पंधरा हजार ब्रॉयलर पक्ष्यांचे  काटेकोर संगोपन

पंधरा हजार ब्रॉयलर पक्ष्यांचे  काटेकोर संगोपन

कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ सदृश परिस्थिती. तर कधी शेतीमालाला योग्य दर नाही. त्यामुळे शेतीतून उत्पन्न नगण्यच मिळायचे. आनंदवाडी (ता. चाकूर जि. लातूर) येथील बुंद्राळे कुटुंबाची ही अवस्था होती. शेतीला पूरक व्यवसाय शोधला पाहिजे म्हणून हे कुटुंब कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळले. 

पोल्ट्री व्यवसायाची वाटचाल 
बुंद्राळे बंधूंनी पोल्ट्री व्यवसायात आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. गुत्ती (ता. जळकोट) येथील डॉ. राजेश केंद्रे यांचे मार्गदर्शन घेतले. भांडवलासाठी बॅंकेचे कर्ज घेत नोव्हेंबर २०१६ मधे पहिले शेड उभे केले. त्याद्वारे ''बुंद्राळे पोल्ट्री फार्म'' आकारास आला. एक वर्षात सुमारे पाच बॅच घेत आत्मविश्वास वाढीस लागला. त्यानंतर व्यवसायाची गरज म्हणून नोव्हेंबर २०१७ मध्ये अजून दोन शेडस उभे केले.
 
खाद्य व पाणी नियोजन 
साधारण ४५ दिवसांची बॅच असते. या दिवसांमध्ये पिलांना वेळेवर योग्य प्रमाणात खाद्य दिल्यास त्यांचे वजन वाढते. दरही चांगला मिळतो. त्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. 
एक ते १४ दिवसांपर्यंत पिलांना ‘प्री स्टार्टर’ खाद्य दिले जाते. 
प्रतिपिलू दररोज ५० ग्रॅम खाद्य. 
फिनिशर, मका, सोयाबीन क्रूड ऑइल यांचे मिश्रण 
उन्हाळ्यात पक्षी दिवसा कमी खात असल्यामुळे रात्रीच्या वेळी खाद्य जास्त दिले जाते. 
फार्मजवळ विहीर व विंधन विहीर. त्याचे पाणी जवळच बांधलेल्या टाकीत घेऊन निर्जंतुक करून पक्ष्यांना दिले जाते. 
पाण्यासाठी स्वयंचलित ड्रिंकर्स. त्यामुळे पक्ष्यांना गरजेनुसार पाणी उपलब्ध राहते.
बॅच घेण्यापूर्वी व त्यानंतर पोल्ट्री फार्मचे निर्जंतुकीकरण. बाजूचा परिसर स्वच्छ ठेवला जातो. त्यामुळे पक्ष्यांचे आरोग्य चांगले राहते.
योग्य वेळी लसीकरण 
उन्हाळ्यात शेडमधील तापमान थंड राहावे यासाठी फॉगर्सच्या मदतीने पिलांवर पाणी शिंपडले  जाते.  
 
कामांचे वाटप  
बुंद्राळे बंधूंपैकी रामदास व तुकाराम हे शेड व पक्षी संगोपनाची तर माधव व पांडुरंग हे बँकेचे व्यवहार, मार्केटिंग, विक्री या जबाबदाऱ्या पाहतात. चौघा बंधूंचा समन्वय चांगला असल्यानेच व्यवसायात जम बसवणे शक्य झाले. 

व्यवसायाचे गणित  
 कर्नाटकातील बिदर येथून ४० रुपये प्रतिपिलू याप्रमाणे प्रतिबॅचसाठी पाच हजार पिलांची खरेदी केली जाते. ४५ ते ५० दिवसांमध्ये त्यांचे वजन अडीच ते तीन किलोपर्यंत पोचते. त्यादृष्टीने खाद्याचे नियोजन केले जाते.
प्रतिपक्षी वाढीसाठी सरासरी ११० ते १२० रुपये खर्च येतो. 
बाजारपेठेतील चढ-उतारानुसार कोंबड्यांचे दर ठरतात. श्रावण महिना वगळता अन्य महिन्यांत सरासरी ६० रुपयांपासून ते ७० रुपये व काही वेळा कमाल ८० रुपये प्रतिकिलो दर मिळतात. 
प्रतिबॅच साधारण १० टक्के नफा मिळतो.  

मार्केट मिळाले   
विक्रीसाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार पक्ष्यांच्या बॅचचे नियोजन केले जाते. तीन शेडस मधून दर पंधरा दिवसांनी बॅच विक्रीसाठी निघावी असा प्रयत्न असतो. वाहतुकीचा ताण, संसर्गजन्य रोगांमुळे काही पक्षी दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे विक्री फार्मवरूनच केली जाते. सुरवातीला मार्केट शोधण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागले. त्यातूनच आज शिरूर ताजबंद, नांदेड, निजामाबाद, उमरखेड, बिदर, लातूर येथील व्यापारी फार्मवरूनच खरेदी करू लागले आहेत. 
 : पांडुरंग बुंद्राळे, ९९२२६९१९७९

असा आहे पोल्ट्री फार्म 
शेडची लांबी २०० बाय ३० फूट. बांधणी पूर्व-पश्चिम दिशेने. 
शेडची आतील उंची १२ फूट तर बाजूची उंची आठ फूट 
बाजूची भिंत दीड फुटापर्यंत असून, त्यावर छतापर्यंत जाळी 
ऊन किंवा पाऊस शेडमध्ये येऊ नये म्हणून दोन्ही बाजूस चवाळ्याचे पडदे 
प्रतिशेड पाच हजार यानुसार तीन शेडसद्वारे पंधरा हजार पक्ष्यांचे संगोपन (ब्रॉयलर)
कोंबड्यांवर देखरेख ठेवण्यासाठी तीनही शेडसमध्ये सीसीटीव्ही. शेतातच बांधलेल्या खोलीत बसून कोंबड्यांची देखरेख शक्य होते. पांडुरंग यांनी मोबाईलशीही त्याची जोडणी केली असल्याने त्याद्वारेही नियंत्रण ठेवता येते. 

बुंद्राळे यांच्या व्यवसायाची सूत्रे  
उत्पादन खर्च कमी ठेवण्याचा प्रयत्न 
पक्ष्यांच्या वजनात सातत्य.
पक्ष्यांचा आहार आणि आरोग्यावर विशेष लक्ष 
कुटुंबाच्या सहभागातून मजूरटंचाईवर मात

पक्षिखाद्याची निर्मिती 
पक्षिखाद्य तयार करण्यासाठी लागणारे यंत्र लातूर येथून १३ हजार रुपयांना खरेदी केले आहे. कोरडा मका, सोयाबीन व अन्य घटक तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात मिसळून दर्जेदार पक्षिखाद्य कमी खर्चात बनवले जाते.
 
पोल्ट्रीखताचा वापर फायद्याचा  
बुंद्राळे आपल्या शेतात प्रामुख्याने ऊस घेतात. त्यात अन्य व्यवस्थापनासोबत पोल्ट्री खताचा वापर करणे शक्य होत असल्याने जमिनीची सुपीकता व पीक उत्पादन वाढवणे त्यांना शक्य झाले आहे. सध्या माळरानावरही ऊस जोमात बहरला आहे. रासायनिक खतांचा वापर शक्यतो केला जात नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com