शेवग्यापासून बनवा विविध मूल्यवर्धित पदार्थ

शेवग्यापासून बनवा विविध मूल्यवर्धित पदार्थ

शेवग्याच्या (Moringa oleifera) पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियांमध्ये पोषक घटक असतात. जीवनसत्त्व अ, ब आणि क, खनिजे विशेषतः लोह आणि सल्फर, निथोनाइन आणि सिस्टनाइनसारखी अमिनो आम्ले असतात. त्यात ९० पोषक घटक आणि ४६ प्रकारचे रोगप्रतिकारक घटक असतात. त्यामुळे शेवग्याच्या विविध भागांचा वापर ३०० पेक्षा अधिक आजारांच्या उपचारांमध्ये केला जातो. तसेच त्याच्या वापराचे कोणतेही विपरीत परिणाम शरीरावर दिसून आलेले नाहीत. 

विशेषतः आरोग्यपूर्ण हृदयासाठी, रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण सामान्य राहण्यासाठी, मुक्त घटकांचे विषारीपण कमी करण्यासाठी शेवग्याचा वापर होतो. दाह कमी करणाऱ्या अवयवांना मदत करतो. तसेच रक्तातील हिमोग्लोबीनचे कमी असलेले प्रमाण वाढवते. प्रतिकारक क्षमतेला साह्य करते. 
डोळ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी, मेंदूच्या कार्यक्षमता आणि हाडांच्या आरोग्यासाठी शेवगा अत्यंत उपयुक्त आहे. 
कुपोषण, अशक्तपणा कमी करण्यासाठी, स्ननदा मातांच्या दुधामध्ये वाढ होण्यासाठी, मेनापॉजच्या काळातील नैराश्‍य यावरही शेवगा उपयुक्त ठरतो.
जिवाणूरोधक गुणधर्मामुळे त्वचारोगावरील उपचारात किंवा पाणी शुद्धीकरणासाठी उपयोग होतो. 

वग्यापासून मूल्यवर्धित पदार्थनिर्मिती 
पाने 
जगभरात पोषक, पूरक आहारामध्ये शेवगा पानांचा समावेश केला जातो. ही पाने भाजी स्वरूपातही खाल्ली जातात. त्याचप्रमाणे ही पाने वाळवून योग्य वातावरणामध्ये काही महिन्यांपर्यंत साठवता येतात. पाने वाळवून त्याच्या भुकटीचा वापर पूरक, पोषक आहारामध्ये केला जातो. तसेच त्याचा वापर कोणत्याही अन्य भाज्या, पास्ता, ब्रेड यासारख्या खाद्य पदार्थांमध्ये केला जातो.  

शेवगा पानांची भुकटी 
काढणीनंतर फांद्यावरून पाने वेगळी करावीत. ती स्वच्छ धुऊन 
सावलीत वाळवावीत. उन्हामध्ये वाळवल्यास त्यातील जीवनसत्त्व अ नष्ट होते. वाळवलेल्या पानांची बारीक पावडर तयार करावी. ती हवाबंद बाटलीमध्ये साठवावी. ही पावडर प्रकाश आणि आर्द्रतेपासून दूर ठेवल्यास सहा महिन्यांपर्यंत चांगली टिकते. 
महत्त्वाचे...
जीवनसत्त्व अ टिकवून ठेवण्यासाठी वाळवण्यापूर्वी पाने ब्लांच करून घ्यावीत. 
कोणत्याही सूप किंवा सॉसेसमध्ये एक किंवा दोन चमचा शेवगा पावडर मिसळल्यास पोषक घटकांमध्ये वाढ होते. 

शेवगा पानांचा रस 
ताजी पाने कुस्करून, थोड्याशा पाण्यामध्ये मिसळून मॉर्टरमध्ये टाकावीत. अधिक प्रमाणात रस तयार करण्यासाठी हॅमर मिलचा वापर करावा. ताज्या शेवगा शेंड्यापासूनही (चाळीस दिवसांपेक्षा कमी दिवसांच्या) रस काढता येतो. त्यात थोडेसे पाणी म्हणजेच प्रति १० किलो ताज्या घटकांसाठी एक लिटर पाणी मिसळावे. ते बारीक केल्यानंतर गाळून घ्यावे. त्यात पाणी मिसळून पातळ करावी. चवीप्रमाणे साखर मिसळावी.  
एक लिटर पाण्यामध्ये एक किंवा अधिक चमचे शेवगा भुकटी मिसळावी. त्यात चवीप्रमाणे साखर मिसळावी. अधिक काळ साठवण्यासाठी वरील तीव्र द्रावण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावा.  
 
शेवगा पानांचे सॉसेस 
दोन कप ताजी पाने एक कप पाण्यामध्ये मिसळून काही मिनिटांसाठी वाफवून घ्यावीत. त्यात बारीक चिरलेला कांदा, मीठ, लोणी आणि अन्य सिझनिंग घटक चवीसाठी मिसळून सॉस तयार करावा. 

फुले 
शेवग्याच्या फुलांमध्ये कॅल्शिअम आणि पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असतात. त्यांचा वापर शिजवून शेवगा पानांच्या पाककृतीमध्ये किंवा अन्य भाज्यांमध्ये करता येतो. त्याचप्रमाणे वाफवलेल्या फुलांचा वापर सॅलडमध्येही करता येतो. 

