रंग, सुगंधाने भारलेला हैदराबादचा फूल बाजार

डॉ. टी. एस. मोटे
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

तेलंगण राज्यातील सर्वांत मोठा फूल बाजार भरतो तो हैदराबाद येथील गुडीमलकापूर येथे. एकूण ११ एकर क्षेत्रावर पसरलेल्या या बाजाराचे संचलन कृषी उत्पन्न बाजार समिती करते. तेलंगणसह आंध्र प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतूनही येथे फुले येतात. 

पूर्वी हैदराबाद येथील मोझम झाही या भागामध्ये फूल बाजार भरायचा. यालाच ‘जामबाग फूल बाजार’ म्हटले जायचे. मात्र, जागा कमी पडू लागल्याने त्याचे स्थलांतर २००९ मध्ये गुडीमलकापूर येथे केले गेले. येथे भाजीपाला बाजारापेक्षाही फूल बाजाराचे क्षेत्र (अकरा एकर) अधिक आहे. गुडमलकापूर व्यतिरिक्त जामबाग, अमीरपेठ व सिंकदराबाद येथेही फूल बाजार भरतो.

बाजार समितीने सुमारे १६० फूल दुकाने बांधली असून, याशिवाय अन्य छोटे विक्रेतेही अनेक असतात. फूल व्यवसायाशी संबंधित सजावट, हार आणि पुष्पगुच्छ निर्मितीसाठी आवश्यक घटकांची विक्री करणारी अनेक दुकाने आहेत. 

येथून तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या विविध शहरांमध्ये फुले पाठवली जातात. 

भल्या पहाटे फुलतो बाजार 
पहाटे चारपासूनच गुडीमलकापूरमध्ये लहान- मोठे विक्रेते, खरेदीदार, शेतकरी मंडळी यांची लगबग सुरू होते. 
रात्रभर ट्रक, ॲटो, ट्रॅव्हल्स, टेम्पोमधून येथे विविध प्रकारची फुले येत असतात. राज्यातील विविध जिल्ह्यांतूनच नव्हे, तर शेजारच्या राज्यांतूनही रेल्वेद्वारे फुले येथे येतात. 
प्रत्येक व्यापाऱ्याच्या गाळ्यामध्ये फुलांचे ढीग तयार होतात. लिलाव होत ते हळूहळू कमी होत जातात. भारतीय मनोवृत्तीची ओळख असलेली दरासाठी घासाघीसही येथे सुरू असते. 

फुलांची विविधता  
गुडीमलकापूर फूल बाजारात पोचताच वेगवेगळ्या सुगंधांनी मन प्रफुल्लित होते. रंगबिरंगी फुले आपले मन मोहून घेतात. 
गुलाबाचे विविध प्रकार - विविध रंगी, देशी सुटी गुलाब फुले, ग्लॅडिएडर फूल दांडे. 
सुटी फुले - देशी व संकरित झेंडू, मोगरा, शेवंती, निशिगंध, क्रॉसान्ड्रा, डेझी इ. 
कट फ्लाॅवर - डच गुलाब, जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड, ट्यूलिप इ.
फिलर्स -  ॲस्परॅगस, अरेकापाम, रेड ड्रेसिना, बर्ड ऑफ पॅराडाईज,   हेलिकोनिया इ. 

अनेक भागांतून आवक 
पूर्वी हैदराबाद शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये फूल पिकांची मोठी लागवड होती. येथून हजार किलोपेक्षा जास्त मोगरा येत असे. मात्र, वाढत्या शहरीकरण, औद्योगीकरण, मजुरीमुळे फुलांचे क्षेत्र कमी झाले. आता त्याची जागा आंध्र प्रदेशातील मालावरम, विजयवाडासह कर्नाटक, महाराष्ट्र व तमिळनाडू येथील फुलांनी घेतली आहे. 

जरबेरा व कार्नेशनची आवक होसूर (तमिळनाडू), चिकबल्लापूर (कर्नाटक), महाराष्ट्रातून होते.  

भारतात सुट्या फुलांच्या उत्पादनामध्ये तमिळनाडू प्रथम क्रमांकावर आहे. चेन्नई, बंगळूर, उटी, कोची, म्हैसूर येथून मोठ्या प्रमाणात फुले येतात. हैदराबादच्या आजूबाजूला असलेल्या करीमनगर, निजामाबाद, सिद्धीपेठ, वरंगल, हनमाकोंडा, कम्मम, शंकरपल्ली, शमशाबाद, मैनाबाद येथून मोठ्या प्रमाणात सुटी फुले येतात.

किमतीमध्ये अस्थिरता हे सर्वच 
फूल बाजाराचे वैशिष्ट्य ः 
फुलांची मागणी ही सण, उत्सव, विवाहाच्या शुभ तारखा या काळात वाढते. बहुतांश शेतकरी हे लक्षात घेऊन फुले काढणीचे नियोजन करत असतात. त्यामुळे आवक काही प्रमाणात वाढत असली, तरी किंमतही चांगली मिळते. अन्य काळात किमती कमी राहतात. 

सणासुदीमध्ये मोगऱ्याचे भाव प्रतिधारा (३०० ग्रॅम) ६० रुपये, अन्य काळात ते १० ते १५ रुपयांपर्यंत राहतात. 

गुलाब, जरबेरा, कार्नेशन या कट फ्लाॅवरचे दर प्रतिदांड्यास २ ते ३.५ रुपयांपर्यंत वाढतात, तर मागणी कमी असल्याच्या काळात ०.५ ते १.५ रुपयांपर्यंत घसरतात. झेंडूही प्रतिकिलो ८० रुपयांपासून कधी कधी ५-१० रुपयांपर्यंतही खाली येतो.

