खानझोडे बंधूंची यशस्वी मत्स्यशेती

खानझोडे बंधूंची यशस्वी मत्स्यशेती

वाशीम जिल्ह्यात आसेगाव (ता. रिसोड) येथे सुनील संजाबराव खानझोडे यांच्या कुटुंबाची एकत्रित सुमारे ६० एकर शेती अाहे. तीन भाऊ मिळून या शेतीचे व्यवस्थापन करतात. सोयाबीन व तूर ही त्यांची मुख्य पिके. आता जोडीला १० एकरांवर डाळिंब हे मुख्य पीक आहे. आतापर्यंत त्याचे दोन बहर घेतले आहेत. तसे खानझोडे कुटुंब प्रयोगशीलच म्हणायला हवे. सन २००४ मध्ये या कुटुंबाने रेशीम शेतीत पाय टाकले. रेशीम शेतीकडे वळालेले ते या भागातील पहिलेच शेतकरी ठरले. त्यानंतर  २००८ मध्ये त्यांनी दहा एकरांत पपई लागवड करण्याचे धाडस केले. दोन्ही प्रयोग या भागासाठी तसे नवीन होते. रेशीम शेतीत मजुरांची टंचाई भासली. शिवाय उत्पादित कोषांना मनासारखा दरही मिळाला नाही. अपरिहार्यतेने रेशीम शेती थांबवावी लागली. दहा एकरांत लावलेली पपई कारंजा व अकोला बाजारांत विकली. त्या वर्षी किलोला सरासरी सहा ते अाठ रुपये दर मिळाला. पुढील काळात अजून शाश्वत पर्याय शोधायचा होता. डाळिंब पिकातून तो मिळेल असे वाटले. मग २०१४ मध्ये दहा एकरांत डाळिंब बाग उभी केली. 

फेल गेलेला बहर  
डाळिंब बागेचे व्यवस्थापन तर उत्तम झाले. पण पाणीटंचाईने फटका दिला. सन २०१५-१६ मध्ये धरलेला बहर त्यामुळेच फेल गेला. ए ग्रेडची फळे पूर्ण नुकसानीत गेली. त्या वेळी साडेसात लाख रुपये खर्च आला होता. केवळ तीन लाख रुपयेच कसेबसे हाती आले. पण खानझोडे यांनी हिंमत हरली नाही. त्यांनी पुढील बहर धरण्यासाठी सर्व तयारी केली. आता त्यांच्याकडे पाण्यासाठी मुख्य पर्याय होता तो शेततळ्याचा.  

संरक्षित पाण्याची तरतूद   
खानझोडे यांच्याकडील ६० एकरांतील पीक व्यवस्थापन विहीर व सध्या असलेल्या चार बोअरवेल्स यांच्या साह्याने केले जाते. पाण्याची दिवसेंदिवस भासत असलेली गरज पाहता शेततळे हा नामी पर्याय होता. त्यासाठी मागील वर्षी उन्हाळ्यात ४४ बाय ४४ मीटर अाकाराचे व साडेनऊ मीटर खोलीचे  शेततळे खोदले. त्यासाठी शासनाकडून सुमारे चार लाख एेंशी हजार रुपये अनुदान मिळाले. काही स्वखर्च केला. यामुळे पाण्याची शाश्वती निर्माण झाली. या शेततळ्यापासून सुमारे दीड हजार फूट अंतरावरून पेनगंगा नदी वाहते. पावसाळ्यात या नदीला पाणी अाले, की तेथून उपसा करून शेततळे भरून घेतले जाते. शेततळ्याची क्षमता दीड कोटी लिटरची आहे. 

मत्स्यपालनाची संधी 
शेततळे उभारणीनंतरच्या काळात एकदा सुनील करडा कृषी विज्ञान केंद्रात (केव्हीके) माती परीक्षणाच्या उद्देशाने गेले होते. तेथे त्यांची केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. अार. एल. काळे यांच्याशी भेट झाली. शेतीबाबत चर्चा सुरू असताना शेततळे घेतल्याचा मुद्दा खानझोडे यांनी मांडला. डॉ. काळे स्वतः मत्स्यपालनाचे अभ्यासक असल्याने त्यांनी शेततळ्यात हा व्यवसाय करण्याची सूचना केली. म्हणजे पाण्याबरोबर माशांचे पूरक उत्पन्नही त्यातून मिळणार होते. खानझोडेही यांनाही बाब मनोमनी पटली. 

