कापूस लागवडीत अडीच पट वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांत जून महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे कापूस लागवडीने चांगले बाळसे पकडले आहे. यंदा ३० जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत तब्बल अडीच पट वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये कापूस लागवडीच्या क्षेत्रात अनुक्रमे साडे सहा लाख हेक्टर व ३.१६ लाख हेक्टर इतकी वाढ नोंदविण्यात आली. देशात ३० जूनपर्यंत एकूण ४६ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत १९ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली होती. 

उत्तर भारतात कापसाची तुलनेने लवकर लागवड केली जाते. तिथे यंदा १५ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाल्याचा अंदाज  आहे. त्यात पंजाब (३.८० लाख हेक्टर), हरियाना (६.०६ लाख हेक्टर), राजस्थान (१.४० लाख हेक्टर) ही राज्ये आघाडीवर आहेत. पंजाबमध्ये तर कापसाकडे शेतकऱ्यांचा ओढा प्रचंड वाढल्यामुळे तिथल्या कृषी विभागाने मक्याची लागवड करण्याचे आवाहन केले आहे. गुजरातमध्येही यंदा शेतकऱ्यांनी कडधान्य, गवार यांच्या तुलनेत कापूस व भुईमुगाला जास्त पसंती दिल्यामुळे कापसाच्या क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षी देशभरात कडधान्य पिकांचे दर हमीभावापेक्षा खाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. इतर सर्व पिकांच्या तुलनेत कापसाने शेतकऱ्यांना चांगला हात दिल्यामुळे यंदा कापसाला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती आहे. 

देशपातळीवर कापसापाठोपाठ कडधान्य पिकांचा पेरा गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्के वाढला आहे. कडधान्य लागवडीखालील क्षेत्र गेल्या वर्षीच्या १३.०४ लाख हेक्टरवरून यंदा ३० जूनपर्यंत १८.८ लाख हेक्टरवर पोचले आहे. प्रामुख्याने राजस्थान, मध्य प्रदेश व कर्नाटक या राज्यांत दमदार पेरण्या झाल्यामुळे लागवडक्षेत्रात वाढ दिसून आली. देशात तेलबिया आणि भाताची लागवड मात्र घटली आहे. तेलबियाच्या लागवडीत तर सुमारे १० टक्के घट नोंदविण्यात आली. 

दरम्यान, जून महिन्यात देशातील बहुतांश भागांत चांगला पाऊस झाला असून येत्या काही आठवड्यात पेरण्यांचा वेग वाढेल, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.