं. काल ज्वारीच्या चारही बाजूंनी बाइंडिंग तारेचं कुंपण केलं. तारेला डुकरं घाबरतात, हा यापूर्वीचा आमचा अनुभव आहे. 

जोंधळा पोटऱ्यात आलाय. कणसंही बाहेर पडताहेत. इथं आलं, की सगळी उदासी, अस्वस्थता गायब होते. सगळं जग विसरून जातो मी. आज सकाळी साडे-सहा वाजता, ज्वारीच्या वावरात पोचलो. शेकडो पक्षी ज्वारीत विहरत होते. चिमण्या, कावळे, व्हले, टिटव्या, सारंगी, पोपट असे कितीतरी प्रकारचे पक्षी. चिमण्यांचेच आठ- दहा प्रकार असावेत. काळ्या, पांढऱ्या, गळ्याला काळे पट्टे असलेल्या, काही एकदम पिटुकल्या; पण तेवढ्याच धिटुकल्या. मी ज्वारीतून फिरत असतानाही त्या घाबरत नव्हत्या. मी काही वेळ हाई.. हुई करून पाहिलं. पण, त्यांच्यावर काही परिणाम होत नव्हता. मी गळ्यात अडकवलेली शिट्टी जोरजोरात वाजवली, तिचा थोडासा परिणाम झाला. माझ्या जवळपासचे पक्षी उडून थोड्या अंतरावरील ज्वारीवर जाऊन बसले. मी तासभर ज्वारीत फिरत होतो. माझ्या लक्षात आलं, या पक्ष्यांपासून ज्वारीचा बचाव करणं अशक्य आहे.

मी स्वतःला बुद्धिवादी, नास्तिक वा आणखी काही समजत असलो, तरी त्याचा इथं उपयोग नाही. शेतकरी हा शेतकरीच असतो. सगळी हतबलता समजून घेऊन मी अधिक उदार (उदास) होतो. माझ्यातली माणुसकी वाहू लागते. माझा शेतातला सहकारी म्हणतो, ‘‘बघा सर आपूण काई बी केलो, तरी आपल्या नशिबात हाय तेवढंच मिळणार!’’ मी चिमण्या राखायला माणूस बघायचं सुचवतो. मामा बोलले, ‘‘एकतर माणूस मिळणं अवघड हाय. मिळालं तर त्याचा रोजगार परवडणार नाही.’’ मी म्हटलं, ‘‘बरोबर आहे. दाणे दाणेपर लिखा है खानेवाले का नाम. मामा ज्यानं दाणा जमिनीत पेरला, पाणी, खत देऊन  वाढवलं, त्याचं नाव कसं काय नाही या दाण्यावर?’’ मामाकडं माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मामाकडं काय, कोणाकडंच याचं उत्तर नाही.

माणूस म्हणून प्रत्येकाला आपल्या मालमत्तेचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे. प्रसंगी यासाठी माणसं दुसऱ्या व्यक्तीची हत्याही करतात. स्वसंरक्षणासाठी म्हणून ती क्षम्यही ठरते; पण शेतकऱ्यांना पीक वाचवण्यासाठी पशु-पक्ष्यांची हत्या करण्याची परवानगी नाही. हरीण, मोरांनी कितीही उच्छाद मांडला, तरी त्यांच्याविरुद्ध कठोर प्रतिबंधक उपाय योजता येत नाही. अनवधानाने जरी मोर, हरीण दगावले, तरी थेट जेलमध्ये रवानगी. सगळ्यांना जगवण्याचा, निसर्गाचा समतोल टिकवण्याचा सगळा मक्ता फक्त आणि फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय. गळफास घेऊनही ते ही जबाबदारी पार पाडताहेत. त्यांच्याविषयी सहानुभूतीचे चार शब्द व्यक्त करण्याइतकीही दानत समाजाकडे राहिलेली नाही.

माझं विचारचक्र एका सुंदर चिमणीनंच तोडलं. तिची चिवचिव वेगळीच होती. वावरातून बाहेर पडताना मी मनाशीच बोललो, की मी उगीच काहीतरी विचार करतोय. मी जोंधळा ज्वारीसाठी थोडाच पेरलाय? वैरण, चारा तर मिळणार आहेच की. अन् पुन्हा मी समाधानाने हसलो.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com