पंधरा वर्षांपासून कोरफडीच्या शेतीत सातत्य 

पंधरा वर्षांपासून कोरफडीच्या शेतीत सातत्य 

नगर जिल्ह्यातील पाथरे खुर्द (ता. राहुरी) येथील चंद्रकांत पवार यांची सुमारे ४० एकर शेती आहे. सर्व शेती ते एकहातीच सांभाळतात. पारंपरिक पिके त्यांच्याकडे आहेत. मात्र, त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे कोरफडीसारखे पीक ते गेल्या पंधरा वर्षांपासून घेत आहेत. आपल्या प्रयोगाविषयी बोलताना पवार म्हणाले, की पूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचा सदस्य होतो. त्या वेळी विद्यापीठातील धन्वंतरी प्रकल्पास भेट दिली. त्या वेळी कोरफड व बेहडा या पिकांविषयी माहिती मिळाली. अधिक अभ्यास करून त्याच्या व्यावसायिक संधीचाही अभ्यास केला. त्यानुसार कोरफड घेण्याचे निश्चीत केले. विद्यापीठातून त्याची रोपे घेतली. 

सुमारे पंधरा ते सोळा वर्षांपूर्वी लावलेल्या कोरफडीची शेती पवार यांनी आज कायम ठेवली आहे. 

दहा गुंठ्यांत रोपवाटिका केली. नंतर पुर्नलागवड केली. सुरवातीला अर्धा एकर क्षेत्र होते. टप्प्याटप्प्याने व मार्केटचा अंदाज घेत ते चार एकरपर्यंत नेले. आज ते आठ एकरांपर्यंत आहे. 

पवार यांची कोरफड शेती दृष्टिक्षेपात 

- सुमारे १५ वर्षांपासून पिकाचा अनुभव 
- लागवडीचे अंतर- तीन बाय अडीच फूट. रोपांची एकरी संख्या- साडेसहा हजार 
- पट्टा किंवा जोड ओळ पद्धत. कोरफड काढणीसाठी क्रेटमध्ये ठेवणे व मजुरांना शेतात काम करण्यासाठी हे अंतर सोयीचे आहे. 
- शेणखत- तीन वर्षांतून एकदा एकरी एक ट्रेलर. तीन वर्षांनी वर्षाला १०-२६-२६ किंवा डीएपी खताच्या गोणींचा पावसाळ्यात वापर. 
- तणनियंत्रण महत्त्वाचे ठरते. 
- पावसाळ्यात पाणी देण्याची गरज भासत नाही. उन्हाळ्यात संरक्षित पाण्याचा वापर 
तुषार सिंचनाद्वारे पाणी महिन्यातून एकदा तीन तास. कालव्याचे पाणी मिळाले तर प्रवाही पद्धतीने दिले जाते. कापणीच्या वीस दिवस आधी चार महिन्यांत चार पाणी दिले पाहिजे. त्यामुळे कोरफडीच्या पानांची फुगवण, गर, वजन वाढते. 
- प्रति पानाचे वजन चारशे ते सहाशे ग्रॅम असले पाहिजे. कापणीच्या आधी पाणी कमी पडले तर पानांचे वजन कमी भरते. पाणी जास्त होऊनही चालत नाही. 
- पाण्याचा निचरा होणारी जमीन गरजेची. तशी नसेल तर पीक उफळू शकते. 
- कापणी वर्षातून एकदा किंवा दोन वेळेस. 

उत्पादन  
- एकरी तीस ते पन्नास टनांपर्यंत. पाणी कमी पडल्यास उत्पादनात घट येते. 

मार्केट  
अौषधनिर्मिती क्षेत्रातील कंपन्या हेच कोरफडीसाठी मार्केट आहे. या क्षेत्रातील कंपनी, मध्यस्थ, व्यापारी पवार यांच्याकडून कोरफड खरेदी करतात. त्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांच्या अनुभवात सिन्नर (नाशिक), हैदराबाद, मध्य प्रदेश आदी ठिकाणाहून खरेदी होत असल्याचे पवार यांनी सांगितले. 

