‘गोरक्षण'मध्ये होतेय देशी गोवंशाचे संवर्धन

गोपाल हागे
रविवार, 6 ऑगस्ट 2017

अकोला शहराजवळील श्री गोरक्षण संस्था पुढील वर्षी दीडशे वर्षांत पदार्पण करीत आहे. समाजसेवेच्या उद्देशातून सुरू झालेली ही संस्था भारतीय गोवंश संवर्धनाबाबत जबाबदारीने काम करीत आहे. संस्थेच्या तीन प्रकल्पांमध्ये सुमारे सातशेहून अधिक देशी गाईंचे संगोपन केले जाते. 

गेल्या काही वर्षांत जातीवंत भारतीय गोवंशाच्या अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिलेले आहे. भारतीय गोवंश विविध कारणांनी संपत चालला आहे. हे लक्षात घेऊन अकोल्यातील श्री गोरक्षण संस्था ही भारतीय गोवंशाचे संवर्धन करण्याचा चांगला प्रयत्न करीत आहे. अकोला शहरातील विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन या ठिकाणी केले जाते. सन १८६८ मध्ये सुरू झालेल्या श्री गोरक्षण संस्थेला यंदा १४९ वर्षे पूर्ण झाली आहेत. पुढील वर्षात ही संस्था दीड शतकी वाटचाल करणार आहे. सध्या संस्थेचे कामकाज अध्यक्ष दीपककुमार भरतीया, उपाध्यक्ष महेशकुमार खंडेलवाल, सचीव विजयकुमार जानी, सदस्य नारायणदास खंडेलवाल, वासुदेव अग्रवाल, घनश्‍यामदास जाजू, रमाकांत खेतान, सुरेशचंद्र सुरेका, शिशीरकुमार भरतीया यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू आहे. प्रत्येकजण अापापल्या व्यवसायात स्थिर स्थावर झालेला असून, सामाजिक कार्याची अावड म्हणून गोरक्षणासाठी वेळ देतात. 

सातशेपेक्षा अधिक गाईंचे संवर्धन   
श्री गोरक्षण ही अकोल्यातील एक नामांकित व प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेचे शहरात तसेच एरंडा (ता. बार्शीटाकळी) येथे गोरक्षण केंद्र आहे. अकोला शहरात अन्नपूर्णा माता मंदिरासमोर गोग्राम कार्यरत आहे. तिन्ही ठिकाणचा विचार करता संस्थेतर्फे सातशेहून अधिक देशी गाईंचे संवर्धन केले जाते. यामध्ये प्रामुख्याने गीर, लालकंधारी, थारपारकर या गाईंचे संगोपन केले जाते. आगामी काळात गोग्राम परिसरामध्ये किमान दोन हजार गाईंची व्यवस्था करण्यात येणार आहे. या ठिकाणास भेट देणाऱ्याला गायींविषयी संपूर्ण माहिती संस्थेतर्फे देण्यात येते. एक पर्यटनस्थळ म्हणून येथे विविध प्रकारच्या सोयी निर्माण करणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव विजयकुमार जानी यांनी दिली. 

गोरक्षणामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक गायीची ओवाळणी करून मनोभावे स्वागत केले जाते. या केंद्रामध्ये चांगल्या गाईंच्या बरोबरीने अंध, अपंग, आजारी गायींची स्वतंत्र व्यवस्था ठेवलेली आहे. सर्व गाईंना पुरेसा चारा, पशुखाद्य, पाण्याची चांगली सोय संस्थेने केली आहे. गाईंसाठी मुक्त संचार गोठ्याची सोय करण्यात आलेली आहे. जनावरांच्या देखरेखीसाठी दोन पशुवैद्यक कार्यरत आहेत. गोहत्याबंदीमुळे या ठिकाणी येणाऱ्या देशी गायींची संख्या वाढत आहे. पालनपोषण करू शकत नसल्याने तसेच विक्री करता येत नसल्याने काही जणांनी गोरक्षण संस्थेला गाई दान दिल्या आहेत. गोरक्षणमध्ये सप्त गोप्रदक्षिणा मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराच्या परिसरात गाईंचे महत्त्व सांगणारे संस्कृतमधील श्‍लोक लिहिले असून, त्याचे मराठीत भाषांतरही येथे पाहावयास मिळते.

