शेतकऱ्यांमध्ये जलसाक्षरता महत्त्वाची

शेतकऱ्यांमध्ये जलसाक्षरता महत्त्वाची

शेतावरील ‘पाणी व्यवस्थापन’ हे चर्चेपुरता, वर्तमानपत्रात वाचण्यापुरता किंवा निबंधांत लिहण्यापुरते मर्यादित न ठेवता पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व आमच्या शेतकऱ्यांच्या प्रगतीचा, अर्थाजनाचा व प्रतिष्ठेचा विषय झाला पाहिजे. कारण पाणी या निसर्गदत्त देणगीच्या अभावी सजीवांना आपले अस्तित्व टिकवणे शक्य नाही. त्यासोबत राष्ट्राच्या विकासातील एक आतिशय महत्त्वपूर्ण घटक म्हणून पाण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे.

पाणी आडवा पाणी जिरवा, जलयुक्त शिवार योजना, शंभरटक्के अनुदानावर शेततळे असे चांगले उपक्रम व योजना महाराष्ट्र शासनामार्फत यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या चांगल्या उपक्रमाचा संदेश देशभर पोहचून पाण्याचा काटकसरीने व योग्य वापर करण्याचा मंत्र सर्वत्र पोहचेल यासाठी कृषी प्रदर्शनाद्वारे, प्रसिद्धी माध्यमाद्वारे प्रयत्न होत आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते आमीर खान यांच्या संकल्पनेतून “पाणी फाउंडेशन” व तसेच महाराष्ट्राचे मराठमोळे लाडके अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकाराने “नाम फाउंडेशन”या दोन्ही महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाण्यासंबंधित योग्य वापराविषयी जनजागृती व उपलब्ध पाण्याचे योग्य जतन करण्याचे काम गाव सहभागातून मोठ्या प्रमाणात होत आहे.

तसेच ठिबक व तुषार यासारख्या आधुनिक सिंचनाच्या पद्धतीचा प्रचार वाढत असून त्यानुसार शासनाकडून जनजागृती व त्यासाठी अनुदानावर आधारित योजना लागू करण्यात येत आहेत. कारण ठिबक सिंचन पद्धतीची पाणी वापरण्याची कार्यक्षमता ९० ते ९५ टक्के आहे व तुषार सिंचन पद्धतीची पाणी वापरण्याची कार्यक्षमता ८० ते ८५ टक्के आहे. या मुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन शेती मालाचा दर्जा वाढण्यास मदत होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा प्रकारच्या चांगल्या उपक्रमांना शेतकऱ्यांनी मनापासून प्रतिसाद द्यावा, कारण सिंचन व्यवस्थापन योग्य प्रकारे करून त्याद्वारे भविष्यातील शेती संबंधित पाण्याच्या सर्व गरजा कुठल्याही प्रकारचा संघर्ष न करता कार्यक्षमपणे करता येईल. कारण निसर्गाच्या असमतोला मुळे शेतीमधील सिंचनाचा प्रश्न वाढत आहे. नैसर्गिक साधन-संपत्तीचे जतन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्या दृष्टीकोनातून पाण्याचे सुयोग्य नियोजना बदल शेतकऱ्यामध्ये साक्षरता होणे गरजेचे आहे.

- गोपाल हनुमानदास तापडिया,  सहायक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, आमखेडा, जि. वाशीम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com