येथील व्यापारी रामा मंजुनाथ सांगतात, की फुलांची मागणी आणि आवक यानुसार दर ठरत असतात. कधी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू असते, तर कधी आसू. कधी कधी नफ्याची अपेक्षा न ठेवता व्यवसाय करावा लागतो. 

व्यवहाराची पद्धत -
आपल्याकडील बाजार समितीप्रमाणे व्यवहार चालतो. विक्री केलेल्या मालाचे कमिशन ४ टक्के व बाजार समितीचे एक टक्का कमिशन शेतकऱ्यांकडून घेतले जाते. 
काही शेतकरी सरळ मंडीमध्ये माल घेऊन येतात व ठोक विक्रेत्यामार्फतच त्याची हर्रासी (विक्री) होते. 

काही शेतकरी कमिशन एजंटामार्फत मालाची विक्री करतात. कमिशन एजंट माल जमा करून ठोक विक्रेत्यांकडे आणतो. ठोक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना माल विकतात. येथे फूल बाजारात काही ठोक विक्रेत्यांची एकाधिकारशाही आहे. हे ठोक विक्रेते राज्य- परराज्यांतील मोठ्या फूल उत्पादकांच्या संपर्कात असतात. अशा शेतकऱ्यांना दरामध्ये काही प्रमाणात संरक्षण देत विश्‍वास संपादन केला जातो. आवक कमी असल्याच्या काळात हे शेतकरी त्यांचे हक्काचे ठरतात. 

कट फ्लाॅवर्समध्ये मोठे ठोक विक्रेते असून, ते ऑर्किड, लिलिअम, अँथुरियमसारख्या फुलांची अन्य देशांतून आयातही करतात.

फुलांची स्थानिक नावे - 
बहुतेक फुलांचे व्यवहार हे स्थानिक भाषेतून होतात. येथील स्थानिक भाषेत चामंथी (शेवंती), बंथी (झेंडू), रुबीज (लाल गुलाब), टायगर (पिवळा गुलाबी असा रंग मिश्रित गुलाब), चांदणी (तगार), गुलाबी (गुलाब), कानाकरम (अबोली), जरमनी (ॲस्टर), मोगालू (मोगरा) असे संबोधले जाते.   

गजरा, वेणीवर फुले महिलांचा बाजार 
येथे छोट्या पाटीमध्ये गजरा, वेण्या घेऊन बसलेल्या अनेक महिला दिसतात. दाक्षिणात्य महिलांमध्ये गजरा आणि वेण्यांची मोठी हौस असते, त्यावरच हा बाजार फुलतो. फूल बाजारातून सुट्या फुलांची खरेदी करून आकर्षक गजरे, वेण्या तयार करतात. त्यावर अनेकजणींचे कुटुंब चालते. येथील विक्रेती चिन्नम्मा यांनी सांगितले, की दररोज २०० ते ३०० रुपयांची सुटी फुले विकत घेऊन, त्यापासून तयार केलेल्या गजरे- वेण्यांपासून ५०० ते ६०० रुपये मिळतात. अनेक लहान व किरकोळ दुकानदारही येथून गजरे घेऊन जातात. 

फिलर्सची विक्री 
सुशोभीकरणासाठी फुलांसोबतच ॲस्परॅगस, अरेकापाम, रेड ड्रेसिना, बर्ड ऑफ पॅराडाईज, हेलिकोनिया यांसारखी फिलर्स लागतात. फूल बाजारातील दुकानांसोबतच लहान- मोठे विक्रेते रस्त्यांवर यांची विक्री करतात. ॲस्परॅगसच्या छोट्या जुड्या करून विकणाऱ्या यादय्या यांनी सांगितले, की परिसरातील शेतकऱ्यांकडून २०० ते २५० जुड्या खरेदी करून येथे विक्री करतो. फिलर्सच्या दरातही चढ-उतार असले तरी दिवसाचे २०० ते ४०० रुपये मिळतात. 

हारांचा व्यवसाय 
निरनिराळ्या फुलांपासून वैविध्यपूर्ण, कलाकुसरयुक्त हारांचीही काही दुकाने आहेत. मागणीप्रमाणे लांबीचे हार तयार केले जातात. त्याची किंमत फुले आणि कलाकुसरीप्रमाणे हजारो रुपयांपर्यंतही जाते. फुलांचे किरकोळ विक्रेते कोटा रेड्डी सांगतात, की हैदराबादमध्ये जवळपास ५०० किरकोळ विक्रेते आहेत. सणासुदीच्या काळात मी क्विंटलभर सुटी फुले व २०० पेक्षा जास्त कट फ्लॉवरचे बंच खरेदी करतो. मात्र, अन्य वेळी हे प्रमाण मागणीनुसार कमी असते. उत्सवाच्या काळात येथे तुम्हाला रात्रंदिवस हार बनविण्याचे काम सुरू असल्याचे दिसेल.

२५ जुलै रोजी येथे सुमारे १४,८०४ किलो फुलांचा व्यवहार झाला. त्याची ठोक किंमत ९ लाख ३१ हजार रुपये होती. सध्या कोणताही सण नसल्यामुळे व्यवहार कमी असून, सणांच्या काळात आवक तीन ते चार पटीने वाढते. तसेच, एकूण किंमतही चार ते पाच पटीने वाढत असल्याचा अनुभव आहे. 

डॉ. टी. एस. मोटे, ९४२२७५१६००
(लेखक नांदेड येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)