उभी पिके लागली वाळायला

उभी पिके लागली वाळायला

अकोला - पावसामुळे मारलेल्या दडीमुळे दर दिवसाला खरीप पिकांची अवस्था बिघडत चालली अाहे. तिनही जिल्ह्यांमध्ये या हंगामातील पिकांच्या उत्पादकतेला अाताच मोठा तडाखा बसला अाहे. अाता पाऊस अाला तरी तितकासा फायदा होणार नाही. अकोला जिल्ह्यातील अकोट, अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा, संग्रामपूर, शेगाव, लोणार, देऊळगावराजा, सिंदखेडराजा या तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी पिके सुकली अाहेत. पिके वाचवण्यासाठी शेतकरी विविध प्रकारची धावपळ करत असून प्रयत्न अपुरे पडत अाहेत.

या महिन्यातील १५ दिवस व जुलै महिन्यातील पाच ते सहा दिवस असा २१ दिवसांचा खंड पडला अाहे. शिवाय हा खंड एेन गरजेच्या काळातील असल्याने प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी मारक ठरला अाहे. सोयाबीन, मूग ही पिके फुलोरा, शेंगाच्या अवस्थेत अालेली अाहेत. कपाशीचेही पीक फूल पात्या तर मका पिकाला कणसे निपसण्याचा कालखंड सुरू होणार होता. या अवस्थेत पिकांना मुबलक पाणी हवे असते. नेमका पाऊस याच काळात नसल्याने अडचण तयार झाली. मूग, उडदाचे ५० टक्क्यांवर नुकसान झाले अाहे. सोयाबीनचेही ४० टक्क्यांपर्यंत नुकसानीची शक्यता अाहे. या अाठवड्यात दमदार पाऊस झाला तर सोयाबीन, कापूस, तुरीचे पीक कसेबसे येईल. 

उभा मका वाळला
मोताळा तालुक्यातील कोथळी येथील विठ्ठल पाटील यांनी जूनच्या पहिल्या अाठवड्यात पाच एकर मका पेरला होता. गेले अनेक दिवस पाऊस नसल्याने हा उभा मका वाळला अाहे. एकरी साडेतीन ते चार हजार रुपये खर्च केल्याचे त्यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले. अापल्यासारख्या अनेक शेतकऱ्यांची पिके वाळत असल्याचेही ते म्हणाले.

टँकरने पाणी दिले
मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथील गजानन तयाडे या शेतकऱ्याने सोयाबीन पिकाला टँकरने पाणी अाणून दिले. अडीच एकरालीत सोयाबीनला सुमारे ५० टँकरपेक्षा अधिक पाणी तुषार सिंचन पद्धतीने दिले. बोराखेडी येथील तायडे यांचे मलकापूर-बुलडाणा मार्गावर वन विभागाच्या चौकीनजीक कोरडवाहू शेत आहे. त्यांनी अडीच एकरात सोयाबीनची पेरणी केली आहे; मात्र पावसाने दडी मारल्याने पीक कोमेजत होते. त्यांनी यासाठी विकतचे पाणी टँकरने आणून शेतातील हौदात सोडले व तेथून स्प्रिंकलच्या साहाय्याने पिकाला दिले. एका टँकरसाठी त्यांना तीनशे रुपये मोजावे लागले. जवळपास १६ हजारांपेक्षा अधिक खर्च   लागला. 

मोताळा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने कोथळी तसेच या पंचक्रोशीत उडीद, मूग, तूर, कपाशी आणि मका ही पिके नेस्तनाबूत झाली आहेत. लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून तत्काळ सर्वेक्षण करावे.     
-विठ्ठल पाटील, कोथळी जि. बुलडाणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com