शंभर टक्के सेंद्रिय, सुपीक शेतीची पंचविशी

शंभर टक्के सेंद्रिय, सुपीक शेतीची पंचविशी

सुमारे २५ वर्षांपासून सेंद्रिय शेतीची परंपरा जपलेले शेतकरी म्हणून नगर जिल्ह्यातील आश्वी येथील राजेंद्र प्रल्हाद सांबरे यांचे नाव घेता येईल. विविध पिकांचे प्रयोग सेंद्रिय पद्धतीने करताना ऊस, कडधान्ये, भाजीपाला या पिकांवर सध्या भर दिला. आज त्यांच्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढला आहे. जमीन सुपीक झाली आहे. ‘बळिराजा’नावाने परिसरातील सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांचा गट तयार करून त्यामार्फत सेंद्रिय उत्पादनांनाही मार्केट मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

नगर जिल्ह्यातील आश्वी बु. (ता. संगमनेर) येथील राजेंद्र सांबरे यांची १४ एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्यांचे कुटूंब पूर्णपणे शेतीवरच अवलंबून असणारे. राजेंद्र यांनी १९९० च्या सुमारास महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पदवी घेतली. त्या वेळी रासायनिक पद्धतीनेच पिके घेऊ लागले. ऊस हे त्यांचे मुख्य पीक आहे. रासायनिक खतांचा वापर करूनही उसाचे एकरी ३५ ते ४० टनच उत्पादन मिळायचे. अति पाणी व खतांमुळे जमिनी खराब झाल्या होत्या. 

अशीच शेती चालू राहिली तर आपण संकटात येऊ असे राजेंद्र यांना वाटले. याला पर्याय शोधताना सेंद्रिय शेती प्रयोगाविषयी मोहन देशपांडे यांचे पुस्तक वाचण्यात आले. जमिनीच्या सुपीकतेकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले गेलेले नसल्याचे लक्षात आले. दोन वर्षे रासायनिक शेतीचा अनुभव घेतल्यानंतर मात्र राजेंद्र सेंद्रिय शेतीकडे वळले. 

सेंद्रिय शेतीचे धडे   
सेंद्रिय शेतीची सुरवात वीस गुंठ्यांवरील चारा पिकापासून केली. दुसरा प्रयोग बाजरीचा केला. बीजसंस्कार करून पाऊस उशिरा झाल्याने अगदी ऑगस्टमध्ये बाजरी घेतली. एकरी १० क्विंटल उत्पादन मिळाले. अमृतपाणी देऊन उसाचे एकरी ४५ टन उत्पादन मिळाले. हळूहळू प्रयोगांची व्याप्ती वाढू लागली. सेंद्रिय खते, गांडूळ खत यांचा वापर सुरू केला. उत्पादनखर्च कमी होईल याकडे लक्ष दिले. सेंद्रिय शेतीचे प्रयोग सुरू करण्यापूर्वी केवळ एकदाच वडाखालील दहा किलो माती एकरी या प्रमाणे वापरली. या मातीत आपल्या जमिनीत वाढणाऱ्या स्थानिक गांडूळांची विष्ठा असते. या मातीच्या वापराने शेतात गांडूळांची संख्या झपाट्याने वाढते. वडातून स्त्रवणारे घटक या मातीत असतात. 

अमृतपाण्याचा वापर
यात २५० ग्रॅम देशी गायीचे तूप, ५०० ग्रॅम मध, दहा किलो देशी गायीचे शेण व दोनशे लिटर पाणी यांचा वापर होतो. जमीन ओली असताना ते दिले जाते. जमीन सजीव करण्याचे ते शास्त्र असल्याचे राजेंद्र म्हणतात. या घटकामुळे कोट्यवधींच्या संख्येत जमिनीत जीवाणूची संख्या वाढते. माझे माती तपासणीचे अहवाल याची पुष्टी देतात असे ते म्हणतात. बाजरी, सोयाबीन यांना एकदाच, गव्हाला दोनवेळा तर उसात पहिल्या चार ते पाच महिन्यांपर्यंत तीनवेळा अमृतपाणी दिले जाते. बीजसंस्कार हादेखील महत्त्वाचा भाग मानतात. जे बियाणे कंद किंवा कांड्याच्या स्वरुपात असते उदा. हळद, ऊस, असे बियाणे अमृतपाण्यात बुडवून लावले जाते. 

