शेती सांभाळली, विक्री व्यवस्थाही उभारली

शेती सांभाळली, विक्री व्यवस्थाही उभारली

सुशीलकुमार ज्ञानोबाराव देशमुख यांचे मूळ गाव परभणी जिल्ह्यातील  झाडगाव. १९९३ पासून देशमुख हे परभणी शहरातील सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. क्रीडा शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतरही त्यांची शेतीची आवड कायम आहे. परभणी शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावरील झाडगाव शिवारात देशमुख कुटुंबाची पंचवीस एकर शेती आहे. त्यांचे बंधू नांदेड येथे नोकरीला असल्यामुळे शेतीची जबाबदारी सुशीलकुमार यांच्याकडे आहे. नोकरीमुळे त्यांना दररोज शेतीवर जाणे शक्य नसल्याने दोन कायम स्वरूपी मजूर शेती व्यवस्थापनासाठी आहेत. दर शनिवार, रविवार शेतीवर जाऊन ते नियोजन करतात. तसेच दररोज संध्याकाळी मजुरांशी मोबाईलवर संपर्क साधून पीक व्यवस्थापनाची माहिती घेतात.  देशमुख यांची जमीन हलक्या ते मध्यम स्वरुपाची आहे. सिंचनासाठी विहीर तसेच कूपनलिका आहे. जेव्हा पाण्याची चांगली उपलब्धता होती, त्या वेळी देशमुख ऊस, केळी लागवड करत होते. परंतु गेल्या पाच वर्षांत पाणी उपलब्धता कमी झाल्याने पीक पद्धतीमध्ये बदल केला. खरिपात मूग, सोयाबीन, तूर आणि रब्बीमध्ये ज्वारी, गहू, हरभरा लागवड करतात. प्रारंभीच्या काळात ते रासायनिक निविष्ठांचा वापर करत असत. परंतु, दरवर्षी खर्च-उत्पन्नाचा मेळ बसत नव्हता. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी त्यांनी सेंद्रिय खतांच्या जास्तीत जास्त वापरावर भर दिला आहे. 

शेती नियोजनात केला बदल  
 देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांच्याबरोबरीने चर्चा करताना नैसर्गिक शेतीपद्धतीची माहिती मिळाली. गेल्या चार वर्षांपासून मी रासायनिक निविष्ठांचा वापर पूर्णपणे बंद केला. देशी गायीचे शेण, गोमूत्र प्रमुख घटक असलेले जीवामृत, घन जीवामृत तसेच दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, मिश्र पीकपद्धती, सापळा पीक लागवडीवर भर दिला. सुरवातीची काही वर्षे तुलनेने कमी उत्पादन मिळाले परंतु आता चांगले उत्पादन मिळते.  दरवर्षी पंधरा एकर सोयाबीन, मूग दीड एकर, तूर पाच एकरांवर असते. रब्बीमध्ये हरभरा चार एकर, गहू दोन एकर आणि ज्वारी दोन एकरांवर असते. दरवर्षी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार जातींची निवड करतो. शक्यतो घरचेच दर्जेदार बियाणे वापरतो. पेरणी करताना एकरी ३०० किलो घन जीवामृत जमिनीत मिसळून देतो. त्यानंतर पिकाला पाणी देताना जीवामृताची मात्रा दिली जाते. गरजेनुसार निंबोळी अर्क, दशपर्णी अर्काची फवारणी करतो. सापळा पिके, मिश्र पिकांमुळे कीड नियंत्रणास मदत होते. पीक सशक्त असल्याने प्रतिकारक्षमता वाढली आहे. माझ्याकडे लालकंधारी जातीचे दोन बैल, एक गाय आणि दोन वारसे आहेत. त्यांचे शेण, मूत्र जीवामृत तयार करण्यासाठी वापरतो. शेतात जनावरे बसवितो. मला सोयाबीनचे एकरी आठ क्विंटल, मुगाचे पाच क्विंटल, तुरीचे चार क्विंटल, रब्बी ज्वारीचे सहा क्विंटल, गव्हाचे सहा क्विंटल, हरभऱ्याचे सहा क्विंटल उत्पादन मिळते. यंदा खपली गव्हाची लागवड केली आहे. यंदाच्यावर्षी १० मीटर रूंद,१५ मीटर लांब आणि ४ मीटर खोलीचे शेततळे खोदले. शेतातील मातीचा सुपीक थर वाहून जाऊ नये यासाठी बांधबंदिस्ती केली.

