अनेक वर्षांपासून उसात विविध आंतरपिकांचे प्रयोग 

डॉ. कल्याण देवळाणकर
बुधवार, 5 जुलै 2017

धोंडे यांची पंचसूत्री 
पीक लागवडीपूर्वी जमिनीत हिरवळीची पिके गाडणे
माती परीक्षण अहवालानुसार सेंद्रिय, रासायनिक, जैविक आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या संतुलित मात्रांचा वापर करणे
निरोगी व प्रमाणित बियाणांचा वापर व बीजप्रक्रिया 
एकात्मिक रोग- कीड नियंत्रण 
पिकांच्या गरजेनुसार ठिबक, तुषार सिंचन वापरून पाण्याचा मर्यादित वापर  

वर्षानुवर्षे एकाच जमिनीत ऊस घेतल्याने जमिनीची उत्पादकता तसेच उसाच्या हेक्टरी उत्पादनात कमालीची घट होताना दिसून येत आहे. नगर जिल्ह्यातील सडे येथील रंगनाथ रंभाजी धोंडे यांनी मात्र गेल्या काही वर्षांपासून उसात हंगामनिहाय विविध आंतरपिके घेऊन उसातील खर्च चांगल्या प्रकारे कमी करून आर्थिक फायदा मिळवलाच. शिवाय जमिनीची सुपीकताही वाढवली. 
डॉ. कल्याण देवळाणकर

नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात सडे येथे रंगनाथ धोंडे यांची एकूण नऊ एकर बागायती जमीन आहे. साधारण सहा एकरांवर ऊस असतो. फुले २६५ वाणाला प्राधान्य असते. शेतीतील खर्च कमी करायचा व मुख्य पिकातील नफा वाढवायचा तर आंतरपिके घेण्याचा पर्याय अत्यंत चांगला असे धोंडे यांचे मत अाहे. त्यादृष्टीने काही वर्षांपासून उसात विविध आंतरपिके घेण्याच्या प्रयोगात त्यांनी सातत्य ठेवले आहे. 
आपल्या जागेतील विहिरीतून एक किलोमीटर पाइपलाइन करून शेतीला पाणी पुरविले आहे. पाण्याचा संरक्षित साठा म्हणून शेततळे तयार केले आहे. पिकांची योग्य फेरपालटही केली जाते. 

उसात आंतरपिके घेण्याकडे कल
धोंडे यांची जमीन काळी व सातत्याने ओलिताखाली अाहे. त्यामुळे जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय कर्ब, नत्राचे स्थिरीकरण योग्य प्रमाणात टिकून राहण्यासाठी ते विविध प्रयोग करतात. यात आंतरपिके, ताग, धैंचा अशी हिरवळीची पिके घेणे, पिकांची धसकटे, पाचट कुटी यांचे अवशेष जमिनीत गाडणे आदींचा समावेश आहे. यामुळे जमिनीचे सेंद्रिय, जैविक, रासायनिक गुणधर्म टिकून राहण्यास मदत झाली. कोंबडी खत, गांडूळ खत यांचाही वापर होतो. 

प्रयोगांची प्रेरणा व मार्गदर्शन
आधुनिक तंत्रज्ञानाची प्रेरणा धोंडे यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून मिळाली आहे. विद्यापीठ तसेच कृषी विभागातर्फे धोंडे यांच्या शेतावर कृषी मेळाव्यांचे आयोजन यापूर्वी करण्यात आले आहे. विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, डॉ. आनंद सोळंके, कृषी अधिकारी श्री. गायकवाड यांचे मार्गदर्शन धोंडे यांना मिळाले अाहे. मुलगा प्रमोदचीही शेतीत मोलाची साथ वडिलांना मिळते. 

किफायतशीर अर्थशास्त्र 
धोंडे म्हणाले की, मुगास क्विंटलला ४००० रुपये, भेंडीला किलोला ३० रुपये तर मागील वर्षी हरभऱ्याला क्विंटलला ५९०० रुपये दर मिळाला. आंतरपिकांमुळे दरवर्षी एकरी साधारण १५ ते २० हजार रुपये किंबहुना त्याहून अधिक एकूण खर्च वाचतो. ज्यामुळे उसाचा उत्पादन खर्च कमी होतो. लागवडीच्या उसाचे उत्पादन एकरी ५०         टनांपर्यंत आहे. 
 : रंगनाथ धोंडे, ९०४९४५३०२८

