अडोतीस एकरांत १२ पिकांसाठी ‘ठिबक ऑटोमेशन’

अडोतीस एकरांत १२ पिकांसाठी ‘ठिबक ऑटोमेशन’

कापूस, संत्र्याच्या या पट्ट्यात वर्षभर उत्पन्न सुरू राहील असे भाजीपाला पीक पद्धतीवर आधारित प्रयोग यवतमाळ जिल्ह्यातील कोपरा-मोर्शी येथील गजानन बारबुद्धे यांनी केले आहेत. सहा वर्षांपूर्वी साडेदहा लाख रुपये खर्चून वर्षभरात सहा पिके घेताना स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा (आॅटोमेशन) त्यांनी ३८ एकरांत बसवली आहे. त्यातून खते, पाणी यांचा काटेकोर वापर, त्यात बचत साधताना पीक उत्पादनाची गुणवत्ताही त्यांनी वाढवली आहे. विदर्भातील मोठ्या क्षेत्रावर ॲाटोमेशनचा हा त्यांचा पहिलाच प्रयोग असावा.  
 

विदर्भात व्यावसायिक शेतीचे संदर्भ जोडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये गजानन बारबुद्धे यांचा अग्रक्रम लागतो. यवतमाळ जिल्ह्यात कोपरा (ता. मोर्शी) शिवारात त्यांची ३८ एकर शेती आहे. 

खरे तर हा कापूस व संत्रा या पिकांचा पट्टा आहे. मात्र प्रयोगशील वृत्तीचे बारबुध्दे कपाशीचे पीक घेत नाहीत. त्याएेवजी त्यांनी व्यावसायिक व त्यातही भाजीपाला पिकांची पद्धती स्वीकारली आहे. शिवारात वर्षातील तीनही हंगामात मिळून सुमारे १२ प्रकारची पिके ते घेतात. त्यातून शेतीतील जोखीम कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या माध्यमातून पर्यायी पिकातून उत्पन्नाची हमी राहते असे ते सांगतात. 

बारबुद्धे यांची शेती 
केळी, हळद, आले यांच्याबरोबरच संत्र्याची सुमारे ५०० झाडे आहेत. सुमारे अठरा वर्षे जुनी संत्रा बाग चार एकरांत आहे. भाजीपाला पिकांत कारली, काकडी, टोमॅटो, मिरची, साधी आणि भरताची वांगी, फ्लॉवर, चवळी, शेडनेटमध्ये ढोबळी मिरची अशा पिकांचे प्रयोग त्यांनी केले आहेत. मागील वर्षी कलिंगड व खरबूज घेण्याचाही प्रयोग केला.

वर्षभरातील तंत्रज्ञानाची गरज 
विविध भाजीपाला पिके वर्षभर कोणत्या ना कोणत्या हंगामात शेतात उभी असतात. मार्केटची मागणी पाहूनच त्यांची लागवड असते. प्रत्येक हंगामात दोन ते तीन पिके तरी असतातच. साहजिकच अशा परिस्थितीत पाणी व्यवस्थापन काटेकोर होणे गरजेचे असते. त्यादृष्टीने स्वयंचलित ठिबक यंत्रणा (ॲटोमेशन) करण्याची गरज बारबुध्दे यांना वाटू लागली. सुमारे सहा वर्षांपूर्वी आपल्या शेतात ही यंत्रणा बसवलीदेखील. त्यासाठी साडे १० लाख रुपये खर्च केला. 

‘ॲाटोमेशन’ तंत्राचा वापर 
बारबुद्धे म्हणाले की ऑटोमेशन केल्याचे अनेक फायदे मला मिळू लागले आहेत. एकतर  पाणी व खते यांचा वापर पिकाची गरज अोळखून काटेकोरपणे होऊ लागला. त्यामुळे अतिरिक्त वापर कमी होऊन खर्चातही बचत झाली. पिकाच्या मुळांच्या कक्षेत पाणी व खते योग्य प्रमाणात जाऊ लागली.  