दर काय मिळतो?  
बुडख्यापासून कोरफड दिल्यास साडेतीन रुपये प्रति टन 
केवळ पाने दिल्यास हाच दर पाचहजार रुपये 

विक्रीचे व्यवस्थापन  
मागील दोन वर्षांत सुमारे दीडशे टन कोरफडीला साडेतीन हजार रुपये प्रतिटन दर मिळाला. कोरफडीचे पान कापल्यानंतर दोनच दिवसांत तिच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. दूरच्या अंतरामुळे या वेळेत ही प्रक्रिया होणे कठीण असते. त्यामुळे पूर्ण झाड कापून नेले जाते. तेथे पाने कापून प्रक्रिया केली जाते. 
पाने कापणीचा खर्च प्रति दहा टनास सहाहजार रुपये येतो. ती अगदी सहजपणे कापताही येतात. 

जोखीम काय आहे?  
कोरफड लागवडीत यापूर्वी फसवणूक झाल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. पवार यांनी त्याबाबत ज्या बाबी सांगितल्या त्या अशा. 

१) कमी क्षेत्रावर म्हणजे एक ते दोन एकरांत हे पीक घेऊ नये. कंपन्यांना मोठ्या प्रमाणात माल लागतो. 
त्यामुळे क्षेत्र किमान ८ ते १० एकर असावे. 
२) काही वेळा बाजारात तेजी-मंदी या पार्श्वभूमीवर कंपनी कोरफड उचलत नाही. त्यामुळे त्या वर्षाचे नुकसान सोसण्याचीही तयारी लागते. 
३)विक्री करण्यापूर्वी खरेदीदाराचे स्तोत्र खात्रीशीरपणे जाणून घ्यावेत. 

कोरफडीचे पीक मिश्रपीक पद्धतीतच घेतले  
पवार यांनी कोरफडीचे पीक मिश्रपीक पद्धतीतच घेतले आहे. कलिंगड, तूर, पपई, शेवगा आदींचा वापर त्यामध्ये केला आहे. दीड वर्षांपूर्वी कोरफडीची सव्वा दोन लाख रोपे आफ्रिकेत मध्यस्थांमार्फत विकली. त्यातून उत्पन्नाचा स्त्रोत वाढवला. कोरफडीची वाळलेली पाने १८ रुपये प्रति किलो दराने या वर्षी प्रायोगिक तत्वावर विकली आहेत. कोरफडीसोबत बेहड्याचीही मिश्र पीक पद्धतीतच १५ वर्षांची झाडे दोन एकरांत आहेत. कोरफडीप्रमाणेच मध्यस्थ जागेवर येऊन खरेदी करतात. त्याला नऊशे रुपये प्रति क्विंटल दर मिळतो. 

एकहाती शेतीचे व्यवस्थापन  
पवार सांगतात, की सध्या मजूरटंचाई हा सर्वात मोठा प्रश्न बनला आहे. त्यामुळे स्वतःच अधिकाधिक कामे करण्यावर भर देतो. मुलगा कृष्णकांत यांचाही शेती व्यवस्थापनात सहभाग राहतो. 

अन्य पिकांमध्ये सोयाबीन, तूर अशी पिके असतात. मात्र पाण्याची कमतरता व दर यांचा विचार केल्यास 

सर्व पिकांमध्ये कोरफड हेच पीक सर्वात किफायतशीर ठरले आहे. त्यातूनच आर्थिक उत्पन्न वाढवणे शक्य झाले आहे. एकदा हे पीक लावल्यानंतर काही वर्षे ते टिकते. दरवर्षी काढणी, पेरणी या बाबींतून सुटका होते. 

चंद्रकांत पवार - ९८२२४८९८०५ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com