सर्वांगीण विकासाचा आदर्श ठरलेले डाऊच

सर्वांगीण विकासाचा आदर्श ठरलेले डाऊच

श्री साईबाबा यांच्या शिर्डी या प्रसिद्ध धार्मिक स्थळापासून सुमारे १५ किलोमीटरवर डाऊच बुद्रुक नावाचे छोटेसे गाव आहे. नगर-मनमाड महामार्गावर मुख्य रस्त्यापासून सुमारे दहा किलोमीटवर  वसलेले डाऊच हे जवळपास १२५० लोकसंख्‍येचे गाव. गावातील ८० टक्‍के शेतकरी अल्पभूधारक आहेत. गावचे सुमारे ६०९ हेक्‍टर भौगोलिक क्षेत्र अाहे. सन १९७२ च्या पूर्वी येथील शेतकरी उसाचे पीक घ्यायचे. काळानुसार शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत कमालीचा बदल केला. सातत्याने पाऊसही कमी होत गेला. कपाशी, मका, गहू, सोयाबीन आदी पिकांकडे शेतकरी वळले. 

गावातील विकासकामे 
अलीकडील काळातील परिस्थिती सांगायची तर गावाच्या सरपंच विमलताई दहे, उपसरपंच बाबासाहेब दहे यांच्‍यासह ग्रामपंचायत सदस्‍य व ग्रामसेवक महेश काळे यांच्या पुढाकाराने विकासकामांना सुरवात झाली. दोन ऑक्‍टोबर २०१५ रोजी गावात विकासाला दिशा देणारी ग्रामसभा घेण्यात आली. सन २०१६  मध्ये गावाने स्‍मार्ट ग्रामयोजनेत सहभाग घेतला. हळूहळू कामांची अंमलबजावणी सुरू झाली.

सेंद्रिय शेती योजनेत सहभाग
गावातील सुमारे ६०९ हेक्‍टर एकूण क्षेत्रापैकी ५८० हेक्‍टरवर कापूस, मका, गहू, ऊस अशा पिकांसोबतच चाऱ्यासाठी लसूणघास घेण्यात येतो. कृषी विभागाच्‍या माध्‍यमातून सेंद्रिय शेती प्रकल्‍पांतर्गत १६ प्रकल्‍पांची निवड करण्‍यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाच्‍या माध्‍यमातून गावातील जनावरांची मोफत तपासणी करण्‍यात आली अाहे. त्‍यांना जंतुनाशके, चारा बियाणे वाटपासोबतच कडबा कुट्टी सयंत्र, मुरघास युनिटचे वाटप करण्‍यात आले आहे. शेतकऱ्‍यांना मोफत माती तपासणी सुविधा व  शेतीची आरोग्‍यपत्रिका देण्‍यात आली आहे.

बचत गटाद्वारे कौटुंबिक  अर्थव्‍यवस्‍थेला बळकटी
महिलांच्‍या आर्थिक सक्षमीकरणासाठी गावात दहा बचत गट स्‍थापन झाले आहेत. गटांच्या माध्यमातून छोट्या व्यवसायाला सुरवात झाली आहे. बचत गटांमुळे गावातील कौटुंबिक अर्थव्‍यवस्‍था सुधारू लागली आहे.

दुग्ध व्यवसायाचा आधार
गावात पूर्वीपासून दुग्ध व्यवसाय केला जातो. मात्र दुष्काळानंतर यात विस्कळितपणा आला होता. पाणी व्‍यवस्‍थापन केल्‍याने जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था प्रत्येकाला करता येऊ लागली. आजघडीला गावात सुमारे साडेसहाशे दुभत्या तर ९० भाकड संकरित गायी व काही कालवडी आहेत. गावात दररोज सुमारे साडेचार हजार लिटर दुधाचे संकलन सहकारी व खासगी संस्थांच्या माध्यमातून होते. दुधाला प्रति लिटर सरासरी 30 रुपयांपर्यंत दर मिळतो. दूध विक्रीतून चांगले उत्पन्न गावात येते. यातूनच बहुतांश कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे.

संस्‍काराची शाळा आणि अंगणवाडी
गावातील अंगणवाडीच्‍या माध्यमातून पाच वर्षांपर्यंतच्या ५४ मुलांना शिक्षणासोबतच संस्कारांचे धडेही दिले जात आहेत. जिल्‍हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची सेमी इंग्रजी माध्‍यमाची शाळा आहे.

संपूर्ण गावाचा सहभाग
स्‍मार्ट ग्राम योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामस्तरीय समिती, ग्रामपंचायत, सेवा सहकारी सोसायटी, दूध संस्था, बचत गट, शेतकरी मंडळ व गावातील प्रतिष्ठित व्यक्‍ती, तरुणांसह स्त्रियांचाही सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. सरपंच, उपसरपंच यांच्यासह सोसायटीचे अध्यक्ष जयवंत दहे, ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष धर्मा दहे यांच्‍यासह गावातील प्रत्‍येकाचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. स्‍मार्ट ग्राम योजनेंतर्गत १० लाख रुपयांचा निधी गावाला मंजूर झाला आहे.

आदर्श गावाची दृष्टी मिळाली 
दोन ऑक्‍टोबर २०१५ रोजीच्या ग्रामसभेत ग्रामसेवक महेश काळे यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी डाऊच गावाला आदर्श गाव म्हणून नावारूपास आणण्याचा संकल्प केला. पुढे गाव आदर्श बनवण्यासंबंधी  चर्चा झाली. त्यातून कोपरगाव तालुक्‍यातील दहेगाव बोलका गावाचा पाहणी दौरा झाला. 
त्यातून गावाला आदर्श बनविण्याची दृष्टी मिळाली.  

