दुग्ध व्यवसायातून बचत गटाने मिळविली बाजारपेठ

दुग्ध व्यवसायातून बचत  गटाने मिळविली बाजारपेठ

अमरावती जिल्ह्यातील बोपी गावातील महिलांनी ६ मार्च २०१५ रोजी रिद्धीसिद्धी स्वयंसहायता महिला समूहाची स्थापना केली. यामध्ये मंगला खराबे (अध्यक्षा), पुष्पा शेटे, वनिता साखरकर (सचिव), बेबी ढेरे, हर्षा खराबे, विजया खराबे, कांता गणवीर, मीरा जाधव, मंजुराबाई खराबे यांचा समावेश आहे. गटातील महिला दरमहिना शंभर रुपयांची बचत करतात. 

देशी गाईच्या शेणापासून धूपबत्ती
गोमूत्र अर्काला मर्यादित बाजारपेठ असल्याने गावात उपलब्ध संसाधनाचा वापर करीत देशी गाईच्या शेणापासून धूपबत्ती तयार करण्यासाठी वनिता साखरकर आणि गावातील बचत गटातील महिलांनी पुढाकार घेतला आहे. धूपबत्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या शेणाची उपलब्धता गटातील महिलांच्या घरच्या देशी गाई तसेच गावातील इतर महिला गटातील सदस्यांकडे असलेल्या देशी गाईंपासून केली जाते. देशी गाईचे शेण, लिंबाचा पाला तसेच इतर सहा वनस्पतींचा वापर धूपबत्तीमध्ये केला आहे. धूपबत्ती तयार करण्यासाठी गावातील विजय दंदे यांची मदत होते. गटातर्फे पहिल्यांदाच सुमारे ५० किलो धूपबत्तीचे उत्पादन करण्यात आले. मुंबई येथे आयोजीत कृषी प्रदर्शनात धूपबत्यांची विक्री करण्यात आली. एका पाऊचमध्ये दहा धूप कांड्यांचे पॅकिंग केले जाते. तीस रुपयांना एक पॅक विकला जातो. 

प्रदर्शनातून मिळविली बाजारपेठ
अमरावती येथे तीन वर्षांपूर्वी कृषी विभागाच्या पुढाकाराने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात वनिता साखरकर यांनी पहिल्यांदा गोमूत्र अर्काच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. या पाच दिवसांच्या कालावधीत दहा हजार रुपयांच्या अर्काची विक्री झाली. शंभर रुपयांना अर्धा लिटर याप्रमाणे गोमूत्र अर्काची विक्री केली जाते. त्यानंतर अशा प्रकारच्या प्रदर्शनातून गोमूत्र अर्काला बाजारपेठ आणि ग्राहक मिळविण्यात त्यांनी सातत्य ठेवले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने गेल्या वर्षी मुंबईत आयोजित प्रदर्शनात ३७ हजार रुपयांच्या अर्काची विक्री झाली. या माध्यमातून त्यांचा आत्मविश्‍वास वाढीस लागला.

गोमूत्र अर्क निर्मितीला सुरवात 
गोमूत्र अर्क निर्मितीबाबत वनिता साखरकर म्हणाल्या की, दुग्ध व्यवसायाच्या एका कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्यानंतर परतीच्या प्रवासात एका देशी गोवंशाचे संगोपन करणाऱ्या गोशाळेला मी भेट दिली. या भेटीदरम्यान गोमूत्र अर्काला मागणी असल्याचे लक्षात आले. या दौऱ्यावर परतल्यानंतर देशी गाईंच्या संवर्धनाचा निर्णय घेतला. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. संजय देशमुख यांच्याकडून गोमूत्र अर्काकरीता लागणाऱ्या यंत्राविषयी माहिती घेतली. त्यानंतर मी गोमूत्र अर्क निर्मितीसाठी ५१ हजार रुपयांची यंत्र सामग्री खरेदी केली. सोळा लिटर गोमूत्रावर या यंत्रात प्रक्रिया होते. त्यापासून सहा लिटर अर्क मिळतो. अर्क निर्मितीसाठी चौदा तासांचा कालावधी लागतो. हे यंत्र विजेवर चालते. मुख्य अर्क हा वाफेपासून मिळतो. काळ्या रंगाचे गाळ द्रावण सयंत्रातील खालच्या बाजूस जमा होते. गोमूत्र अर्क करताना तुळस आणि पुदिन्याचा वापर केला जातो. दर महिन्याला २२५ लिटर अर्क तयार होतो. अर्धा लिटर बाटलीत अर्काचे पॅकिंग केले जाते. सध्या १०० रुपये दराने अर्धा लिटर गोमूत्र अर्क विक्री केली जाते. अर्क निर्मिती करण्यासाठी परवाना घेतला आहे. बाजारपेठेत ‘माउली अर्क` या ब्रॅंडनेमने विक्री केली जाते. 