प्रशिक्षणानंतर व्यवसायाला सुरवात  
याच केव्हीकेने मत्स्यपालनातील दोन दिवसांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. सुनील यांचे बंधू संतोष यांनी त्याचा लाभ घेतला. प्रशिक्षणात मत्स्यबीजांची माहिती, हाताळण्याची तांत्रिक माहिती, पोषण, खाद्य, काढणी यांची संपूर्ण माहिती मिळाली. त्यानंतर थोड्याच काळात म्हणजे २०१६ मध्ये जुलै महिन्यात रोहू, कटला, मृगला, पंगस, सायप्रीन्स असे विविध जातींचे मत्स्यबीज सोडले. त्यासाठीही केव्हीकेची मोठी मदत झाली. मत्स्यबीजांचे व्यवस्थित पोषण केल्याने त्यांची चांगली वाढ झाली. 

माशांना मिळाले मार्केट  
साधारण नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर मासे विक्रीयोग्य झाले. या परिसरात काही कोळी बांधव राहतात. त्यातील एका व्यावसायिकाने ७५ रुपये प्रति किलो दर निश्चित केला. 

पुढे त्यांनी हे मासे आसेगाव (पेण) येथील अाठवडी बाजारात विकले. या गावाला लागूनच अाठ ते दहा गावे असून अाठवडी बाजारात मोठी उलाढाल होते. मत्स्यपालन सुरू केल्यापासून आतापर्यंत सुमारे १४ क्विंटल ७५ किलो एवढ्या माशांची विक्री केली. अजून सुमारे पाच क्विंटलपर्यंत मासे शिल्लक आहेत. मासेपालनासाठी सुमारे २३ हजार रुपये खर्च झाला. माशांना प्रामुख्याने सेंद्रिय खतांवर आधारित खाद्य दिले. कोणतेही कृत्रिम खाद्य तलावात न फेकता ते व्यवस्थित पिशव्यांच्या साह्याने माशांना दिले. यामुळे माशांचे दर्जेदार उत्पादन मिळाले. 

प्रयत्नांती परमेश्वर 
यंदाही चिकाटी ठेवून डाळिंबाची जोपासना केली. एकरी नऊ  टन याप्रमाणे १० एकरांतून ९० टन माल उत्पादित झाला. त्यातही एक बाब निराशाजनक राहिलीच. ती म्हणजे दरांबाबत. यंदा डाळिंबाचे दर कमीच होते. मात्र स्थानिक पातळीवर ३० रुपये प्रति किलो दराने व्यापाऱ्यांना माल दिला.मात्र कोणतही संकट आले तरी हताश होऊन न बसता खानझोडे यांनी त्यावर हुशारीने मार्ग शोधला. चिकाटी ठेवली. प्रयत्याचे फळ त्यांना डाळिंब  व मासे यांच्या उत्पादनाच्या रूपाने मिळालेच. 

प्रयोगशीलता जपली 
शेतीत प्रयोगशीलता जोपासताना मजूरटंचाई व काळाची गरज अोळखून खानझोडे यांनी यांत्रिकीकरणाला प्राधान्य दिले अाहे. त्यांच्याकडे ट्रॅक्टर, फवारणी यंत्र, रोटाव्हेटर, थ्रेशर, पेरणी अशी यंत्रे अाहेत. डे सात गाई, एक म्हैस व बैलजोडी अाहे. दुधाचा घरगुतीच वापर होतो. शेणखत व गोमूत्र शेतात वापरले जाते. 
: सुनील खानझोडे, ९६३७७५२७७१
डॉ. अार. एल. काळे,
: ७३५०२०५७४६
कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, करडा, ता. रिसोड, जि. वाशीम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com