लोकसहभाग ठरलाय महत्त्वाचा 
एकोप्याचे महत्त्व पटल्याने ग्रामस्थांनी २०१२ मध्ये झालेली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली. त्यामुळे निवडणुकीत होणाऱ्या लाखोवधींच्या खर्चाला ‘ब्रेक’ लागला. "इको व्हिलेज'' योजनेत सतत तीन वर्षे सहभाग नोंदविल्याने गावाला या योजनेचाही निधी मिळाला. त्याच वेळी ग्रामविकासाचा हुरूप वाढलेल्या ग्रामस्थांनी उर्वरित विकासकामे ‘स्‍मार्ट ग्राम’ योजनेतून पूर्ण करण्याचा संकल्प केला.

उभा केला आठ लाखांचा निधी
लोकसहभागातून शाळा खोली बांधकाम, जलशुद्धीकरण प्रकल्‍प, मंदिर सुशोभीकरण आदी कामे करण्‍यात आली. सुमारे आठ लाख रूपयांचा निधी लोकसहभागातून उभा राहिला. दलित वस्‍ती सुधार योजनेंतर्गत गावात सिमेंटचे रस्‍ते करण्‍यात आले आहेत. गावातील संपूर्ण सांडपाणी भूमिगत गटार योजनेद्वारा गावाबाहेर काढले आहे. काही टप्प्यांवर गटार योजना, स्‍वच्‍छतेसाठी शोषखड्डे खोदले आहेत.  

वैशिष्ट्यपूर्ण कामे 
गावातील जवळपास सर्व रस्ते सिमेंटचे आहेत. सुसज्ज ग्रामपंचायत भवन उभे राहिले आहे. 
गाव ९८ टक्‍के गाव हागणदारीमुक्‍त असून ते शंभर टक्‍के होण्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. -प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत १० किलोमीटरचा रस्‍ता झाल्‍याने गाव मुख्‍य रस्‍त्‍याशी जोडण्‍यासाठी मदत झाली आहे. 
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २९ आदिवासी बांधवांना घरकुलाचा लाभ देण्‍यात आला आहे.
पाणीपुरवठा योजनेसाठी चौदाव्‍या वित्त आयोगाअंतर्गत मुख्‍य जलवाहिनीचे काम पूर्ण करण्‍यात आले आहे. जिल्‍हा परिषद शाळेच्‍या संरक्षण भिंतीचे काम प्रगतिपथावर आहे.

मुलीच्‍या जन्‍माचे स्‍वागत करणारे गाव
गावात बेटी बचाव, बेटी पढाव या अभियानांतर्गत मुलीच्‍या जन्‍माचे स्‍वागत केले जाते. ग्रामपंचायत स्‍वउत्‍पन्‍नातून एक हजार रुपये बचत प्रमाणपत्राचे वाटप करते. गावात ६३९ मुलांमागे ६३२ मुलींचे प्रमाण आहे. सन २०१५ नंतर सुरू झालेल्या या उपक्रमाचा लाभ ३५ मुलींना देण्‍यात आला आहे.

बायोगॅसमध्ये नवी ओळख
दुग्‍ध व्‍यवसाय करणाऱ्या ६१ कुटुंबांकडे बायोगॅस युनिट बसविण्‍यात आले आहेत. यामुळे जळाऊ इंधनाची बचत झाली अाहे. धूरमुक्‍त गावासोबतच ‘बायोगॅस’वापरणारे गाव अशी ओळख निर्माण झाली आहे.

ठळक विकासकामे 
ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढावे यासाठी लोकसहभागातून जलशुद्धीकरण प्रकल्‍पाची उभारणी करण्यात आली आहे. 
डाऊच गावासह लगतच्या दोन गावांनाही पिण्‍याचे स्‍वच्‍छ व शुद्ध पाणी २५ पैसे प्रति लिटर दराने उपलब्‍ध करून दिले आहे.
गावात सिमेंटचे तसेच पाणंद रस्ते तयार करण्‍यात आले आहेत. जलसंवर्धनासाठी दोन वनराई बंधारे व एक नाल्याचे खोलीकरण करण्यात आले आहे. 
आमदार स्‍नेहलता कोल्‍हे यांनी उपलब्‍ध करून दिलेल्‍या चार लाख रुपयांच्‍या निधीतून स्‍मशानभूमीत विधीशेडची उभारणी करण्‍यात आली आहे. 
बंदिस्‍त गटारीसोबतच घर तेथे शोषखड्डे अभियान राबविण्‍यात आले अाहे. यातून गाव सांडपाणीमुक्‍त करण्‍यात ग्रामस्‍थांना यश आले आहे.
संपूर्ण गावात रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूंनी नारळाची सुमारे २५- झाडे तर अन्य ३५०० झाडांची लागवड करण्‍यात आली आहे. 
गावातील २३० कुटुंबांपैकी २२० जणांकडे शौचालये आहेत. सामूहिक शौचालयांची उभारणी करण्‍यात आली आहे. 
शेती, शिक्षण, स्वयंरोजगार, सामाजिक स्वास्थ्य, आरोग्य या पंचसूत्रीवर आधारित गावाचा विकास करण्यासाठी २०१६ मध्ये स्‍मार्ट ग्राम योजनेतून अनेक विकामकामे प्रगतीपथावर आहेत.

 महेश काळे,  ९०११०९०९६१.  (ग्रामसेवक)
(लेखक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय उपमाहिती कार्यालय, शिर्डी, जि. नगर येथे कार्यरत आहेत )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com