अमेरिकेतील कापसाला वादळाचा फटका

मनीष डागा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

कापसाच्या देशांतर्गत बाजारपेठांत दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात दर काही प्रमाणात वाढले आहेत. वायदेबाजारातील कलही अल्पावधीतील तेजीचे संकेत देत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेतील टेक्सास व जवळपासच्या परिसरात ‘हार्वे’ वादळाने घातलेला धुमाकूळ. 

कापसाच्या देशांतर्गत बाजारपेठांत दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात दर काही प्रमाणात वाढले आहेत. वायदेबाजारातील कलही अल्पावधीतील तेजीचे संकेत देत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेतील टेक्सास व जवळपासच्या परिसरात ‘हार्वे’ वादळाने घातलेला धुमाकूळ. 

अमेरिकेतील कापसाचे ६० टक्के क्षेत्र टेक्सास परिसरात आहे. त्यामुळे अमेरिकेतील एकूण कापूस उत्पादनावर या वादळाचा परिणाम होणार आहे. काही ठिकाणी कापसाच्या पिकाचे पूर्ण नुकसान झाले आहे, तर काही ठिकाणी कापसाची गुणवत्ता मार खाणार आहे. अजूनही तिथे पाऊस सुरूच असल्यामुळे पिकाचे नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील कापूस उत्पादनाची स्थिती काय राहील, याचे पडसाद जगभरातील कापसाच्या बाजारपेठेत उमटण्याची चिन्हे आहेत. एकंदरीत हवामान हा घटक कापसाच्या दरातील चढ-उताराच्या संदर्भात महत्त्वाचा ठरणार आहे.   
भारतातही पावसामुळे कापसाचे गणित प्रभावित होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात पाऊस सुरू असल्यामुळे नवीन हंगामातील कापसाची आवक लांबली आहे. आवक वाढण्यासाठी आणखी किमान १५ दिवस लागतील, असा अंदाज आहे. देशातील प्रमुख कापूस उत्पादक क्षेत्रामध्ये सरलेल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात, मध्य प्रदेश या  राज्यांतील कापूस उत्पादकांना त्याचा लाभ होईल. उत्तर भारतातील शेतकरी मात्र आता पाऊस थांबण्याची वाट बघत आहेत. कारण त्याशिवाय त्यांना कापसाची वेचणी सुरू करता येणार नाही. देशात २६ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार एकूण १२०.७ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १०३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला होता. 

(लेखक कापूस बाजार विश्लेषक असून ‘कॉटन गुरू’चे प्रमुख आहेत.)  www.cottonguru.org

Web Title: agrowon news cotton Storm