स्वयंसहायता गटातील चार महिलांना गोमूत्र अर्क निर्मितीच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. कामाचे स्वरूप पाहून महिलांना पैसे दिले जातात. याबाबत वनिता साखरकर  म्हणाल्या की, गावातील त्रिवेणी महिला समूहातर्फे गोमूत्रापासून जैविक कीडनाशकांची निर्मिती  केली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर गोमूत्राची गरज असते. परिसरात काठीयावाडी गोपालकांकडून प्रति लिटर दहा रुपये दराने गीर गाईचे दररोज ३० लिटर गोमूत्र खरेदी केले जाते. गटाने अडीच लाख रुपयांची गुंतवणूक करून जैविक कीडनाशक निर्मिती व्यवसायाची उभारणी केली आहे. या जैविक कीडनाशकामध्ये गोमूत्राच्या बरोबरीने कण्हेर, कडूनिंब, लसूण, मिरी, मिरची हे घटक वापरले जातात. सध्या प्रायोगिक तत्त्वावर गोमूत्र अर्क अाधारित जैविक कीडनाशकाची निर्मिती सुरू आहे. या उद्योगाच्या परवान्यासाठी आम्ही अर्ज केला आहे. सध्या उत्पादित अर्क परिसरातील शेतकरी फवारणीसाठी घेऊन जातात. दोनशे रुपये लिटर या दराने अर्काची विक्री होते. आत्मा यंत्रणेने या उपक्रमशिलतेची दखल घेत वीस हजार रुपयांचा पुरस्कार गटाला दिला आहे.  

गटातर्फे पूरक उद्योगांना सुरवात 
 गावामध्ये बचत गटाची चळवळ गतिमान करण्यामध्ये वनिता साखरकर यांचा मोठा वाटा आहे. गावात सुमारे दहा महिला स्वयंसहायता समूहाची उभारणी त्यांच्या मार्गदर्शनात झाली आहे. या माध्यमातून गावात दुग्ध व्यवसायासाठी गटातील महिलांनी पुढाकार घेतला. दुग्ध व्यवसायाबाबत माहिती देताना वनिता साखरकर म्हणाल्या की, रिद्धीसिद्धी समूहातील सदस्यांच्या मासिक बचतीमधून आजपर्यंत बॅंकेत सव्वा लाख रुपयांचा निधी बॅंकेत जमा झाला आहे. दीड, अडीच आणि साडेचार लाख रुपये याप्रमाणे खासगी संस्थेकडून कर्जाची उचल करण्यात आली. या माध्यमातून पशुपालनास सुरवात केली. माझ्याकडे सध्या तीन गावरान गाई तसेच आठ म्हशी आहेत. आमच्या गटातील महिलांकडे गाई, म्हशी मिळून एकूण ४५ जनावरे आहेत. सध्या दररोज गावातील खासगी डेअरीला ३५ लिटर दूध जात आहे. म्हशीच्या दुधाला ५० रुपये आणि गाईच्या दुधाला ३५ ते ३८ रुपये प्रति लिटर असा दर मिळतो. हर्षा खराबे यांनी कर्ज रकमेतून किराणा व्यवसाय सुरू केला. बेबी ढेरे यांनी अगरबत्ती व्यवसायाची सुरवात केली. पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या दीड व अडीच लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड गटातर्फे वेळेवर करण्यात आली. आता शेवटच्या टप्प्यातील साडेचार लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड नियमितपणे केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com