पूर्व हंगामी उसात बटाटा (२०१२-१३)
पूर्वहंगामी उसाबरोबर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रयोग   
व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी 
माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन 
पहिले पाणी देताना ऊस व बटाटा लागवडी वेळी तुषार सिंचनाद्वारे सुमारे ६ ते ७ तास पाणी. नंतरचे पाणी ५ ते ६ दिवसांतून फक्त दोनच तास स्प्रिंकलरद्वारे. एक महिन्यानंतर ठिबकद्वारे पाणी देण्यास सुरवात. दोन्ही पिकांस विद्राव्य खतांताही वापर. त्यामुळे उसाचे फुटव्याचे आणि बटाटा वाढीचे प्रमाण चांगले राहिले.
लागवडीपूर्वी दोन्ही पिकांसाठी बेणेप्रक्रिया (यात क्लोरपायरीफॉस आणि कार्बेन्डाडाझीम यांचा वापर)
लागवडीनंतर १५ दिवसांनी गोमूत्र आणि कडुनिंबावर आधारित कीटकनाशकाचा वापर 
बटाट्याची काढणी झाल्यानंतर त्याचा पालापाचोळा पॉवर टिलरने गाडून उसाची मशागत केली. 
उत्पादन- बटाटा- एकरी ६ टन, पूर्वहंगामी ऊस- एकरी ४८ टन. 

सुरू उसात उन्हाळी मूग-वैभव (२०१३-१४)
फेब्रुवारीत धैंचा जमिनीत गाडून रान तयार केले. त्यात सुरवातीस उसाची लागवड करून नंतर आंबवणीच्या दुसऱ्या पाण्याच्या वेळेस उन्हाळी मूग वैभवची सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने लागवड केली. बियाण्यास थायरम तसेच ट्रायकोडर्मा व रायझोबियमची बीजप्रक्रिया केली.
ठळक बाबी 
मुगास फुले लागणीच्या वेळी १९ः१९ः१९ सारखे विद्राव्य खत ठिबकमधून    
दोन वेळेस खुरपणी.   
सुरू उसाला लागवडीच्या वेळी पहिले पाणी सरीतून दिले. मुगाची लावण वाफशावर करून दुसरे पाणी स्प्रिंकलरने दिले. मुगाची काढणी होईपर्यंत स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाण्याच्या पाळ्या दिल्या.
 उत्पादन- दीड एकर सुरू उसात मुगाचे ११ क्विंटल उत्पादन 

उसात भेंडी ( २०१५-१६)
ठळक बाबी 

मुख्य अन्नद्रव्यांबरोबर झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम व बोरॉन तसेच निंबोळी पेंड यांचाही वापर   
५ ते ६ दिवसांच्या अंतराने सुरवातीस पहिले पाणी स्प्रिंकलरने व त्यानंतर ठिबकने पाणी   
भेंडीत ट्रायकोडर्मा, ॲझोटोबॅक्टर यांची बीजप्रक्रिया. 

उत्पादन
भेंडी आंतरपिकातून एकरी १४ क्विंटल उत्पादन मिळाले. भेंडीची धसकटे व पालापाचोळा पॉवर टिलरच्या सहाय्याने गाडून खताचा डोस त्यात मिसळून उसाची मशागत केली.

खोडवा ऊसात आंतरपीक हरभरा दिग्विजय (सन २०१६-१७)

ठळक बाबी 
टोकण पद्धतीने हरभऱ्याच्या दिग्विजय वाणाची लागवड. ट्रायकोडर्मा आणि रायझोबियमची बीजप्रक्रिया. त्यामुळे पुढे बुरशीचा प्रादुर्भाव आढळला नाही.
माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन  
हरभऱ्यास स्प्रिंकलरने दिलेले पाणी प्रभावी ठरले. त्यामुळे जमिनीचा वाफसा व्यवस्थित     राहून उगवण क्षमतेत चांगली वाढ झाली. दुसरे पाणी पेरणीनंतर २५ दिवसांनी व तिसरे पाणी पेरणीनंतर २९० दिवसांनी ठिबकद्वारे दिले. मर, मूळ कुजणे असा कुठलाही अपाय न होता पीक जोमदार राहिले.    
आंतरपीक बाल्यावस्थेत असताना कडुनिंबावर आधारित कीटकनाशक व त्यानंतर देशी     गोमूत्राचा वापर. जैविक कीटकानशकाचा वापर करून घाटेअळीचे नियंत्रण.  

उत्पादन - तीन एकर ऊस खोडव्यात हरभऱ्याचे ३० क्विंटल म्हणजे एकरी १० क्विंटल उत्पादन मिळाले. हरभऱ्यामुळे उसाला नत्राची उपलब्धता होऊन ऊसही जोमदार वाढला.