दररोज लागतो वीस क्विंटल चारा  
गोरक्षणमधील गाईंसाठी दिवसाला किमान वीस क्विंटल चारा लागतो. दूध देणाऱ्या गाईंना पशुखाद्यही दिले जाते. संस्थेकडे सुमारे दोनशे एकर जमीन आहे. यामध्ये वर्षभर चारावर्गीय पिकांची लागवड केली जाते. या क्षेत्रातील सर्व चारा गोरक्षणमधील गाईंसाठी वापरला जातो. काही दानशूर व्यक्तीही गाईंसाठी चाऱ्याची व्यवस्था करतात. गरज असेल तेव्हा चारा विकतही घेतला जातो. गेल्या काही वर्षांत गोरक्षण संस्थेच्या उपक्रमाचा व्याप वाढत चालला आहे. जनावरांची देखभाल याचबरोबरीने दूध विक्री, शेणखत, गांडूळखत निर्मिती आणि विक्री याचबरोबरीने इतर कामांसाठी सुमारे ३० जण संस्थेमध्ये मानधनावर काम करतात. यामध्ये काही महिलासुद्धा आहेत. गोरक्षणच्या कामाचा आढावा तसेच व्यवस्थापनासाठी सर्व पदाधिकारी नियमितपणे गोरक्षण संस्थेला भेट देतात. काही अडचण, काही काम करायचे असेल तर त्याबाबत सूचना दिल्या जातात.  

दररोज १६० लिटर दूध विक्री  
देशी गाईंचे ताजे दूध सहज उपलब्ध होत नाही. हे लक्षात घेऊन गोरक्षण संस्थेमध्ये दररोज दर्जेदार दुधाची विक्री केली जाते. सकाळ-संध्याकाळ मिळून सरासरी १६०- १८०लिटर दूध विक्री होते. साठ रुपये प्रतिलिटर या दराने दुधाची विक्री होते. या दुधाला ग्राहकांच्याकडून वाढती मागणी आहे. एरंडा आणि डाबकीमध्ये असलेल्या गोसदन केंद्रातील गाईंच्या दुधाची विक्री केली जात नाही. हे दूध पूर्णपणे वासरांना पाजले जाते. त्यामुळे या वासरांचे आरोग्य चांगले राहिले आहे.  

शेणखत, गांडूळखत निर्मिती 
शेतकऱ्यांच्याकडून देशी गाईंचे शेण, मूत्रास चांगली मागणी आहे. हे लक्षात घेऊन गोरक्षणमध्ये गोमूत्राचे संकलन केले जाते. याचबरोबरीने वर्षभरात किमान २०० ट्रॉली शेणखत अकोल्यातील गोरक्षणमध्ये तयार होते. दोन टन शेणखत २२०० रुपयांना विकले जाते. गोठ्यामध्ये शिल्लक राहिलेला चारा, कुटारापासून नाडेप कंपोस्ट खत तयार केले जाते. याचबरोबरीने गांडूळखताचीही निर्मिती केली जाते. दर महिन्याला दोन टन नाडेप कंपोस्ट आणि एक टन गांडूळखत तयार होते. गांडूळखत आणि नाडेप खताची मागणीनुसार विक्री केली जाते. अकोला, अमरावती आणि लगतच्या जिल्ह्यातील शेतकरी हे गांडूळखत आगाऊ नोंदणी करून घेऊन जातात. या सेंद्रिय खतांचा मोठ्या प्रमाणात वापर फळबागांच्यासाठी केला जातो. या खतांमुळे जमिनीचा पोत सुधारला असल्याचे शेतकरी सांगतात. 

विजयकुमार जानी (सचिव) -  ९४२२१६०६१५
कार्यालय  - ०७२४- २४५९६५

Web Title: agrowon news Cow