माळरानावर फुलले डाळिंब...

शामराव गावडे
रविवार, 9 जुलै 2017

गणित विषय शिकविण्यामध्ये हातखंडा असलेल्या प्रा. मल्लाप्पा खोत यांनी शेतीमध्येही चांगले नियोजन ठेवले आहे. प्रयोगशील शेतकरी तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्यातून प्रा. खोत यांनी उटगी (ता. जत, जि. सांगली) येथे वडिलोपार्जित खडकाळ माळ जमिनीवर डाळिंबाची बाग फुलविली आहे.

गणित विषय शिकविण्यामध्ये हातखंडा असलेल्या प्रा. मल्लाप्पा खोत यांनी शेतीमध्येही चांगले नियोजन ठेवले आहे. प्रयोगशील शेतकरी तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्यातून प्रा. खोत यांनी उटगी (ता. जत, जि. सांगली) येथे वडिलोपार्जित खडकाळ माळ जमिनीवर डाळिंबाची बाग फुलविली आहे.

प्रा. मल्लाप्पा सिदराय खोत यांचे मूळ गाव जत तालुक्‍यातील उटगी. नोकरीच्या निमित्ताने प्रा. खोत हे ३५ वर्षांपासून इस्लामपूर येथे स्थायिक झाले. परंतु त्यांनी गावाकडील जिरायती शेतीचा विकासच्या दृष्टीने प्रयत्न सुरूच ठेवले. प्रा. एम. एस. खोत यांनी २०१२ मध्ये सेवानिवृत्ती घेतली. परंतु शिकविण्याच्या अावडीमुळे गणिताचे वर्ग सुरू केले. इतर वेळी विद्यार्थ्यांच्या शंका- समाधानात ते व्यस्त असतात. वयाची साठी ओलंडली तरी प्रा. खोत शेती विकासाच्या ध्यास घेऊन गेल्या २० वर्षांपासून दर रविवारी इस्लामपूर ते उटगी असा दीडशे किलोमीटरचा प्रवास करून डाळिंब बागेच्या नियोजनात रमतात. 

उटगी सारख्या दुष्काळी भागात प्रा. खोत यांनी मोलमजुरी करून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. सोलापूरच्या सिद्धेश्‍वर वसतिगृहात राहून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पुढे शिवाजी विद्यापीठात पहिल्या वर्गात एम.एस्सी. (गणित) पदवीधर झाले. त्यानंतर इस्लामपूर येथील विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात प्रा. खोत नोकरीत रुजू झाले. सलग तीस वर्षे सेवा करून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. शिकविण्याची आवड असल्याने विद्यार्थांना ते आजही शिकवितात. याचबरोबरीने स्वतःच्या शेती विकासाचे स्वप्नही पूर्ण करीत आहेत. 

माळरानाचा केला कायापालट  
 शेती नियोजनाबाबत प्रा. खोत म्हणाले, की मी महाविद्यालयात नोकरी करीत असलो, तरी शेती विकासाची दिशा स्पष्ट होती. दर आठवड्याला एसटीने गावाकडे जाणे येणे होते. वडिलार्जित जमिनीपैकी माझ्या वाट्याला १५ एकर माळ जमीन आली. पूर्वी मी बाजरी, हुलगा, ज्वारी पिकांची लागवड करत होतो. परंतु बेभरवशाच्या पावसामुळे पीक उत्पादनात चढ उतार ठरलेला.  त्यामुळे खात्रीशीर पाण्याची उपलब्धता होण्यासाठी दोन विहिरी खोदल्या. टप्प्याटप्प्याने शेजारची माळ जमीन खरेदी केली. आता ३० एकर जमीन आहे. या ठिकाणी पाण्याची सोय होण्यासाठी आठ कूपनलिका घेतल्या. याचे पाणी दोन्ही विहिरींत सोडले आहे. पूर्णतः माळ जमीन, कुसळही उगवणार नाही अशा जमिनीचे डाळिंब लागवडीसाठी सपाटीकरण केले.

जमिनीचे सपाटीकरण पूर्ण केल्यानंतर २०१४ मध्ये १४  बाय १४ फूट अंतरावर गणेश आणि भगवा जातीच्या रोपांची लागवड केली. लहान ट्रॅक्टरने आंतरमशागत करता येईल असे अंतर ठेवले आहे. लागवड करताना १४ फुटांवर सरी पाडून त्यामध्ये खड्डे करून खत-मातीने भरले. त्यात शिफारशीत अंतरावर रोपांची लागवड केली. त्यानंतर रोपांना भर देण्यासाठी गादीवाफे केले. त्यामुळे रोपाला चांगला आधार मिळाला.

