सलग पिकांसह आंतरपीक म्हणून फ्लॉवर ठरते फायद्याचे

सलग पिकांसह आंतरपीक म्हणून फ्लॉवर ठरते फायद्याचे

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अभिजित पाटील यांच्याकडे खरीप आणि रब्बीमध्ये उसामध्ये आंतरपीक म्हणून, तर उन्हाळ्यामध्ये स्वतंत्र पीक म्हणून फ्लॉवरची लागवड असते. त्यांच्या अनुभवानुसार केवळ ऊस लागवडीपेक्षा त्यात फ्लॉवरचे आंतरपीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. सध्या दीड एकर क्षेत्रातील फ्लॉवरची काढणी पूर्ण झाली असून, पुढील अडीच एकर क्षेत्रातून उत्पादनास सुरवात होत आहे. रब्बी हंगामात फ्लॉवर लागवड करताना मी दर्जेदार उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड करतो. 

वर्षातून एकदा ऊसतोडणीनंतर नांगरट केल्यानंतर शेणखत एकरी ४ ते ५ ट्रॉली मिसळले जाते. त्यानंतर रब्बीतील लागवडीसाठी २५ जुलैच्या दरम्यान गादीवाफ्यावर रोपवाटिका केली जाते. रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी फ्लॉवरचे देशी वाण वापरतात, तर खरिपासाठी संकरित वाणांची निवड करतात.  

१५ ऑगस्टदरम्यान लागवडीसाठी शेतीची मशागत करून, ३ फुटी सरी पाडली जाते. त्यानंतर बेसल डोस म्हणून डीएपी १५० किलो एकरी दिले जाते. त्यानंतर रान ओलावून या वरंब्यावर ९ ते १२ इंचांवर रोपांची लागवड केली जाते. एकरी सुमारे १२ हजार रोपे बसतात. त्यानंतर पुन्हा पाणी दिले जाते. 

रोप लागवडीनंतर १० ते १२ दिवसांनी एकरी ७५ ते १०० किलो युरिया देतात.

लागवडीनंतर २० दिवसांनी पाला काढून घेतात. पाला  काढल्यामुळे झाडांची वाढ चांगली होते. तसेच बोंडे येत नाहीत खुरपणी केल्यानंतर १२-३२-१६ हे खत १०० किलो, युरिया ५० किलो  आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये ५ किलो या प्रमाणात देतात. रब्बीमध्ये फ्लॉवर आंतरपीक म्हणून असल्याने मातीची भरणी करता येत नाही. गड्ड्याचा आकार आणि वजन थोडे कमी राहते. उन्हाळ्यामध्ये सलग पिकात मात्र, या काळात मातीची भरणी   केली जाते. मातीच्या भरणीमुळे पिकाची वाढ चांगली होते.   त्याचा फायदा गड्डे भरण्यामध्ये होतो. 

रोप लागवडीनंतर प्रत्येक आठवड्याला जमिनीच्या मगदुरानुसार पाणी देतो. 

फ्लॉवर पिकामध्ये हिरवी अळी, पांढरी अळी, लष्करी अळी या किडीचा, तर करपा या रोगाचा प्रादर्भाव होतो. त्यासाठी आवश्यकतेनुसार शिफारशीप्रमाणे फवारण्या केल्या जातात. 

हिवाळ्यामध्ये ३०० पोती, तर उन्हाळ्यामध्ये ४०० पोती उत्पादन होते. एका पोत्यात सुमारे ३५ ते ४० किलो फ्लॉवर बसतो. फ्लॉवरचे मुख्य पीक म्हणून एकरी १६ टन, आंतरपिकातून १२ टनांपर्यतं उत्पादन निघते.

विक्रीचे नियोजन
मुंबईसह कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी या स्थानिक बाजारपेठेतही याचबरोबरीने या स्थानिक बाठजारपेठेतही फ्लॉवर पाठवितो. स्थानिक बाजारात नगावर, तर मुंबई बाजारात पोत्यावर फ्लॉवरची विक्री होते. वर्षभरात साधारणत: ८ ते १५ रुपये किलोपर्यंत दर मिळत असल्याचे अभिजित यांनी सांगितले. 
 : अभिजित पाटील, ९४२३३११५८६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com