नवारा तांदूळ युरोपात जाण्यासाठी सज्ज

नवारा तांदूळ युरोपात जाण्यासाठी सज्ज

भारतात नोंदणीकरण झालेल्या शेतीजन्य जीआय उत्पादनांपैकी सर्वात जास्त जीआय भाताला मिळाले आहेत. उत्तर भारतातील बासमती तांदळापासून दक्षिणेतील पोकल्ली तांदूळ, नवारा तांदूळ अशा जीआय नोंदणी झाल्या आहेत. जून २०१७ मध्ये आणखी दोन तांदळाची त्यात नव्याने भर पडली आहे. अशा काही जीआयबाबत जाणून घेणे निश्चितच उपयोगी ठरणारे आहे.

युरोपीय ग्राहकांसाठी लघुपट 
केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयांतर्गत औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागामार्फत येत्या काही दिवसांत युरोपात नवारा तांदूळ निर्यातीची मोहीम सुरू होणार आहे. ही मोहीम ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पांतर्गत आहे. भौगोलिक मानांकन (जीआय) टॅग मिळवणाऱ्या भात उत्पादकांना ही बाब प्रोत्साहित करेल, अशी माहिती नुकतीच एके ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे. मोहिमेचा भाग म्हणून स्पेनमधील पाच सदस्यीय पथकाने चित्तूर येथे एक महिना अभ्यासासाठी व्यतीत केला. युरोपीय ग्राहकांसाठी नवारा तांदळाचा सुमारे २६ मिनिटांचा प्रचारात्मक लघुपट बनविला. हा लघुपट आपल्या कोकणातील कोकम सरबताच्या बरोबरीने यंदाच्या ३१ मे रोजी थायलंडमधील वाणिज्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या खाद्य महोत्सवामध्ये प्रकाशीतही झाला.

तांदळाचे पुनरुज्जीवन
विविध अौषधी गुणधर्मांचा नवारा तांदूळ योग्य आर्थिक मोबदला न मिळाल्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर होता. अशा या उत्पादनाला “नवारा इको फार्म” (एनईएफ) ने पुनर्जीवन देण्याची जबाबदारी घेतली. त्यातूनच काही वर्षांत या तांदळाला उत्पादनाला युरोपमध्ये घेऊन जाण्यात यश मिळवले.

नवारा इको फार्म (एनईएफ) ही शंभर वर्षांपेक्षा जास्त काळापासून एका कुटुंबाची पारंपरिक शेती व्यवस्था आहे. ही संस्था केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यातील चित्तूर येथे शोकनाशिनी नदीच्या काठावर स्थित आहे. या कुटुंबाची जमीन साधारणपणे १८ एकर क्षेत्रात पसरलेली आहे त्यापैकी नवारा तांदळाचे पीक हे १२ एकरांत घेतले जाते. उर्वरित क्षेत्रात नारळ, सुपारी यांचे उत्पादन घेतले जाते. त्याबरोबरच आंबा, डाळिंब, फणस, चिकू, पपई आणि पेरू यांच्याबरोबर भाज्या, मसाले आणि औषधी वनस्पती यांचेही उत्पादन घेतले जाते. पी. नारायणन उन्नी, त्यांचे वडील एम. रामचंद्र मेनन (एमआरसी मेनन) यांनी साठ वर्षे मेहनत घेऊन शेती विकसित केली. त्यांचे मोठे भाऊ श्री. केलुकुटी मेनन हे पाटंबीच्या तांदूळ संशोधन केंद्रातील आघाडीच्या तांदूळ तज्ज्ञांपैकी होते. मोठे भाऊ भात शास्त्रज्ञ तर लहान भाऊ अत्यंत मेहनती शेतकरी होते. या कुटूंबाने एकत्रितपणे नवारा तांदळाची शेती विकसित करण्यासाठी खूप मेहनत घेतली. या तांदळाचे संवर्धन करण्यासाठीही प्रयत्न केले. सें.िद्रय शेतीपद्धतींचा वापर करून येथील येथील जमिनीचे सुपीक शेतात रूपांतर केले. सन २००६ मध्ये श्री उन्नी यांनी संपूर्ण शेत आणि त्यावर पिकणारा माल सेंद्रिय प्रमाणित करून घेतला. आज नवारा आणि पलक्कडदान माटया या तांदळाला त्यातून जीआय प्राप्त झाला आहे. उन्नी यांच्यापासून बोध घेत जीआय मानांकीत नवारा तांदळाच्या पारंपरिक पिकाकडे जाण्याचा निर्णय अनेक शेतकऱ्यांनी घेतला. या तांदळाला प्रतिकिलो ३५० रुपये म्हणजे बासमतीपेक्षा कैकपटीने जास्त दर मिळत आहे. 

