ताजे उत्पन्न देणारी भाजीपाला पिके ठरली वरदान 

प्रदीप अजमेरा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

जालना जिल्ह्यात अंबड तालुक्याच्या ठिकाणापासून जवळ असलेले लालवाडी गाव विविध भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. कपाशी किंवा या भागातील फळपिकांपेक्षा ही पिके आर्थिकदृष्ट्या अधिक परवडतात असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पीकपद्धतीतून ताजे उत्पन्न मिळून शेतकऱ्यांना आपली कौटुंबिक प्रगती साधता आली आहे. 

जालना जिल्ह्यातील लालवाडी (ता. अंबड) हे सुमारे ९६५ हेक्टर वाहितीखाली जमीन असलेले गाव आहे. विविध भाजीपाला पिके घेण्यामध्ये गावाने अोळख तयार केली आहे. 

गावातील सुमारे ३० ते ४० टक्के शेतकरी भाजीपाला पिके घेत असावीत असे इथल्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. साधारण मे- जून ते ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत गावात काही कोटी रुपयांपेक्षाही जास्त रक्कम या भाजीपाला पिकांतून येत असावी.  लालवाडी गावात शेतजमिनीचे धारण क्षेत्र कमी आहे. पाण्याचीही कमतरता आहे. तरीही हिंमतीने व जिद्दीने इथला शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळला. मागेल त्याला शेततळे योजनेतून गावात सुमारे १५  शेततळी पूर्ण झाली आहेत. बहुतांश शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करून मोजूनमापून पाणी देतात. 

मंडळ कृषी अधिकारी रामचंद्र फरसे व तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारंगे यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळते. 

शेतकऱ्यांचे अनुभव 
गावातील रमेश सर्जेराव शिंदे हा ३२ वर्षीय शेतकरी गेल्या दहा वर्षांपासून भाजीपाला पिकांच्या शेतीत रमला आहे. त्यांची एकूण सहा एकर जमीन. त्यात दरवर्षी दीड ते अडीच एकरांवर भाजीपाला असतो. उर्वरित क्षेत्रात कापूस असतो. गावातील अन्य शेतकऱ्यांचे भाजीपाला पिकांतील अर्थकारण पाहून रमेश यांना प्रेरणा मिळाली. आज या पिकांच्या उत्पादनाचे सर्व तंत्र त्यांनी अवगत केले असून गुणवत्तापूर्ण उत्पादनात अोळख मिळवली आहे. 

नियमित उत्पन्न देणारी पिके 
टोमॅटो, मिरची, कोबी व काकडी ही शिंदे यांची मुख्य पिके. सिंचनासाठी दोन बोअर्स आहेत. पैकी एक कापूस पिकासाठी तर दुसरे भाजीपाला पिकांसाठी उपयोगात आणले जाते. संपूर्ण क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणले आहे. प्रत्येक भाजीपाला पिकासाठी दिवसाचे दोन तास तर कापूस पिकासाठी तीन ते चार तास ठिबक चालवले जाते. पाणी कमी असल्याने त्याचा मोजून मापून वापर केला जातो.

इतर भाजीपाला
टोमॅटो प्लॉटच्या भोवतो शेपू, पालक तर काही ठिकाणी कोथिंबीर घेतली आहे. कापूस पिकातही तुरळक ठिकाणी भेंडी लावली आहे. घरची गरज भागून एखाद्या वेळी हा शेतमाल स्थानिक बाजारात विक्रीसाठी नेला जातो. त्यामुळे पूरक उत्पन्न  मिळते. 

सोप्या तंत्राचा वापर 
मिरची पिकात ठिकठिकाणी लाकडी काठ्या उभारून त्यावर बोळके व त्यास पांढरा रंग दिला आहे. 

पक्षी थांबे म्हणून त्याचा चांगला उपयोग होत असल्याचे शिंदे सांगतात. त्यामुळे अळीचे प्रमाणही काही प्रमाणात कमी होऊन पीक निरोगी राहण्यास मदत झाली आहे. 

