अमेरिकेतही भरीत चर्चेत

अमेरिकेतही भरीत चर्चेत

जळगाव - मूळचे आसोदा (ता. जि. जळगाव) येथील असलेले नितीन चिंधू महाजन हे आपल्यासह कुटुंबाला भरीत खायला मिळावे म्हणून डलास (अमेरिका) येथे आपल्या निवासस्थानानजीक भरीताच्या वांगी पिकाची दरवर्षी लागवड करीत आहेत. त्याचे चांगले संगोपन करून बियांचे जतनही तेथे नितीन करीत असतात. ॲग्रोवनमध्ये शनिवारी (ता.१३) प्रसिद्ध झालेली वांग्यासह चवदार भरीतालाही मिळविले मार्केट ही यशोगाथा वाचून खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी अमेरिकेतून दिली असून, तेथे स्थायिक असलेल्या जळगावकरांनाही ही यशोगाथा आवडली. या यशोगाथेची लींक तेथील मराठी मंडळींनी आनंदाच्या भरात मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्याचेही नितीन यांनी सांगितले.

नितीन यांचे वडील चिंधू सुका महाजन हे आसोदा येथील शेतकरी आहे. नितीन यांनी प्राथमिक शिक्षण आसोदा येथे घेतले. पुढे संगणक विषयात पुणे येथे पदवी संपादन केली. मागील १८ वर्षांपासून नितीन हे अमेरिकेतील टेक्‍सास राज्यातील डलास येथे पत्नी विभावरी, मुले जय व दीप यांच्यासह राहतात. 

बियांची पारंपरिक पद्धतीने लागवड
नितीन व त्यांच्या कुटुंबाला भरीत मनापासूून आवडते. अमेरिकेत भरीताची वांगी नसतात, म्हणून त्यांनी काही वर्षांपूर्वी वडील चिंधू महाजन यांना बोलावून त्यांच्यासोबत भरीताच्या वांग्यांच्या बिया मागवून घेतल्या. त्या बियांची पारंपरिक पद्धतीने तेथे जुुलै महिन्यात लागवड केली जाते. दरवर्षी सुमारे ५० ते ६० झाडे असतात. दिवाळीला पहिले भरीत खाण्याचा आनंद ते तेथे लुटतात. त्यांची पत्नी विभावरी या जुन्या जळगावमधील असून, त्यांना छान भरीत बनविता येते. महाजन यांची वांगी तेथील मराठी मंडळीलाही आवडतात. काही जण तर वांगी लगडली की नाही याची चौकशी करायला महाजन यांच्या निवासस्थानी येतात. पिकाची पाहणी करतात. जळगावात जसे भरीताच्या वांग्याचे पीक जोमात असते, तसे तेथे नसते. वांग्यांचा आकार थोडा लहान असतो. पण भरीताची चव चांगली असते. यानिमित्ताने अमेरिकेतही भरीत चर्चेत आले आहे. 

ॲग्रोवनने भरीताची वांगी, आसोदा गावाची परंपरा हे जगासमोर आणून एकप्रकारे आसोदावासीयांचा गौरव केला आहे. जळगावकडची जेवढी मंडळी अमेरिकेत स्थिरावली आहे, त्यापैकी अनेकांनी ही यशकथा इंटरनेटवर वाचली. आम्ही इकडेही भरीताच्या वांग्यांचे पीक वाढविण्याचा प्रयत्न करीत आहोत. 
- नितीन महाजन, संगणक अभियंता, डलास (टेक्‍सास, अमेरिका) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com