गडद लाल, झणझणीत मिझो मिरची

गणेश हिंगमिरे
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

अनादी कालापासून मिझो मिरचीची लागवड मिझोराम राज्यात होते. केवळ आठ जिल्हे असलेले हे ईशान्य भारतातील राज्य आहे. ईशान्येकडील सात राज्यांच्या समूहाला ‘सेवन सिस्टर्स’ असेही संबोधले जाते. यापैकी मिझोराम राज्याची ओळख मिझो मिरचीत झाली आहे. ती अगदी पक्ष्याच्या डोळ्यासारखी दिसते म्हणून तिला याच नावाची ओळख मिळाली आहे. तिच्यात असलेल्या विशिष्ट गुणधर्मामुळे जीआय मानांकनही मिळाले आहे.

अनादी कालापासून मिझो मिरचीची लागवड मिझोराम राज्यात होते. केवळ आठ जिल्हे असलेले हे ईशान्य भारतातील राज्य आहे. ईशान्येकडील सात राज्यांच्या समूहाला ‘सेवन सिस्टर्स’ असेही संबोधले जाते. यापैकी मिझोराम राज्याची ओळख मिझो मिरचीत झाली आहे. ती अगदी पक्ष्याच्या डोळ्यासारखी दिसते म्हणून तिला याच नावाची ओळख मिळाली आहे. तिच्यात असलेल्या विशिष्ट गुणधर्मामुळे जीआय मानांकनही मिळाले आहे.

मिरचीची लागवड 
मिझोराममध्ये डोंगराच्या उतारावर या मिरचीची लागवड होते. दर ३ ते ५ वर्षांनी लागवडीची जागा बदलली जाते. अतिरिक्त आर्थिक मदत होण्यासाठी या मिरचीचे आंतरपीकदेखील घेतले जाते. एकरी कमी उत्पादन त्याप्रमाणे बाजारभावांतील चढ उतार यामुळे येथील शेतकरी एकापेक्षा जास्त पिके घेतात. या भागातील मातीत कार्बनचे प्रमाण जास्त असून मातीचा सामु ४.५ ते ५.६ असतो. अाम्लीय माती असून जमीन अतिशय सुपीक आहे. त्यामुळे मिझो मिरचीची लागवड सेंद्रिय पद्धतीने करण्यावर अधिक भर दिला जातो. उच्च पोटॅश म्हणजेच पालाशच्या प्रमाणामुळे वाळवल्यानंतर या मिरचीला अद्वितीय लाल रंग प्राप्त होतो. मिझोराम राज्यातील प्रमुख पिकांपैकी एक आणि स्थानिक पातळीवर हमार्चत आणि बर्डस आय नावाने प्रसिद्ध या मिरचीचे मोठ्या प्रमाणात पीक मिझोरम या राज्यात घेतले जाते. ही मिरची एक जंगली प्रकारची वनस्पती आहे असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या मिरचीची सर्वसाधारण लांबी २ ते ४ सेंमी तर रुंदी १ सेंमी असते. 

जीआय मानांकन प्राप्त 
या मिरचीला जीआय मानांकन २०१४ मध्ये मिळाले. गुळगुळीत अंड्याच्या आकारासारखी पाने या मिरचीला गडद लाल रंग आणि अत्यंत झणझणीत चव  असे वेगळेपण देतात. ही मिरची जवळपास संपूर्ण राज्यात घेतली जाते. मिझोराममधील आठ जिल्ह्यांमध्येया मिरचीचे तीन प्रकारात किंवा प्रतवारीत उत्पादन घेतले जाते. त्यासंबंधी माहिती आपण पुढील भागात घेऊया.

नागा मिरचीची वैशिष्ट्ये 
मागील भागात आपण नागा मिरचीच्या बाबतीत काही माहिती घेतली. नागालॅंडच्या अनेक भागांमधून या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. अतिशय तिखट आणि झोंबणारी मिरची म्हणून ही मिरची प्रसिद्ध आहे. मिरचीचे आकर्षक स्वरूप, विशिष्ठ चव तसेच मोठा आकार या मिरचीस अन्य मिरच्यांपासून वेगळेपण मिळवून देते. अधिक स्वादिष्ट आणि पचनक्रियेसाठी ती सोपी मानली जाते. या सगळ्या गुणधर्माच्या सोबतीला त्यातील औषधी गुणधर्म तिला अजूनच खास बनवतात. ही मिरची काढणीच्या टप्प्यात पोचण्यासाठी जवळपास पाच महिने लागतात. तीन वेगळ्या टप्प्यांवर काढणी होते. दीर्घ अंतरावर असलेल्या बाजारासाठी आणि भाजीच्या हेतूसाठी या मिरचीची हिरव्या रंगाची असताना काढणी केली जाते. तर बिजोत्पादन आणि लोणचे तयार करण्याच्या उद्देशाने पिवळ्या आणि लाल रंगाच्या मधल्या अवस्थेतही तिची काढणी होते. 

जीआयमुळे जगभरात अोळख 
नागा मिरचीची जीआय नोंद ११ ऑगस्ट २००८ मध्ये झाली. तिची गणना जगातील सर्वात तिखट अशा मिरचींमध्ये अधिक प्रमाणात होऊ लागली. तिला आता यथायोग्य भाव मिळणे शक्य होणार आहे. जपानला झालेल्या निर्यातीत या मिरचीचे अत्युच्च दर मिळवला आहे. जीआच्या नोंदीमुळे नागा मिरचीचे गुणधर्म जगासमोर आले. तिला योग्य किंमत मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठही मिळाली. आपल्या भागातही अशा प्रकारच्या मिरच्या किंवा मसालेवर्गीय पिके आहेत. ज्याला जीआय मिळून आंतरराष्ट्रीय स्थान प्राप्त होऊ शकते. नागठाणे (जि. सातारा) या भागात पिकणारे आले त्याचेच उदाहरण म्हणता येईल. 

गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ 
(लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)