ताजा पैसा 
शिंदे सांगतात की, मागील वर्षी भाजीपाला पिकांमधून सुमारे पाच ते सहा लाख रूपयांचे एकूण उत्पन्न मिळाले. एक एकरातून सुमारे १२०० पासून ते १५०० क्रेटसपर्यंत टोमॅटो मिळाला. अंबडची बाजारपेठ सुमारे पाच ते सात किलोमीटर अंतरावर असल्याने येथेच भाजीपाला पाठवला जातो. प्रसंगी जालना बाजारातही विक्री केली जाते. काही वेळा अनुकूलता पाहून माल नांदेडलाही पाठवला जातो. 

घरचेच श्रम व वाहन
शिंदे यांच्याच घरचेच सर्व सदस्य शेतात राबत असल्याने मजुरांवर अवलंबून राहावे लागत नाही. मजुरीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाचतो व वेळेचीही बचत होते. वाहतुकीसाठी रिक्षा स्वतःचीच असल्याने त्या खर्चातही बचत होते.

प्रगती साधली
आज भाजीपाला उत्पन्नातूनच पावणेदोन एकर शेती विकत घेणे शिंदे यांना शक्य झाले. पक्के घरही बांधले. सहा एकरांला ड्रीप केले. दैनंदिन घरखर्चासाठी भाजीपाला पिकेच महत्त्वाची ठरत असल्याचे शिंदे म्हणाले. 

कारले व दोडक्याची शेती  
गावातील गणेश जाधव सुमारे सात वर्षांपासून भाजीपाला शेतीत आहेत. त्यांची तीन कर शेती बागायती तर साडेतीन एकर शेती कोरडवाहू आहे. कारले व दोडका ही त्यांची मुख्य पिके आहेत. त्यांची लागवड साधारण मे-जूनमध्ये केली जाते. दोन्ही पिकांत आंतरपीक म्हणून काकडी घेतली जाते.दोडका पीक साधारण ६० ते ६५ हजार रुपयांचे तर कारले पीक ३५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न देते. काकडीचे पीक कमी कालावधीचे असल्याने ते लवकर निघून जाते. दोन्ही पिकांतील खर्च हे पीक कमी करते. कारले- दोडका काढणीनंतर पुढे उन्हाळ्यात कोबी घेतला जातो. त्यास प्रति कट्टा ४०० ते ४५० रुपये दर मिळतो. पाण्यासाठी दोन बोअर्स असून त्याचे पाणी सिमेंट हौदात घेतले जाते. तेथून ठिबकद्वारे पिकांना दिले जाते. गोमूत्राचा वापरही केला जातो.  

घरचे सर्वजण राबतात शेतीत
जाधव यांची मोसंबीची झाडे व ऊसही आहे. मात्र या पिकांसाठी पाणी व खर्चही जास्त असतो. त्या तुलनेत ताज्या उत्पन्नासाठी भाजीपाला शेतीच अधिक परवडते. उन्हाळ्यात रसवंती चालवून पूरक उत्पन्न मिळवले जाते. घरी तीन गायी व दोन बैल असून वर्षाकाठी ५ ते ६ ट्रॉली शेणखत मिळते.  गणेश यांचे तीन भावांचे कुटूंब आहे. तिघेही शेतात राबतात. त्यामुळे मजुरांवरील अवलंबित्व कमी केले आहे. भाजीपाला शेतीतूनच शेती व प्लॉट खरेदी करणे शक्य झाले. दुचाकी व चारचाकीही घेतली आहे.  

किफायतशीर उत्पन्न  
गावातील सुधाकर काळे यांची सुमारे साडेचार एकर जमीन आहे. त्यात टोमॅटो, फ्लॉवर ही पिके ते घेतात. कोबीला २० रुपये प्रति किलो दर मिळतो. भाजीपाला पिकापांसून सुमारे चार ते पाच महिन्यांत सुमारे ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. काही किलोमीटवरील धनगरपिंपरी येथील तलावाजवळ विहीर खोदून तेथून पाइपलाइनद्वारे पाणी आणले आहे. सुमारे दोन एकरांवर द्राक्षबाग आहे.

रमेश शिंदे, ९८२२६२५४८४ 
गणेश जाधव, ९६७३३९३०३७ 
(लेखक अंबड, जि. जालना येथे कृषी पर्यवेक्षक आहेत.)