मातीचा व द्रावणाचा पीएच (सामु) संतुलित करणे शक्य झाले. या यंत्रणेत पाणी आणि खत मात्रा यांचे ‘प्रोग्रॅमिंग’ करता येते. त्याचा उपयोग वीजभारनियमन समस्या असलेल्या भागात होतो. खंडीत वीजपुरवठा सुरू झाल्यानंतरही पिकाला खते व पाणी योग्य वेळी व योग्य मात्रेत देता येतात. 

पूर्वी दोन मजूर पाणी देण्यासाठी लागायचे. त्यांची गरजही कमी झाली. 

उत्पादन व गुणवत्ता वाढ 
पूर्वी बारबुद्धे पिकांना दररोज पाणी द्यायचे. मात्र आता एक दिवसाआड ते पाणी देऊ लागल्याने  पाण्याचा अपव्यय होत नाही. सिंचनाची सर्व कामे केवळ बटणांवर होऊ लागल्याने वेळेत व श्रमात बचत होऊ लागली. त्यामुळे पीक व्यवस्थापनाकडे अधिक वेळ देणे शक्य झाले. म्हणूनच टोमॅटोच्या एकरी उत्पादनात मागील हंगामात वाढ झाल्याचे दिसले आहे असे बारबुध्दे म्हणाले. विदर्भातील ठिबक ॲटोमेशन व त्यातही मोठ्या क्षेत्रावरील ऑटोमेशनचा हा पहिलाच प्रयोग असावा, असा त्यांचा अंदाज आहे. 

शेडनेट, पॉलिहाउस, टेबल नर्सरीचे तंत्र 
शेडनेट तंत्रज्ञानाचा वापरही बारबुध्दे यांनी केला आहे. त्यात ढोबळी मिरची, टोमॅटो व आता पपईचे पीक ते घेणार आहेत. जमिनीवर रोपे तयार केल्यास त्या माध्यमातून किडीरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिक राहतो. त्यावर उपाय म्हणून पॉलिहाउस उभारून त्यात ‘टेबल नर्सरी’ चे तंत्र वापरण्याचा प्रयोग बारबुध्दे यांनी केला आहे. भाजीपाला व अन्य पिकांची रोपे या माध्यमातून तयार केली जात आहेत. या तंत्रज्ञानात मातीचे माध्यम न वापरता कोकोपीटचा वापर केला आहे. यात पॉटमधील छिद्रांमधून अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो. हा प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी बारबुध्दे यांच्या शेतीची वाट धरताहेत. 

नेदरलॅंडमधील तंत्रज्ञान वापरणार 
बारबुद्धे यांचा मुलगा नेदरलॅंड येथे कृषी 
पदवीचे शिक्षण घेत आहे. शिक्षणानंतर तो गावी 
परतून शेतीकडेच लक्ष देईल. त्याच्या ज्ञानाचा व 
तेथील तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होईल असे बारबुद्धे म्हणाले. 

पीक व्यवस्थापनातील काही ठळक नोंदी 
यंदा एक एकरावर भरीताच्या वांग्याची लागवड आहे. झाड नाजूक राहत असल्याने पिकाची जास्त काळजी घ्यावी लागते. पीकाला तापमान जास्त सहन होत नाही. हे सेल्फ पॉलिनेशन (स्व परागीकरण) प्रक्रिया करते. गेल्या तीन वर्षांपासून या पिकात सातत्य आहे. वीस किलोच्या बॉक्‍समधून कल्याण तसेच अमरावतीच्या बाजारपेठेत वांग्याची विक्री होते. त्याला १५ ते १८ रुपये प्रति किलोचा दर मिळतो.  

मोर्शी, वरुड तालुके हे संत्रा शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. बारबुध्दे यांच्याकडे पूर्वी १५ एकरांवर संत्रा पीक होते. मात्र दरातील चढ-उतार पाहता या पिकाखालील क्षेत्र कमी करीत ते व्यावसायिक पिकांखाली आणले. आज संत्रा केवळ चार एकरांवर आहे. 

शेती परवडत नाही असे म्हटले जाते. मात्र बारबुद्धे यांनी नियोजनबध्द शेतीचा वारसा जपत शेती फायद्याची केली. शेतीला शेती जोडण्याचे कामही केले. सुरवातीला त्यांच्याकडे १२ एकर शेती होती. टप्याटप्याने आज ती ३८ एकरांवर पोचली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com