कापसाच्या दराची चढती कमान

कापसाच्या दराची चढती कमान

देशात कापसाच्या आवकीविषयी अजूनही संभ्रमाचे चित्र कायम आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय)च्या अहवालानुसार २७ डिसेंबर २०१७ पर्यंत १०६ लाख गाठी कापसाची आवक झाली आहे. जस्ट ॲग्री या खासगी संस्थेच्या अाकडेवारीनुसार २ जानेवारीपर्यंत १२२ लाख गाठी कापूस बाजारात आला आहे. तर कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय)च्या क्रॉप कमिटीच्या मते ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत कमीत कमी १४० लाख गाठी कापसाची आवक नोंदवण्यात आली आहे. या तिन्ही संस्थांच्या आकड्यांत काहीशी तफावत असली तरी यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते. ती म्हणजे देशात रूईचा खप वाढला आहे. याचाच परिणाम म्हणून कापसाच्या दराने उसळी घेतली आहे. गेल्या एक महिन्यापासून रोजची आवक दीड लाख गाठींपेक्षा अधिक होत असूनसुद्धा बाजारात दर चढे राहिले आहेत. 

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वायदेबाजारांतही कापसाचा ट्रेन्ड एकमेकांशी पूरक दिसून येत आहे. भारतात `एमसीएक्स`मध्ये कापसाचा वायदा ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत १८ हजार ते २० हजार या दरम्यान राहिला. तर अमेरिकेत आयसीई वायदा ६७ सेंटवरून ८० सेंटपर्यंत पोचला. `एमसीएक्स`मधल्या तेजीची मुख्य कारणे म्हणजे चांगल्या गुणवत्तेच्या रूईची वाढती मागणी, बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून वाढलेली खरेदी आणि गिरण्यांची वाढती क्षमता ही आहेत. तर भारत-पाकिस्तान-चीन या देशांतून वाढलेली मागणी, निर्यातीसाठी अनुकूल वातावरण आणि सटोडियांची मजबूत पकड या कारणांमुळे अमेरिकी वायदेबाजारातील दर वाढले आहेत.

शेतकरी, जिनर, स्पिनर, निर्यातदार आणि आघाडीच्या व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता कापसाच्या बाजारात मंदी नसल्याचे त्यांनी एकमुखाने सांगितले आहे. हंगाम सुरू झाल्यानंतर प्रारंभीच्या टप्प्यात कापसाच्या बाजारात दर घसरले होते. विक्रमी कापूस उत्पादनाचा सुरूवातीचा अंदाज आणि गुलाबी बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापसाला मिळालेली कमी किंमत यामुळे ही घसरण झाली होती. कापसाच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याबरोबर रूईच्या मागणीमध्ये वाढ दिसून आली. चांगल्या गुणवत्तेच्या मालाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे कापसाचे दर वाढले आहेत, हेच यातून स्पष्ट होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com