रोग- कीड नियंत्रण
देशी गोमूत्र पाण्यात मिसळून एक, तीन किंवा पाच टक्के या पध्दतीने फवारणी केली जाते. दर आठ ते दहा दिवसांनी गरजेनुसार हे नियोजन होते. दशपर्णी अर्क, निंबोळी अर्कदेखील तयार करून वापरला जातो.  

उत्पादन
सेंद्रिय घटकांच्या वापरातून निरोगी पीक येते. राजेंद्र म्हणतात की उत्पादनखर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे ही माझी उद्दिष्टे आहेत. सुमारे २५ वर्षांपासून एकही ग्रॅम रासायनिक खते, कीडनाशके यांचा वापर केलेला नाही. सात वर्षांपासून उसात आंतरपिके हे सूत्र बसविलेले. उसात सोयाबीन, गहू, हरभरा, चारा पिके घेतली. आज उसाचे एकरी ८० ते ८५ टन उत्पादन मिळते. सोयाबीन, बाजरीचे एकरी १० क्विंटलपर्यंत तर गव्हाचे १४ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते असे राजेंद्र सांगतात. उसाच्या को ७४० जातीचे पट्टा पध्दतीने, पाचटाचे आच्छादन तसेच घरच्या शेणखताचा वापर करून एकरी ६५ टन उत्पादन घेतले. खोडव्यात पाचटाचे अाच्छादन ठेवून ५० ते ६० टन उत्पादन मिळाले. आज उसाबरोबर कडधान्ये, थोड्या प्रमाणात भाजीपाला व चारा पिके हीच पीक पध्दत आहे. 

उत्पादन खर्च
बाहेरून काही विकत आणायाचे नाही हा आपल्या शेतीचा आत्मा असल्याचे राजेंद्र सांगतात. रासायनिक शेतीत १०० रुपये खर्च असल्यास आपल्या शेतीत तो ४० रुपयांपर्यंतच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

गोबर गॅस 
सन १९८५ मध्ये शासकीय योजनेतून बनविलेला गोबरगॅस प्रकल्प आहे. त्याची टाकी आज फायबरची आहे. त्यातून घरची इंधनाची गरज भागते. मिळणारी स्लरी शेतात खत म्हणून वापरता येते. 

शेतीत झालेला फरक 
सेंद्रिय शेतीचे प्रयोग अनेक वर्षांपासून सुरू असल्याने मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जे पूर्वी शून्याच्या आसपास होते ते पावणेदोन टक्क्यांपर्यंत गेल्याचे माती परिक्षणाचा अहवाल सांगतो. सेंद्रिय कर्ब चांगला असेल तर पाण्याचा ताण बसला तरी पिके तो सहन करतात.    

जमीन सच्छिद्र झाली आहे. पूर्वी ८.२ ते ८.४ असलेला पीएच सातपर्यंत आला आहे. 
पूर्वी या जमिनीतून चालताना ढेकळे टोचत. आता जमीन एकदम मऊ लागते. अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढले आहे. 

जमीन एका नांगरटीत तयार होत नव्हती. आता नांगरट करणेच बंदच केले आहे. 

शेतकरी कंपनीची स्थापना 
 राजेंद्र यांच्या प्रयत्नांतून संगमनेर येथे बळिराजा फार्मर्स ही शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाली आहे. इर्जिक आॅरगॅनिक स्पॉट नावाने गटातील सदस्यांकडील उत्पादनांची विक्री होते.  काळभात, इंद्रायणी हातसडीचा तांदूळ, गावरान देवठाण बाजरी, सर्व डाळी, मध, आवळा व करवंद ज्यूस आदी उत्पादनांची विक्री केली जाते. वर्षाला त्यातून चांगले उत्पन्न मिळते. गटात अकोले व संगमनेर परिसरातील पाचशे सभासद आहेत. पुण्यातील गो विज्ञान संस्था व एका खाजगी कंपनीतर्फे मांजरसुंबा (ता. नगर) या दत्तक गावात सेंद्रिय शेती विकासाची जबाबदारी राजेंद्र यांच्यावर आहे. पुण्यातील ग्राम परिवर्तन आणि पाणी पंचायत संस्थेचे ते सदस्य आहेत.   

राजेंद्र सांबरे - ९९२२७१११२४  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com