शेताच्या बांधावर आंबा, कडुनिंब, बोगनवेलीची लागवड केली आहे. डाळिंबाला सुरवातीपासून सेंद्रिय खते आणि कीडनाशकांच्या वापराला महत्त्व दिले आहे. संपूर्ण डाळिंब बागेला ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खते, जिवामृत दिले जाते. कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्कावर आधारित कीडनाशकांची फवारणी केली जाते. जास्तीत जास्त सेंद्रिय कीडनाशके आणि खतांच्या वापरावर भर आहे. ॲग्रोवनमधील डाळिंब पीक व्यवस्थापन सल्ला, प्रयोगशील शेतकऱ्यांचे फळबाग नियोजन मला मार्गदर्शक ठरते. प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांच्या सतत संपर्कात मी असतो. या चर्चेतून पीक व्यवस्थापनात बदल करतो. 

डाळिंब बागेचे व्यवस्थापन 
बागेच्या व्यवस्थापनाबाबत प्रा. खोत म्हणाले, की पहिली दोन वर्षे झाडे जोमदार व सशक्त करण्यावर भर दिला. आता मृग बहराचे नियोजन आहे. वाफ्यावर पालापाचोळा, गवत पसरून त्यावर मातीची भर देतो. त्यामुळे सेंद्रिय घटक जमिनीत मिसळले जातात. गांडुळांची चांगली वाढ झाली आहे. झाडांना केलेल्या गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूंना सध्या चवळीची टोकण केली आहे. उत्पादन हाती आल्यावर वेल तेथेच कापून त्यावर मातीची भर देणार आहे. याचा जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी फायदा होईल.

फळबागेसाठी लागणारे जिवामृत तयार करण्यासाठी शेण, गोमूत्र  इस्लामपूरमधून घेऊन जातो. दर आठवड्याला डाळिंबाला जिवामृत दिले जाते. यामुळे  झाडाभोवतालची जमीन भुसभुशीत झाली. गांडुळाचे प्रमाण वाढले आहे. सध्या झाडाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन ठेवले आहे. बागेच्या व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी चार मजूर आहेत. माती परीक्षणानुसार अन्नद्रव्यांचे नियोजन केले जाते. एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर दिला आहे. यंदाचा बहर चांगला मिळणार आहे. त्यामुळे बाजारपेठांचा अभ्यास सुरू आहे. 

प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बागांना भेटी  
शेती व्यवस्थापनाबाबत माहिती देताना प्रा. खोत म्हणाले, की मी पूर्वी दर रविवारी एसटीने गावी जात होतो. आता स्वतःच्या गाडीने न चुकता रविवारी सकाळी तीन तासांचा प्रवास करून उटगीला शेतीवर पोचतो. दिवसभर शेतात थांबून आठवड्याचे नियोजन करतो. बागेचे नियोजन करण्यासाठी मला जकाप्पा खोत आणि गणपती म्हेत्रे यांची मदत होते. ते दोघे इतर मजुरांना घेऊन बागेचे व्यवस्थापन पाहतात. आठवड्यातील मधल्या दिवसात दररोज सकाळी फोनवरून सल्ला घेतात.

माझ्या बागेचे व्यवस्थापन बघणाऱ्यांना मी परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बागेत मुद्दामून घेऊन जातो. त्या शेतकऱ्यांशी चर्चा करतो. त्यांच्या सल्ल्याने आम्हाला पीक व्यवस्थापन करणे सोपे जाते. मी उपलब्ध वेळेनुसार वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या डाळिंब बागांना भेटी देतो. प्रदर्शनातून तांत्रिक माहिती घेतो. मला शेतीच्या नियोजनात पत्नी सौ. लीलावती तसेच दोन्ही उच्चशिक्षित मुली रेणुका आणि रेखा यांचे चांगले सहकार्य मिळते. 

व्यवस्थापनाची सूत्रे
संपूर्ण डाळिंब बागेस ठिबक सिंचन.
प्रयोगशील शेतकऱ्यांशी सातत्याने चर्चा. व्यवस्थापक आणि मजुरांना डाळिंब व्यवस्थापनाचे सातत्याने प्रशिक्षण.
बागेला ९० टक्के सेंद्रिय आणि १० टक्के रासायनिक खतांचा वापर.
पहिली दोन वर्षे झाडे सशक्त होण्यावर भर. पिकाच्या गरजेनुसार काटेकोर पाणी वापरावर भर.
बांधावर आंबा, कडुलिंब, लागवड. येत्या काळात आंबा लागवडीचे नियोजन.
व्यवस्थापन खर्चाच्या हिशेबाची नोंद.दर्जेदार उत्पादनावर भर.

प्रा. एम. एस. खोत, ९८६०२४१३२३