शिक्षण, आरोग्याचा वसा जपणारी उत्कर्ष ग्रामविकास संस्था

शिक्षण, आरोग्याचा वसा जपणारी उत्कर्ष ग्रामविकास संस्था

विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांची कर्मभूमी ही वर्धा जिल्ह्याची ओळख. विनोबांनी आपल्या संघर्षमय जीवनातील बराच कालावधी पवनार परिसरात व्यतीत केला. त्यांचा आश्रमदेखील या गावाच्या परिसरात आहे. समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांच्या पवनार मध्ये २००५ मध्ये उत्कर्ष ग्रामविकास संस्थेची नोंदणी करण्यात आली. संजय गांडोळे हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये डॉ. वंदना वैद्य (उपाध्यक्ष), विक्रांत जिंदे (सचिव), संजय ठाकरे (कोशाध्यक्ष), राजू डगवार, अजय गांडोळे, सुरेश मुडे, शालूताई काळे यांचा समावेश आहे. ग्रामविकासाला पूरक उपक्रम राबविण्यावर संस्था पदाधिकाऱ्यांचा भर राहिला आहे. प्रामुख्याने गरजू विद्यार्थांना शिक्षणासाठी मदत, गरजू लोकांसाठी आरोग्य शिबिर आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणावर सध्या संस्थेने भर दिला आहे.

पर्यावरण संरक्षणाकरिता वृक्षारोपण
शिवाराच्या बांधावर पूर्वी मोठ्या प्रमाणावर वृक्ष होते, परंतु अलिकडच्या काळात आर्थिक उत्पन्न मिळविण्याच्या लालसेने बांधावरील झाडांची तोड केली जाते. परिणामी, वातावरणात बदल होत असल्याने त्याचा फटका कृषी क्षेत्रालाच अधिक बसला आहे. या पार्श्‍वभूमीवर उत्कर्ष ग्रामविकास संस्थेच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धनाची चळवळ गतिमान करण्यात आली. गाव परिसरातील पर्यावरण संरक्षण हा देखील संस्थेचा महत्त्वाचा उपक्रम आहे. संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी १५ झाडांचे रोपण आणि संवर्धन असा उपक्रम राबविला जातो. गेल्या तीन वर्षांपासून संस्थेने या उपक्रमात सातत्य ठेवले आहे. या उपक्रमामध्ये गावातील युवकांचा सहभाग वाढला आहे. केवळ वृक्ष लागवडीवरच संस्था थांबली नाही तर त्यांच्या संवर्धनाकरिता देखील पुढाकार घेतला गेला. त्याच्याच परिणामी कधीकाळी लागवड केलेली झाडे आता चांगलीच बहरली आहेत. येत्या काळात सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वृक्ष लागवड मोहिमेत संस्था सहभागी होणार आहे. 

गरजू मुलांच्या शिक्षणाची सोय 
ज्या कुटुंबात वडिलांचे निधन झाले आहे, अशा कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उत्कर्ष ग्रामविकास संस्थेद्वारे घेतली जाते. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाच्या खर्चाचा भार संस्था उचलते. गावातील गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळवून देण्यावर संस्थेचा भर आहे. या माध्यमातून सध्या पवनार गावातील अकरा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय संस्थेने केली आहे. विद्यार्थांचा गणवेश, पुस्तके तसेच इतर शैक्षणिक खर्चाचा भार संस्था उचलते. विद्यार्थ्याने मागणी केल्याप्रमाणे वर्षभर वही, पुस्तके आणि स्टेशनरीचा पुरवठाही केला जातो. २००७ पासून या सेवाभावी उपक्रमात संस्थेने सातत्य ठेवले आहे. निवडलेला विद्यार्थी- विद्यार्थिनी दहावी पास झाल्यानंतर पुन्हा नव्या विद्यार्थ्यांची निवड होते. संस्थेने सध्या अकरा विद्यार्थ्यांना मदतीचे धोरण ठरविले आहे. घरातील कर्ता व्यक्‍ती गेल्यानंतर त्या कुटुंबाची वाताहात होते. घरात तीन मुले असतील तर गरजा भागविण्याकरिता त्यातील एक किंवा दोन मुलांवर कमविण्याची जबाबदारी सोपवीत केवळ एकालाच शिकविले जाते. या कारणामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाऊ नये, याकरीता हा उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे, असे संजय लाडोळे सांगतात. या माध्यमातून शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आलेले अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकले. दहावीनंतर विद्यार्थी स्वावलंबी होतात. त्यामुळे पुढील शिक्षणाची सोय ते करू शकतात़, परंतु दहावीपर्यंतच्या शिक्षणापासून गावातील कोणीही वंचित राहू नये याकरिता संस्था ही उपक्रम   राबविते.

वृद्धांना मिळते दोन्ही वेळचे जेवण
पवनार गावात सद्यस्थितीत पन्नासहून अधिक गरीब, गरजू लोक आहेत, परंतु यातील खरे गरजू आणि निराधार असलेल्यांच्या जेवणाची सोय करण्याचा निर्णय संस्थेद्वारे घेण्यात आला. चुलीपर्यंत जाऊनही ज्यांना चुलीवर स्वयंपाक करणे काही वृद्धांना शक्‍य होत नव्हते. अशांना मदत देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. गावातील दहा गरजूंना संस्थेच्या वतीने जेवणाचे डबे पोचविले जातात. दोन्ही वेळच्या जेवणाची सोय या माध्यमातून करण्यात आली आहे. २००४ पासून संस्थेने या महत्त्वाकांक्षी उपक्रमात सातत्य ठेवल्याचे संजय गांडोळे सांगतात.

आरोग्यतपासणी उपक्रम 
वृक्षसंवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरणरक्षणाचा उद्देश साधला जातो. त्यासोबतच गावातील नागरिकांचे आरोग्य चांगल्या रीतीने जपले जाण्यासाठी संस्थेने उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेच्या वतीने गरजूंकरिता आरोग्य निदान शिबिराचे आयोजन केले जाते.  

दानशूरांच्या मदतीने होणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्यतपासणी आणि औषधोपचार निःशुल्क केला जातो. गेल्या दहा वर्षांपासून संस्थेने या उपक्रमात देखील सातत्य ठेवले   आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com