परभणी जिल्ह्यात ड्रायस्पेलमुळे किडीचा पिकांवर हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

परभणी  - जून महिन्याच्या सुरवातीच्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली. परंतु गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड (ड्रायस्पेल) पडल्यामुळे पैसा (मिलीपीड), करडे भुंगरे आदी किडी उगवलेल्या कापूस, सोयाबीन या प्रमुख नगदी पिकांचे नुकसान करत आहेत.

परभणी  - जून महिन्याच्या सुरवातीच्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली. परंतु गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड (ड्रायस्पेल) पडल्यामुळे पैसा (मिलीपीड), करडे भुंगरे आदी किडी उगवलेल्या कापूस, सोयाबीन या प्रमुख नगदी पिकांचे नुकसान करत आहेत.

जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये मराठवाड्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, तूर आदी पिकांची पेरणी केली. कपाशीची लागवड केली आहे. परंतु गेल्या १५ ते २० दिवसापासून अनेक भागात पावसाचा खंड पडला आहे. या परिस्थितीत नुकत्याच उगवू लागलेल्या कोवळ्या पिकांची पाने कुरतडून किडी नुकसान करत आहेत. करडे भुंगेरे  पानांना छिद्रे पाडत आहेत. कोवळी रोपे खावून टाकत आहेत. किडीच्या नियंत्रणासाठी कृषी शास्त्रज्ञांच्या शिफारसीनुसार कीटकनाशकांचा वापर करणे आवश्यक आहे.

पैसा (मिलीपेड) ही कीड कपाशीचे बियाणे खाऊन फस्त करत आहे. त्यामुळे कपाशीच्या शेतामध्ये तूट दिसून येत आहे. तूट लावलेल्या जागीचे बियाणेदेखील खाऊन टाकत आहेत. रोपावस्थेतील पिकांची पाने खाऊन टाकत आहेत. शेतातील रोपांची संख्या कमी होत असल्यामुळे दुबार पेरणीचे सावट आहे. पैसा किडीच्या नियंत्रणासाठी शेत तसेच बांधावरील किडी हाताने वेचून काढावीत. साबणाच्या पाण्यात बुडवून त्यांचे नियंत्रण करावे किंवा खोल खड्डा करून जमिनीत गाडून टाकावे. शेत तसेच बांध तणविरहित ठेवावीत. पिकांमध्ये कोळपणी करावी. त्यामुळे जमिनीतील अंडी आणि लपून बसलेली किड नष्ट होतील. चांगला पाऊस पडल्यानंतर किडींचे नियंत्रण नैसर्गिकपणे होते. कीटकनाशकांचा वापर करताना शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. पी. एस. झंवर, डाॅ. अनंत बडगुजर यांनी केले आहे.

पावसाअभावी उगवण नीट होईना, उगवू लागलेल्या कापूस, सोयाबीनची झाडं किडी खाऊन टाकत आहेत. दुबार पेरणी करावी लागणार आहे.
- विष्णू निर्वळ, शेतकरी, रुढी, ता. मानवत.

वीस दिवसांपासून पाऊस उघडला आहे. कापूस, सोयाबीन, तूर या पिकांची पाने किडी कुरतडून खात आहेत. त्यामुळे उत्पादनात घटीचा धोका आहे. 
- प्रताप काळे,  शेतकरी, धानोरा काळे, ता. पूर्णा.