जयाताईंनी तयार केल्या  फळे, भाजीपाला स्वादाच्या शेवया

 संतोष मुंढे
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

वाट कितीही अवघड असली तरी प्रामाणिकपणा आणि जिद्दीने मार्गक्रमण केले तर यश हमखास मिळतेच. असा प्रयत्न करणाऱ्यांपैकीच एक आहेत, औरंगाबाद येथील 
सौ. जया जगदीश साब्दे. बाजारपेठेची गरज आणि कल्पकता वापरून जयाताई तेरा स्वादाच्या शेवयानिर्मिती करतात. या उत्पादनास विविध शहरांतून मागणी वाढत आहे.

औरंगाबाद शहरातील नाईक नगर भागात साब्दे कुटुंब राहाते. कुटुंबाच्या चरितार्थासह आर्थिक प्रगतीसाठी लघू उद्योगाची छोटेखानी सुरवात करणाऱ्या जयाताईंनी एक दोन नव्हे, तर तब्बल तेरा स्वादांच्या शेवया तयार केल्या आहेत. हे करताना गुणवत्ता आणि स्वाद जपल्याने ग्राहकांकडून शेवयांना चांगली मागणी आहे. बाजारपेठेत त्यांच्या सिद्धी ब्रॅंडने वेगळी ओळख तयार केली. दरमहा त्या दीड ते दोन क्विंटल शेवयांची विक्री करतात. शेवयांची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी तासाला ४० किलो शेवया तयार करणारे यंत्र विकत घेतले. याचबरोबरीने प्रक्रिया उद्योग वाढविण्यासाठी भाजीपाला, फळांची ग्रेव्ही, गव्हाची सोजी तयार करणारी यंत्रणाही त्या विकत घेणार आहेत. बाजारपेठेच्या दृष्टीने बारकोड, ट्रेडमार्कसाठी प्रयत्न सुरू आहेत. सुपर शॉपीमध्ये विक्रीसाठी कंपनीशी त्यांनी बोलणी सुरू केली आहेत.

लघू उद्योगाच्या दृष्टीने टाकले पाऊल

सौ. जया साब्दे यांनी शेवयानिर्मिती उद्योग सुरू करण्यापूर्वी एका खासगी कंपनीत वर्षभर नोकरी केली. त्यानंतर एका शाळेत शिक्षिकेचीही नोकरी केली. जवळपास सात महिने खाणावळही चालविली. २००८ ते २०११ पर्यंत जयाताईंनी ज्वेलरी, रुखवत साहित्य तयार करून त्याचीही विक्री केली. याच दरम्यान त्यांनी घरगुती प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने तयारी सुरू केली. २०११ मध्ये जयाताईंनी पहिल्यांदा मिरची पावडर व मसाले तयार करण्यासाठी गिरणी सुरू केली. सुमारे तीस हजार रुपये गुंतवून सुरू केलेली गिरणी दोन वर्षे चालविली. त्यामधून  ग्राहकांची नेमकी गरज काय, याचा अंदाज आला. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी शेवयानिर्मितीचा निर्णय घेतला.  

शेवयानिर्मितीस केली सुरवात 
जयाताईंनी पारंपरिक शेवयांच्या निर्मितीस सुरवात केली. योग्य दर्जामुळे शेवयांना मागणी वाढू लागली. शेवयांची मागणी वाढल्याने त्यांनी या व्यवसायात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. यासाठी स्वतःची काही बचत आणि आईकडून काही रक्कम उसनी घेतली. आर्थिक गणित जमल्यावर मार्च २०१४ मध्ये शेवयानिर्मिती यंत्र आणि

