उत्कृष्ट व्यवस्थापनातून साधले दुग्धव्यवसायात नफ्याचे गणित 

  गोपाल हागे
शुक्रवार, 14 जुलै 2017

बुलडाणा जिल्ह्यात धाड हा मराठवाड्याला लागून असलेला तसा सुपीक भाग सिंचनसुविधांमुळे संपन्न झाला अाहे. पिकांची उत्पादकता चांगली असून पूरक व्यवसाय बऱ्यापैकी पाय रोवत अाहेत. धाड येथील संतोष सुखदेव गुजर या युवा शेतकऱ्याने पूरक म्हणून दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. त्यातून आज चांगली भरारी घेतली अाहे. एका गायीच्या संगोपनापासून सुरू झालेला दुग्धव्यवसाय अाता १४ गायींपर्यंत विस्तारला अाहे. दुग्ध व्यवसायात चोख व्यवस्थापन, यंत्रतंत्राचा वापर करून नफ्याचे गणित साधले. अाज तरुणांसाठी संतोष गुजर यांचे प्रयत्न दिशादर्शक ठरत अाहेत.

बुलडाणा जिल्ह्यात धाड हा मराठवाड्याला लागून असलेला तसा सुपीक भाग सिंचनसुविधांमुळे संपन्न झाला अाहे. पिकांची उत्पादकता चांगली असून पूरक व्यवसाय बऱ्यापैकी पाय रोवत अाहेत. धाड येथील संतोष सुखदेव गुजर या युवा शेतकऱ्याने पूरक म्हणून दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. त्यातून आज चांगली भरारी घेतली अाहे. एका गायीच्या संगोपनापासून सुरू झालेला दुग्धव्यवसाय अाता १४ गायींपर्यंत विस्तारला अाहे. दुग्ध व्यवसायात चोख व्यवस्थापन, यंत्रतंत्राचा वापर करून नफ्याचे गणित साधले. अाज तरुणांसाठी संतोष गुजर यांचे प्रयत्न दिशादर्शक ठरत अाहेत.

धाड (ता. जि. बुलडाणा) परिसरात दुग्ध व्यवसाय अनेक वर्षांपासून होतो. याच गावातील संतोष गुजर यांची सुमारे १२ ते १५ एकर शेती आहे. मात्र शेतीपेक्षा ‘दुग्ध’ हाच त्यांचा मुख्य व्यवसाय झाला आहे. सन २०१४ मध्ये होलस्टीन फ्रीजीयन (एचएफ) गाय खरेदी करून व्यवसायास सुरवात केली.

तिचे संगोपन करीत असताना दुग्धव्यवसायाचे आर्थिक गणित लक्षात येऊ लागले. त्यामुळे विस्तार करण्याचे ठरविले. काही गायी गोठ्यातच पैदास केल्या. काही लोणी, सांगोला या बाजारपेठांमधून  अाणल्या.

दुग्धव्यवसायावर दृष्टिक्षेप 
आज गोठ्यात सुमारे १४ गायी (एचएफ).
प्रति गाय दूध देण्याची क्षमता- सरासरी २० लिटर. 
गोठ्यात पैदास केलेली एक गाय दिवसाला ३२ लिटर दूध देते. 

स्व:खर्चातून उभा केला व्यवसाय
एखाद्या व्यवसायाची सुरवात करताना अनेक जण शासकीय अनुदान किंवा योजनेबाबत चौकशी करतात. संतोष यांनी मात्र स्वबळावरच व्यवसाय उभारायचे ठरवले. एका गायीपासून १४ गायींपर्यंत व्यवसाय वाढविताना एकही रुपयांचे अनुदान घेतले नाही. यातून येणाऱ्या उत्पन्नातूनच पुढील खर्च ते करीत गेले. 

अाधुनिक पद्धतीचा गोठा 
यात गायींना बसण्यासाठी रबरी मॅट, मिल्किंग मशीन, कुट्टी यंत्र स्वखर्चातून अाणले. गोठा उभारणीला सहा ते सात लाख रुपये खर्च केला. गेल्या काही महिन्यांपासून मुक्तसंचार पध्दतीने गायींचे व्यवस्थापन केले जाते. यामुळे गायींचे अारोग्य चांगले राहतेच. शिवाय दुधावाढीवरही त्याचा अनुकूल परिणाम झाला आहे. अाज त्यांच्याकडे ७० हजार रुपयांपासून एक लाख रुपये किमतीपर्यंतची गाय अाहे. 

