स्वनिधी, गटबांधणीतून विदर्भात दुग्धव्यवसायाला बळ  

स्वनिधी, गटबांधणीतून विदर्भात दुग्धव्यवसायाला बळ  

अलीकडे केवळ शेतीवर अवलंबून राहणे शक्य होत नाही. पूरक व्यवसायाची जोड त्यास द्यावी लागते. मात्र शेतीतील समस्या लक्षात घेता एकट्या दुकट्या शेतकऱ्याला एखादा व्यवसाय उभा करून त्याला मोठे स्वरूप देणे शक्य होत नाही. विदर्भात दुग्धव्यवसायात तरी ही बाब लक्षात येते. काळाची गरज अोळखून अकोला शहरापासून काहीच किलोमीटवरील खरप-पाचपिंपळ गावातील काहीजण एकत्र आले. त्यांनी सामूहिकरीत्या दुग्धव्यवसायात उडी घेतली आहे. 

सहयोगी गटाची स्थापना 
कृषी विभागाच्या ‘अात्मा’अंतर्गत  खरप-पाचपिंपळ भागातील वीस शेतकऱ्यांनी मिळून सहयोग शेतकरी उत्पादक गट स्थापन केला अाहे. हे सर्वजण शेतीव्यतिरिक्त प्लंबिंग, इलेक्ट्रीशियन, मिस्त्री असे कारागीरही अाहेत. केवळ शेतीवर पुरेसे अर्थाजन होत नसल्याने भरीव प्रगतीसाठी एक होण्याची जाणीव या गटातील सदस्यांना झाली. एकोणीस जून, २०१२ रोजी अस्तित्वात आलेल्या या गटातील प्रत्येकाने दरमहा दोनशे रुपये बचत करण्यास सुरवात केली. चार वर्षांच्या काळात सुमारे पावणेचार लाख रुपये गोळा झाले. या रकमेत अाणखी भर घालून जानेवारी २०१६ मध्ये १० म्हशी अाणल्या. जनावरे, गोठा, अन्य साहित्य असा सुमारे साडेपाच लाखांपर्यंत खर्च आला. शेडसहित भांडवल खर्च अकरा लाख रुपयांपर्यंत पोचला. यासाठी कुठल्या शासकीय योजनेची, बँकेची अार्थिक मदत घेतली नाही. 
 
दुभत्या जनावरांची वाढली संख्या  
गटातील सदस्यांकडून जी रक्कम जमा झाली त्यातून दहा म्हशी घेणे सहयोग गटाला शक्य झाले. 
सोबतच २०१६ पासून प्रत्येक सदस्याने दरमहा दोनशे रुपयांएेवजी एक हजार रुपयांची बचत सुरू केली. दर महिन्याला एक म्हैस विकत घेत अाता गटाकडील म्हशींची संख्या २१ पर्यंत पोचली अाहे. मुऱ्हा जातींच्या म्हशी अाहेत. दररोज एकूण १२० ते १३० लिटरपर्यंत दूध संकलित  होते. 

आत्मा, कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन 
गटाने दुग्धव्यवसायात सुरू केलेले काम लक्षात घेता अकोला तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन (अात्मा) यंत्रणा व कृषी विज्ञान केंद्र, सिसा (उदेगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने दुग्धउत्पादन शेतीशाळा घेतली जात अाहे. यामध्ये डॉ. गोपाल मंजुळकर, तालुका व्यवस्थापक विजय शेगोकार यांच्यासह तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. यात पशुपालकांच्या अडचणीही सोडविल्या   जातात.  

स्वतः ग्राहकपेठ तयार केली  
एकीकडे जनावरांचे व्यवस्थापन, दूध संकलन या बाबी सुरू असताना अकोला शहरात ग्राहकवर्ग तयार करण्याचे कामही सुरू होते. गटातील प्रदीप फाटे, सचिव राजेश ताथोड, प्रमोद महल्ले यांच्याकडे या विषयातील स्वतंत्र जबाबदारी वाटून दिली अाहे. अकोला शहरातील ग्राहकांना शुद्ध दूध घरपोच केले जाते. उत्पादनाचा दर्जा चांगला ठेवल्याने ग्राहकांच्या संख्येत वाढ होत अाहे. सध्या सुमारे ८० लिटरपर्यंत दूध नियमितपणे प्रतिलिटर ५५ रुपये दराने उपलब्ध केले जाते. शिल्लक दूध डेअरीला लिटरला ४५ रुपये दराने दिले जाते. येत्या काळात दही, पनीर, तूपनिर्मितीत उतरून ग्राहकांना ही उत्पादने घरपोच देण्याचा गटाचा मनोदय आहे. सध्या महिन्याचे एक लाख ८० हजार रुपये उत्पन्न मिळते. त्यातील खर्च वजा जाता ४० हजार रुपयांपर्यंत नफा मिळतो. येत्या वर्षात त्याच वाढ केली जाणार आहे.  

चोख व्यवस्थापन
म्हशींची दैनंदिन निगराणी, चारा-पाणी या बाबी वेळच्या वेळी केल्या जातात. व्यवसायासाठी जागा ही मुख्य गोष्ट होती. त्यासाठी गटातील तिघांची मिळून सुमारे साडेचार एकर जमीन भाडेतत्त्वावर वापरण्यात अाली. यातच शेड, काही जागेत गोठा व हिरवा चारा मिळण्यासाठी चारावर्गीय पिकांची लागवड केली अाहे. म्हशींना आहारात हिरवा, कोरडा चारा; तसेच पशुखाद्यात सरकीचा समावेश केला जातो. म्हशींचे अारोग्य जपण्यासाठी पशुवैद्यकाची नियमित मदत घेतली जाते. दैनंदिन व्यवहार, खर्चाच्या सर्व नोंदी ठेवण्याची जबाबदारी एका सदस्याकडे देण्यात अाली अाहे. 

गटाची प्रेरणा मिळाली गावालाही 
अाजवर विविध कारणांमुळे विदर्भात दुग्धव्यवसायाला उतरती कळा लागली अाहे. मात्र गटाची प्रेरणा आता खरप-पाचपिंपळ भागातील अन्य शेतकऱ्यांनाही मिळू लागली आहे. सुरवातीला या गावात केवळ ४० लिटरपर्यंत दूध संकलन व्हायचे. अाता ते पाचशे लिटरपर्यंत पोचले अाहे. गावातील शेतकऱ्यांची दोन ते दहा एकर अशी जेमतेम जमीन धारणा अाहे. त्यात कपाशी व सोयाबीन, हरभरा अशी पारंपरिक  पिके घेतली जातात. मात्र दुग्धव्यवसायाने गावकऱ्यांना मोठे बळ दिले  आहे.  

 प्रदीप फाटे, ९८८१४८५३९७
(अध्यक्ष, सहयोगी गट)

एकजुटीने उभे  राहतेय कार्य 
गटातील प्रत्येक सदस्यामार्फत बचत होणारी रक्कम बँकेत मुदत ठेव (एफडी) म्हणून ठेवण्यात आली आहे. सदस्यांकडून जमा होणारी रक्कम; तसेच दुग्धव्यवसायातून येणाऱ्या मिळकतीतून कुठलाही परतावा अागामी पाच वर्षे मिळणार नाही, असेही एकमताने ठरले असल्याचे गटाचे अध्यक्ष प्रदीप फाटे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com