शेडसाठी १ लाख ४० हजारांची गुंतवणूक केली. 
आपल्याला जे जमते त्यामध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून व्यवसायवृद्धीसाठी कसा उपयोग करता येईल, या प्रयत्नात जयाताई असतात. उत्पादनाची गुणवत्ता वाढविणे, नवीन लघू उद्योगाच्या दृष्टीने जयाताईंनी फळप्रक्रिया, सोयाबीन प्रक्रिया, पालेभाज्या प्रक्रियेबाबत प्रशिक्षण घेतले. पालेभाज्या आणि  फळांवर प्रक्रिया करून जयाताई तेरा स्वादांच्या शेवया तयार करतात. ही प्रक्रिया करीत असताना गव्हाची सोजी व पालेभाज्यांच्या गुणवत्तेला धोका पोचणार नाही याची खबरदारी घेण्याचे तंत्र त्यांनी आत्मसात केले. त्यामुळे शेवयांना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. शेवयानिर्मितीसाठी त्या केवळ गव्हाच्या सोजीचा वापर करतात. 

जयाताई तयार करीत असलेल्या दाळबट्टीचे पीठ नांदेड, परभणी, उस्मानाबाद, पुणे, नाशिक, नगर, बंगलोरमधील बाजारपेठेत पोचले आहे. विशिष्ट पद्धतीने तयार केलेले  पीठ व तळलेली दाळबट्टी किमान महिनाभर चांगली राहू शकते, असं जयाताई सांगतात.

जयाताईंच्या शेवया प्रक्रिया उद्योगामध्ये दोन महिलांना कायम आठ महिने रोजगार मिळाला आहे. दिवाळी व उन्हाळ्यात मजुरांचे प्रमाण पाचपर्यंत जाते. व्यवसायवृद्धीसाठी त्यांनी आधुनिक यंत्रणेची नोंदणी केली असल्याने एक पुरुष व तीन महिलांना वर्षभर रोजगार देण्याची क्षमता त्यांच्या लघू उद्योगामध्ये येणार आहे.

प्रशिक्षणामुळे अवगत झाले तंत्र
औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे फळप्रक्रिया, सोयाप्रक्रिया व भाजीपाला प्रक्रियेचे तंत्र जयाताईंना अवगत झाले. प्रशिक्षणामुळे गव्हाच्या सोजीपासून साध्या शेवयासह विविध फळे व भाजीपाल्याचा वापर करत सुमारे तेरा स्वादांच्या शेवया जयाताई तयार करतात. येत्या काळात जांभूळ, सीताफळ व पेरू स्वादांच्या शेवयानिर्मितीचे काम त्यांनी हाती घेतले आहे. सोयाबीनवर प्रक्रियेबाबतही त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. याचबरोबरीने कुरडई, चकली, तांदळापासून पापडनिर्मिती त्या करतात. सध्या जयाताई गहू सोजी, सोयाबीन, दूध, आंबा, चॉकलेट, बीट, पुदिना, पालक, टोमॅटो, नाचणीच्या स्वादाच्या शेवया तयार करतात.

उत्पादित मालाच्या विक्रीसाठी जयाताईंचे पती जगदीश साब्दे यांची मोलाची भूमिका आहे. थेट ग्राहकाला विक्री करण्याचे तंत्र जगदिशरावांनी अवगत केले आहे. उत्पादनाचा जमाखर्च तसेच संपूर्ण विक्रीची जबाबदारी ते सांभाळतात.

परराज्यांतील प्रदर्शनात सहभाग
कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद येथील प्रा. दीप्ती पाटगावकर म्हणाल्या, की संघर्ष व प्रयत्नांशिवाय जीवनात यश नाही. जयाताईंची मेहनत त्यांना भुवनेश्वर (ओडिशा) येथे देशपातळीवरील प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी देवून गेली. त्यांनी उत्पादित केलेल्या विविध स्वादांच्या शेवयांचे कौतुकही झाले. गुणात्मक दर्जा सांभाळल्याने विविध स्वादांच्या शेवयांना सातत्याने मागणी वाढत आहे. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग लघू उद्योग करू इच्छिणाऱ्या महिलांनाही होत असतो.