रेशीम शेतीला सुरवात 
यंदा देशमुख यांनी दोन एकर तुती लागवड केली. रेशीम कीटक संगोपनगृहाची उभारणी करून ७५ अंडिपुंजाच्या पहिल्या बॅच पासून कोश उत्पादन घेतले. पहिल्या टप्प्यात त्यांना ६५ किलो कोष उत्पादन मिळाले. व्यापाऱ्यांनी जागेवर ४७० रुपये प्रति किलो दर दिला. रेशीम शेतीच्या व्यवस्थापनासाठी एक मजूर ठेवला आहे. गावातील रेशीम शेतकऱ्यांचा गट तयार केला.

देशी गाईंचे संगोपन, दूध विक्रीचे नियोजन 
देशमुख यांनी गाव परिसरात वास्तव्यास असलेल्या गुजराथी पशुपालकांच्या मदतीने देशी गाईंचे संगोपन सुरू केले. क्रांक्रेज जातीच्या वीस गायी या पशुपालकांना सांभाळण्यास दिल्या आहेत. तसेच पशुपालकांच्याकडे चाळीस देशी गाई आहेत. शिवारामध्ये दिवसभर चराई केल्यानंतर या गायी रात्रीच्या वेळी परिसरातील  शेतकऱ्यांच्या मोकळ्या शेतामध्ये मुक्कामास असतात. शेतामध्ये शेण, गोमूत्र पडते. त्याचे चांगले खत होते. त्या मोबदल्यात शेतकरी या पशुपालकांना चारा, धान्य तसेच काही रक्कम देतात. परिसरातील पाच, सहा गावात हे पशुपालक फिरत असतात. देशमुख या पशुपालकांच्याकडून दररोज ८० लिटर दूध घेतात. स्वतः सुशीलकुमार आणि त्यांचा एक सहकारी दररोज दुचाकीवरून गायींच्या मुक्कामाच्या ठिकाणाहून दूध घेऊन येतात. परभणी शहरामध्ये रतीब लावलेल्या नागरिकांच्या घरपोच दूध पोचविण्यासाठी दोन कामगार ठेवलेले आहेत. प्रति लिटर ५० रुपये या दराने दूध विक्री केली जाते.  

धान्य महोत्सवाचे आयोजन
सुशीलकुमार देशमुख यांच्यासह नैसर्गिक पद्धतीने पीक उत्पादन घेणारे प्रदीप केंद्रेकर, अॅड.दीपक देशमुख, डी. एस. कुलकर्णी, गणेश रुद्रवार यांनी एकत्र येत प्रभावती नैसर्गिक शेती उत्पादक शेतकरी समूह स्थापन केला. दरवर्षी एप्रिल महिन्यात परभणी शहरात तीन दिवस धान्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. नागरिक गहू, ज्वारी, डाळीची खरेदी करतात. या महोत्सवात ३५ शेतकरी सामिल होतात. शेतकऱ्यांना मार्केटपेक्षा अधिक दर मिळतो. समुहाच्या नावाने पॅकिंग करून धान्य विक्री केली जाते.  

ग्राहकांना थेट विक्री 
नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला गहू,ज्वारी तसेच तूर, मूग, हरभरा डाळीला ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन देशमुख यांनी डाळ निर्मितीसाठी छोटी गिरणी घेतली. देशमुख यांच्या पत्नी अंजलीताई डाळ निर्मिती तसेच गहू, ज्वारीचे पॅकिंग करण्यास मदत करतात. घरातून गहू, ज्वारी तसेच डाळीची वर्षभर विक्री होते. डाळीचे एक किलो, पाच किलो मध्ये पॅकिंग केले आहे. सरासरी ८० ते १२० रुपये किलो दराने डाळीची विक्री होते. गहू ४० रुपये किलो आणि ज्वारी ३० रुपये किलो दराने थेट विक्री होते. त्यामुळे नफ्यात वाढ झाली.

महत्त्वाचे मुद्दे 
प्रयोगशील शेतकरी, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने पीक व्यवस्थापन.
 जमीन सुपिकतेवर भर. सापळा पिके, मिश्र पिके, वनस्पतीजन्य कीडनाशकांचा वापर.
 सहा एकरावर तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा वापर.
 कृषी स्वराज शेतकरी गटाचे सदस्य. गटाची शिवारफेरी, शासनाच्या योजनांची माहिती, पीक सल्ला देवाण घेवाण.
 पेरणी, निंदणी आणि काढणीसाठी मजुरांना कंत्राटी पद्धतीने काम, त्यामुळे वेळ वाचतो. 
 परिसरातील शेतकरी मित्र पीक व्यवस्थापनासाठी मदतीस येतात, त्यामुळे फारशी अडचण येत नाही. 
थेट ग्राहकांना धान्य विक्री, त्यातून उत्पन्न वाढीचे ध्येय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com