शेंगा 
संपूर्ण कोवळी शेंग ही शिजवून खाता येते किंवा कढीमध्ये वापर केला जातो. जुन्या शेंगांमधील वरील आवरण अधिक टणक होते. त्यातील गर व अपक्व बिया अद्याप खाण्यायोग्य असतात. शेंगा साधारणतः पाच सेंमी आकारापर्यंत कापून, पाण्यामध्ये उकळून घेतल्या जातात. त्यांची डाळीसोबत आमटी करतात. शेंगांतील बिया आणि गर खाल्ला जातो. अत्यंत कोवळ्या (एक सेमीपेक्षा कमी जाडीच्या) शेंगांचा वापर सॅलडनिर्मितीमध्ये होते. ३ सेंमी आकाराचे तुकडे करून, १० मिनिटे वाफवले जातात. त्यानंतर तेल, व्हिनेगर, मीठ, मिरे, लसूण आणि पार्सेली यांच्या मिश्रणामध्ये चांगल्या रीतीने हलवून घेतले जातात. 

बिया 
शेवग्याच्या बिया पाण्यामध्ये टाकून काही मिनिटांसाठी उकळून घेतात. त्यानंतर त्यावरील पारदर्शक भाग आणि पाणी टाकून देतात. बिया हिरव्या असेपर्यंत खाता येतात; मात्र पिवळ्या रंगाच्या झाल्या की त्या शक्‍यतो कोणी खात नाहीत. अशा शेवगा बिया चांगल्या रीतीने वाळवून, बारीक भुकटी करून घ्यावी. त्याचा वापर विविध सॉसेसमध्ये सिझनिंगसाठी केला जातो. 

शेवगा तेल 
बियांवर दाब टाकून त्यापासून तेल मिळवता येते. चांगल्या वाळलेल्या बियांमध्ये तेलाचे प्रमाणे ४२ टक्‍क्‍यांपर्यंत असते. या तेलाचा रंग आकर्षक पिवळा असा आहे. हे तेल किंचित चिकट असल्याने अत्यंत नाजूक अशा यंत्रातील (उदा. घड्याळे) घर्षण कमी करण्यासाठी वापरले जाते. शेवगा खाद्य तेलामध्ये मेदांम्लाचे प्रमाणे ०.५ ते ३ टक्‍क्‍यांपर्यंत कमी अधिक होते. आयुर्वेदानुसार, हे तेल मेंदू कर्करोग, अँटी पायरेटिक, पोषक घटकांनी परिपूर्ण, जिवाणूरोधक, बुरशीरोधक, दाह कमी करणारे व कोलेस्टेरॉलचे प्राण कमी करणारे असल्याचे सांगितले जाते. दक्षिण आशियाई औषधांमध्ये या तेलाचा वापर होतो. 

तेल काढण्याच्या दोन प्रक्रिया असल्या, तरी त्यातील कोल्ड प्रेस ही शेवगा बियांपासून तेल काढण्यासाठी ही सोपी पद्धती मानली जाते. बियांवरील टणक कवच काढण्यासाठी माणसांच्या साह्याने किंवा विद्युत ऊर्जेवर चालणारे यंत्र उपलब्ध आहे. बियांवरील आवरण काढल्यानंतर ताज्या स्थितीमध्ये म्हणजेच त्वरित तेल काढावे. आवरण काढल्यानंतर अधिक काळ गेल्यास काढलेल्या तेलाचा रंग हा गडद होतो. 

सुरवातीला काही मिनिटांसाठी यंत्र सुरू करून, त्यानंतर त्यामध्ये आवरण काढलेल्या बिया टाकाव्यात. काही मिनिटांमध्ये बियातून तेल येऊ लागते. दुसऱ्या बाजूने बियांचीपेंड बाहेर येते. शुद्ध कोल्ड प्रेस तेलाचा रंग हा सोनेरी पिवळा असतो. 

हे तेल दोन ते तीन दिवसांसाठी स्थिर ठेवावे. त्यातील तरंगते कण खाली बसण्यास मदत होते. याला सेडिमेंटेशन म्हणतात. बॉटलिंग पूर्वी सेडिमेंटेशन न केल्यास त्याती पाण्याचा अंश राहू शकतो. त्यामुळे तेलाची स्थिरता आणि गुणधर्म यावर परिणाम होतो. 

एक किलो शेवगा बियापासून ४०० ग्रॅम तेल मिळते, जर बिया तपकिरी होईपर्यंत भाजून घेतल्या, तर त्यातून तेलाचे प्रमाण वाढते. 
स्थिर झालेल्या तेल अलगद (खालील थर न हलवता) स्वच्छ भांड्यात काढून घ्यावे. अत्यंत बारीक चाळणीच्या साह्याने गाळून घ्यावे.

सौंदर्य प्रसाधनामध्ये शेवगा तेलाचा वापर 
तेलांचा वापर त्वचा रोगासाठी मलम, शरीराच्या मसाजसाठी केला होतो. स्थिरता आणि अन्य तेलांप्रमाणे अधिक काळ ठेवल्यास वास न येण्याचा गुणधर्म यामुळे सुगंधी द्रव्ये उद्योगामध्ये (अत्तरे, केसांसाठी सुगंधी तेलाच्या निर्मितीसाठी) त्याचा वापर होतो. 

अन्य पिकांच्या तुलनेमध्ये शेवग्याच्या वाळवलेल्या हिरव्या पानांतील पोषक घटक 
शेवगा पानांमध्ये दुधाच्या तुलनेमध्ये कॅल्शिअम १७ पट अधिक असतात. 
क जीवनसत्त्वाचे प्रमाण संत्र्याच्या तुलनेमध्ये सात पट अधिक असते. 
केळीच्या तुलनेमध्ये पोटॅशिअमचे प्रमाणे १५ पट अधिक आहे.
पालकांच्या तुलनेमध्ये लोहाचे प्रमाण २५ पट अधिक.
गाजराच्या तुलनेमध्ये अ जीवनसत्त्वाचे प्रमाण १० पट अधिक. 
योगर्ट किंवा दह्याच्या तुलनेमध्ये प्रथिनांचे प्रमाण ९ पट अधिक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com