आव्हानात्मक उत्पादन
साधारणतः नवारा तांदळाची पेरणी करताना एक एकरात ६० किलो बियाणे वापरले जाते. 
या भागातील मातीचा गुणधर्म वेगळा आहे. तसेच हिरव्या पालाचे कंपोस्ट, स्थानिक गायीचे शेण शेतीत वापरले जाते. त्याचबरोबर येथील शेती परिसरात कडुलिंबाची झाडे आणि काही औषधी वनस्पती लावण्यात आल्या आहेत. ज्यांच्या मदतीने तयार केलेले खत नवारा तांदळाच्या उत्पादनासाठी वापरले जाते. हवामानातील चढ-उतार, किडी-रोगांचा प्रादुर्भाव व अन्य बाबी नवारा तांदळाच्या उत्पादनाला कारणीभूत असतात. या वाणाचे रोपटे बऱ्यापैकी नाजूक असते. ते सकाळच्या दवात खराब होऊ शकते. त्यामुळे पिकाच्या सुरक्षेसाठी अत्यंत दक्षता घेण्याची आवश्यकता असते. नवारा तांदळाच्या लागवडीचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे याचे बियाणे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ साठवले असल्यास बियाणांची उगवण शंभर टक्के होत नाही. कापणी झाल्यानंतर पुढील हंगामासाठी त्याचे बियाणे बीजोत्पादनासाठी पेरवापरले जाते. त्यामुळे वर्षात दोनवेळा नवारा तांदळाचे पीक वाढते. एकदा विक्रीसाठी आणि दुसरे बियाणांसाठी. या वाणाचा उत्पादन कालावधी फक्त दोन महिने असल्यामुळे सर्व देखरेख ६० दिवसांत करणे आवश्यक असते. त्यामुळे योग्य वेळी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यामुळे त्याचे उत्पादन अतिशय आव्हानात्मक ठरते.

युरोपात उमटवणार ठसा 
जगभरातील उत्कृष्ट भाताच्या स्पर्धा गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत होत आहेत. मागील वर्षी थायलंडच्या जीआय प्राप्त जस्मिन तांदळाने त्यात प्रथम क्रमांक पटकाविला. त्यापाठोपाठ कंबोडिया देशाचा सुवासिक काका मली व अमेरिकेच्या जपोनिका तांदळाने आपले स्थान निश्चित केले. या शर्यतीत भारतातील जीआय प्राप्त नवारा तांदळाने आपला ठसा उमटविला आहे. केरळ राज्यातील पलक्कडमधील चित्तूर तालुक्यातील शेतकरी एकत्रितपणे युरोपिय महासंघाला औषधी गुणधर्म असलेला नवारा तांदूळ आणि त्याची पावडर निर्यात करण्यास सज्ज झालेले आहेत. या गडद लाल तांदळाचे पॅकेट लवकरच युरोपात दाखल होण्याची चिन्हे आहेत. 

नवारा तांदळाचे महत्त्व 
औषधी आणि उपचारात्मक गुणधर्मांची समृद्धी असलेल्या नवारा तांदळाचा उपयोग विविध आयुर्वेदिक उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. संधिवात, अर्धांगवायू, मज्जासंस्थेतील विकार आदी दीर्घकालीन आजारांना बरे करण्याची क्षमता या जीआय प्राप्त नवारा तांदळात आहे. सर्वसाधारणपणे हा तांदूळ दोन महिन्यांत पक्व होतो. त्याची वाढ वेगाने होते. हा तांदूळ त्याच्या चवीसाठी आणि सहजपणे होणाऱ्या पचनक्रियेसाठीही ओळखला जातो. 

गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ 
(लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com