चोख व्यवस्थापनावर भर 
दुग्ध व्यवसायातील यशाचे गमक हे व्यवस्थापनात असल्याचे गुजर अावर्जून सांगतात. गायींना वेळेवर चारा अाणि पाणी देताना त्यांचे अारोग्य चांगले राहावे, यासाठी वेळच्या वेळी व्यवस्थापन होते. त्यासाठी मजूर ठेवले अाहेत. गायींना वर्षभर हिरवा चारा मिळेल अशी पिकांची लागवड करतात. मका हे हिरव्या चाऱ्यासाठी मुख्य पीक असते. 

दूध संकलनाची जबाबदारी  
धाडमध्ये खासगी डेअरीचे संकलन सुरू व्हावे, यासाठी गुजर यांनी पुढाकार घेतला. दूध संकलनाची जबाबदारी घेतली. सोबत पशुखाद्याचे विक्री केंद्र सुरू केले. त्यामुळे या भागातील पशुपालकांना हवे असलेले खाद्य जागेवरच मिळू लागले. हा व्यवसाय सुरू केल्यापासून गायींच्या अारोग्याची काळजी कशी घ्यावी हे गुजर यांनी शिकून घेतले. अाजारांची लक्षणे अोळखून अनेकदा पशुवैद्यक उपलब्ध होऊ शकणार नसेल तर गुजर प्राथमिक उपचारही करतात. इतरांना सल्ला देतात.     

धाड- दुग्ध व्यवसायासाठी पोषक बाजारपेठ 
धाड हे बुलडाणा तालुक्यातील मोठ्या गावांपैकी एक अोळखले जाते. येथे उदयोन्मुख बाजारपेठ तयार होत असून या ठिकाणी विविध व्यवसाय स्थिरावले अाहेत. पाणी, हिरव्या चाऱ्याची व्यवस्था, मागणी यामुळे शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय बळकट होत अाहे. गावात दिवसाला सुमारे १५ हजार लिटर दूध संकलन होते. जळगाव जिल्ह्यातील डेअरीला हे दूध जाते. दर दहाव्या दिवशी शेतकऱ्यांना चुकारे मिळतात. दुधाला सध्या प्रतिलिटर सरासरी २७ ते २८ रुपये दर मिळतो. दर दिवसाला चार लाखांची तर महिन्याची सुमारे एक ते सव्वा कोटी रुपयांची उलाढाल येथे होत असावी. वर्षाला दुग्धव्यवसायातून किमान १० कोटींपेक्षा अधिक पैसा या भागात पोचतो. छोटे-मोठे शेतकरी या व्यवसायात उतरले असून प्रत्येकाच्या दारी दुधाळ जनावरे पाहावयास मिळतात.   

शेती झाली पूरक
घरची सुमारे १३ ते १५ एकर शेती दुग्ध व्यवसायामुळे पूरक झाली अाहे. दुग्धव्यवसाय प्रमुख झाला अाहे. शेतीत सोयाबीन व मका हीच मुख्य पिके असतात. 

शेतीतही जोपासली चांगली उत्पादकता
छोटा भाऊ अंकुश, अाईवडील असे संतोष यांचे कुटुंब अाहे. शेतीला सिंचनाची सोय निर्माण केली. आहे. सोयाबीनचे एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. रब्बीत मका हे मुख्य पीक अाहे. त्याचे सरासरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. एखाद्या वर्षी हे उत्पादन ३५ क्विंटलपर्यंतही पोचल्याचे गुजर म्हणाले. दुग्धव्यवसायातून अाता वर्षाला सुमारे ५० ट्रॉली शेणखताची उपलब्धता होते. त्याचा वापर शेतातच केला जातो. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर व त्यावरील खर्च कमी झाला आहे.

 संतोष गुजर,  ९९२३२३७७८८