कापूस अन् सोयाबीन काढणीतच गेली दिवाळी

कापूस अन् सोयाबीन काढणीतच गेली दिवाळी

औरंगाबाद - आधी पावसाच्या प्रदीर्घ खंडानं पिकं मारली. उरली सुरली कसर परतीच्या पावसानं पूर्ण केली. दिवाळीचे मुख्य पाच दिवस, सोयाबीनची काढणी अन्‌ कापसाच्या वेचनीत गेले. या पावसानं पांढर सोनं काळं केलं, भिजल्यामुळे सोयाबीनला कुणी विचारेनास झालयं. सारं काही ऑनलाइन व्हंत असतांना शेतमालाचे पडलेले दर, न थांबनारी शासनाची आकडेमोड यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आनंदानं दिवाळी साजरी करता आली नाही. 

मराठवाड्यात खरिपाचे सरासरी पेरणीयोग्य क्षेत्र ४९ लाख ११ हजार हेक्‍टर आहे. प्रत्यक्षात यंदा ४७ लाख ६८ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली; परंतु ऐन पीकवाढीच्या काळातच जुलै महिन्याच्या सुरवातीलाच जवळपास पंधरवडाभर पावसाने प्रदीर्घ उघडीप दिली. त्यामुळे मका, बाजरी, खरीप ज्वारी, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे उत्पादन खर्चालाही न परवडणारे आल्याने दिवाळसणात उसनवार किंवा उत्पादित माल कवडीमोल दराने विकून मुलाबाळांची कशीबशी हौसमोज शेतकऱ्यांना करावी लागली. 

परतीच्या पावसाने सोयाबीन काढणी लांबविल्याने कपाशीची वेचनी व सोयाबीन काढणी एकाच वेळी आली. मजूर मिळेनासे झाल्याने मजुरीचे दर वाढवावे लागले. शासनाकडून जाहीर केलेल्या अनुदानाचा घोळ सुरू असताना कर्जमाफीचा छदामही अजून शेतकऱ्यांच्या खाती जमा झाला नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तर अजूनही दोन वर्षांपूर्वीच्या कापूस अनुदानाची प्रतीक्षा आहे. शासनाने ऑनलाइन नोंदणी करून शेतमाल खरेदी केंद्रावर विकण्याची सोय करण्याची व कमी दराने मालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची घोषणा केली; परंतु प्रत्यक्षात शेतमालाला मिळणारे कमी दर पाहता त्याची कडक अंमलबजावणी केल्याचे दिसत नाही. शेतमालाचे पडलेले दर वाढण्याचे नाव घेत नाही. शासनाने कृतिशील पावले उचलल्याशिवाय त्याचा फायदा होणार नाही, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

कापूस भिजल्याने तीन हजार रुपये प्रतिक्‍विंटलने विकावा लागला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी चार वाजेपर्यंत शेतात काम करावे लागले. मजुरीचे दर गगनाला भीडले. पावसानं मालाचा दर्जा बीघडविल्यानं त्याला दरही मिळेना. 
- तुकाराम धानुरे,  बोधलापुरी, ता. घनसावंगी, जि. जालना. 

यंदा खरीप बुडला. कापसाला चार दोन बोंड लागली ती परतीच्या पावसानं भीजली, त्यामुळे त्याला दर मिळाला नाही, मजुरी गगनाला भिडली. परतीच्या पावसानं हंगाम लांबविल्यानं कामचं पुरली. भाऊबीजेला माहेराला जाता आलं नाही.
- शारदा गिते, महिला शेतकरी,  देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद. 

दोन वर्षापुर्वींचे कापसाचे अनुदान अजून मिळाले नाही. दिवाळी सोयाबीन काढली तीस १८०० ते २५०० रूपयांच्या आतच दर मिळतोय. काढणीला साडेतीन हजार एकरी मोजावे लागले, कर्जमाफीचा छदाम खात्यावर आला नाही.  
- विलास गपाट,  इंदापूर, जि.उस्मानाबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com